Wednesday, 31 January 2018

आम्ही शेतकर्‍याची पोरंं पण...

शाळेत असताना देश आपला काय आहे? असं विचारलं तर पोटतिडकीनं, गळ्याच्या शिरा ताणून ओरडून ओरडून 'कृषीप्रधान' म्‍हणण्यात केवढा आनंद वाटायचा. नंतर नंतर कृषीप्रधान शब्द कानावर पडला की, शेताचे बांध, झाडं, गुरं, पिकावर येणारी पाखरं, पावसाळ्याच्या दिवसात गडद हिरवं झालेलं शेत आठवायचं. ते डोळ्यासमोर दिसे. मग शाळा, कॉलेज नंतर शहरात शिकायला आल्यावर असं कृषीप्रधानतेशी वाचण्यापुरता आणि कुठल्या तरी अर्जात वडीलांच्या व्‍यवसायासमोर शेती असं लिहाण्यापुरताचा संबंध आला, अन्‌ तसा संबंध ठेवला. शेतीशी आणि शेतकर्‍यांशी नाळ कधी जुळली नाही आणि जुळू दिली नाही.  
बाप शेती करतो, असा सांगण्यापुरता अभिमान, नाही तर मित्र मैत्रिणींना ठासून सांगायला बरं वाटतं म्‍हणून. शेतकर्‍यांबरोबर असलेली नाळ कधी झुळली नाही, अन्‌ कधी जुळवून घेतली नाही. का? तर ते शेतात राबतात, घामाचा वास येतो, हातपाय मातीत राड झालेले असतात, त्यांचे कपडे बॅण्डेड नसतात, पसरून राहणारा कोणताही बॉडीस्‍प्रे ते अंगावर मारत नाहीत अथवा शेतात मायचे केस कधी तजेलदार आणि स्‍मूतही नसतात. म्‍हणून आम्‍हाला ते कधी आपले वाटले नाहीत, बाकी कृषीप्रधान हे शब्द ऐकायला आणि लिहायला तेवढेच बरे वाटले. बाकी सगळं अलाहिदा....
धर्मा पाटील शेतकर्‍यांनं आत्‍महत्‍या केली आणि सगळा सोशल मीडिया शेतकर्‍याच्या दु:खानं ढवळून निघाला. अगदी हीन पातळीवर जाऊन शासनावर, राज्यकर्त्यांवर टीका झाली, सोशल मीडियावर अनेक ग्रुपही ॲक्‍टिव्‍ह झाले. शेतकर्‍यांचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत टेक्‍नोसेव्‍ही पिढीनं सोशल मीडियावर दुखवटा पाळला, सरकारची आईबहीण काढून ही पिढी रिकामी झाली अन्‌ पुन्‍हा आपल्या मोबाईलमध्येही ती दंगही झाली. 
शेतकर्‍याचा मृत्यू होतो तेव्‍हा, ते दु:ख फार तात्‍कालीक असतं, तेवढ्यापुरतं तीव्र वाटणारं असतं. सध्याच्या जगात तसा कुणाचा समोरासमोर दुरान्‍वयेही शेतकर्‍याचा संबंध येत नाही. शेती काय असते आणि त्‍यातील राबणूक मरमरणं काय असतं हे शहरातल्या सध्याच्या पिढीला कुठं माहित असतं. त्यांना शेतकर्‍यापेक्षा इतर गोष्टी महत्‍वाच्या आणि काळजीच्या वाटतात. 
आम्‍ही शेतकर्‍यांची पोरं एवढं म्‍हटलं म्‍हणजे आमच्या पिढीची जबाबदारी संपते, त्‍यानंतर कशाचाही आमचा शेतकर्‍यांशी दुरान्‍वये संबंध येत नाही आणि आला तरी तो आम्‍ही येऊही देत नाही.
शाळा, काॅॅलेज, विद्यापीठ, नोकरी लग्न हा प्रवास सुरू राहतो. शेतकर्‍याचा मात्रंं शेती, कष्ट, शेती आणि मरण या पलिकडंं तो जात नााही. अााणि गेलााच तर सरकार मायबाप आहेच की, वेगाला खीळ बसवायला. त्या वेगानंं गती घेतली काय किंंवा मंंदावली काय, आम्हा त्याच्या पोरांंना काही फरक पडत नााही. सो काॅॅल्ड जगात राहणारी पोरंं मात्रंं शेतकर्‍यांंनी केलच आंंदोलन तर मग बघा यांंना आणि काय पडलंं म्हणत कुचेष्टाचा स्वर या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंंत सुरूच ठेवायचा, आणि झालीच आत्महत्या तर मग महागाईचा डांंगोरा पिटत रहायचा कायम.
