Sunday, 14 January 2018

शहरात आहे ती गर्दी वेगळीच आहे

ध्यरात्र कधीच उलटून गेलेय. रात्रीतल्या घनगंभीर काळोखाचं अस्तित्व कुठेतरी लोप पावलय या काळोखात. पुरं शहर झोपेच्या आधीन गेलय आणि शहरातले पुतळे तेवढे पहारा देत उभा आहेत शहराभर. माझ्या ऑफिसच्या बाहेर आलो तर पेपरवाली मुलं, हाताच्या चलाखीवर पुरवणीत जाहिरातीची पत्रकं घुसडताहेत. जाहिरातीसारखचं त्यांचं थोपवणं चालूय. आता खरं तर हा साखर झोपेचा काळय, मात्र ही पोरं चेहर्‍यावर साखरेएवढा गोडवा घेऊन त्यांचे हात राबताहेत. चित्रं सुंदरय पण जगणं वाईटय. मला उगाच वाटलं दिवसा ही पोरं, कुठं जात असतील किंवा दिवसाची साखर झोप यांना लागत असेल का? प्रश्न अनुत्तरित. मग नंतरचा माझा प्रवास सुरूच झाला. ऑॅफिस ते बस स्टॅण्ड चालताना हे शहर वेगळच भासत राहिलं. काळोखाचं अस्तित्व नाहीसं झालय तसच या शहरातली  काही तरी मोठी गोष्ट नाहीशी झालेय. शहर कदाचित त्याच नाहीशापणाच्या शोधात असेल, किंवा शहरानचं हळूवारपणे आपल्यातलं आपलेपण सोडूनही दिलं असेल.

रात्र अजब असते. स्वप्नांचा कल्लोळ, निद्राधीन माणसं, मनं, थडपडणारे, शांततेच्या महासागरासारखे, सळसळणारी, कुजबूजणारी आणि आलेलं जीवन गपगुपान जगणारी माणसं शहरात कुठेच कमी नाहीत. आणि अस्‍वस्‍थ माणसांची मनं माणसांशिवाय ही शहरात वेगळीच आणि अधिकच ही गर्दी. माणसं काय या सगळ्याला निमित्तं. चालताना वाहनांचा उजेड हॉर्न, कुत्र्यांचं भुंकणं, खांबावरचा तीव्र प्रकाश, एटीएम सेंटरच्या आता लुकलुकणारा तो हिरवा सिग्नल आणि पैशासाठी मध्यरात्र ओलांडून गेल्यानंतरही देहविक्रय करणार्‍या बायांना बघून मन मरुन जातं. त्यांचा राग येत नाही, त्यांच्या जगण्याची घृणाही वाटत नाही. कुठे तरी दया येत रहाते. डोळ्यात त्यांच्या सुरमा नसेल, साधच कुठलं तरी काजळ असेल, आणि बर्‍याच काळानंतर त्याच काजळानं नजर अंधूकही होत असेल. कदाचित कालांतराने डोळे जात असतील. तरीही त्यांचं जगणं चालूचय. थांबत नाही किंवा थांबूही देत नाही. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे ते निरंतर दुःख चालूच आहे त्यांचं. पिवळ्या प्रकाशात आरपार दिसणारं शहर त्यांनी ते कधीच बघितलं असेल, आतून बाहेरून. म्हणून त्या बिनधक्कपणे शहरात थांबत असतील. कोणत्याही नात्यागोत्याशिवाय. तिथे कधीतरी थिएटर होतं. जिथं मी पहिल्यांदा देवदास सिनेमा पाहिला होता. मग माझ्या मनात आता देवदास सिनेमा चालू झाला. देवदासचं ते दुःख मला प्रचंड आवडतं. मनात देवदास चालू असताना रिक्षावाल्यानं स्टॅण्ड काय? असं त्राग्यानं विचारलं, मी नाही म्हटल्यावर तो चौकात जाऊन थांबला.

मग पुन्हा चालणं सुरू. मगाशीच अक्षयनं विचारलं, प्रवास चाललाय का? तर हो म्हटलं. ते असं आता सहज आठवलं. फुटपाथवर, बंद दुकानांसमोर, रस्त्याकडेला, दुकानांच्या, वाहनांच्या अडोशाला कित्येक निद्राधीन माणसं उघड्या अंगाने झोपेच्या आधीन गेलेत. ती कोणत्या स्वप्नाप रंगत असतील? रात्रीच्या काळोखात सुंदर झोप घेणं एवढचं स्‍वप्‍न असेल की स्‍वप्‍नांचे इमल्यांसारखेच घरांचे इमलेही उभा रहात असतील.

1 comment:

  1. चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं....

    ReplyDelete

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...