धर्मा पाटील गेले तेव्‍हाची गोष्ट. जमिनीला योग्य मोबदला मिळाला नाही म्‍हणून मंत्रालयात खेटे मारूमारूनही शासनाने दखल घेतली नाही मग मंत्रालयातच विषप्राशन केले. अन्‌ जीवनयात्रा संपवली. शेतकर्‍याचं आयुष्याचं वैराण वाळंवटासारखं आहे. ना एैल आहे ना पैल. पीक आलं तर पाऊस नाही, पाऊस आला तर पीक नाही, अशी एक ना अनेक समस्यांचा डोंगर. तरीही यातून तो जगत राहतो, जगण्यासाठी धडपडतो, पोरांबाळांना शिकवतो, मोठ्ठं करतो आणि आपण मात्रं पुन्‍हा शेताच्या बांधावर घाम घाळत काळ्या जमिनीच्या हवाली होतो. शेती म्‍हणजे नोकरी नव्‍हे. आठ तास काम केलं की, मोबादला हा मिळतो असं कधी होत नाही. वर्षभर राबूनही हातात पिकांच्या पालापोचाळा घेऊन कधी कधी घराची वाट धरायची आणि पुन्‍हा उद्या हाच खेळ म्‍हणत उद्याची जोडणी करायची. दु:ख भोग हे कधी सुटलं नाही त्याच्या आयुष्यातून ते सुरूच आहे.
गावाकडचा शेतकरी कधीतरी शेतकरी शहरात माल विकायला शेतात येतो तेव्‍हा, शहरातला सुखी संपन्‍न माणूस ताज्या मालाला नाकं मुरडत, त्‍याची किंमत करीत, त्याच्यावर आवाज वाढवत, द्या आता, माहित आहे तुमचा माल ताजा आहे
असं त्‍याच्याच तोंडावर सुनावत, त्याच्याच मालाची कवडीमोल भावानं मागणी केली जाते, आणि हताश शेतकरी मिळेल ते पदरात पाडून तो शेवटच्या बसनं घराची वाट धरतो, चकचकीत काचेआड बसलेल्या माणसांच्या दुनियेचा विचार करत घरात जातो खरा पण उद्याचा प्रश्न असतोच त्याच्यासमोर आ वासून उभा. 
ब्रॅण्डेडच्या नावाखाली विकल्या जाणर्‍या वस्‍तूंना म्‍हणेल ती किंमत देत, ब्रॅण्डेड आहे असं ओरडून सांगत आपल्याकडं असणार्‍या वस्‍तूंची जाहिरात करणार्‍या या पोरा पोरींना शहरात विकायला आलेल्या भाजीवाल्या शेतकर्‍याची भाजीपाला म्‍हणजे कवडीमोल वाटतो, आणि कुजवलेले ब्रेड खाऊनही ब्रॅण्डेड खातो असं सांगताना त्‍यांची छाती ५६ नाही तर शंभर इंच होते. 
कुणाला काहीच नाही, शेतकरी राबतो आणि कधी राबता राबता तर कधी कुठलं तरी फवारणी द्रव्‍य पिऊन, नाही तर बांधावरच्या झाडाला गळफास घेऊन जीव संपवतो. आम्‍हाला त्‍याचं काहीच नाही. देशाला नव्‍हे पण माणसांना जगवणार्‍या या किमयागाराला उपाशी ठेवण्यातच आम्‍ही वर्षानुवर्षे धन्यता मानत आलो... 
आताही तसच झालंय धर्मा पाटील यांनी मंत्रालयात जाऊन जीवन संपवलं म्‍हणून आम्‍हाला त्याची तीव्रता वाटली, जाणवली. नाही तर रोज कित्‍येक धर्मा पाटील विषानं, नाही तर गळफासानं जीव द्यायला बांधाबांधावर बसून आहेत, त्यांच्याकडं कसं काय कुणाचच लक्ष नाही...

1 comment:

  1. शारीरिक श्रमाशी संपर्क तुटल्यामुळे या पिढीला त्रास जाणवत नाही.

    ReplyDelete

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...