कारखाना. कारखाना म्हणजे माझ्या पिढीला दिवसा पडलेलं एक सुंदर स्वप्न. माझ्यावेळी कारखान्यात सगळच आलबेल होतं. एकाद्या चित्रात सुखी, सुंदर कुटुंब बघावं तसं कारखान्याचं चित्र होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाकडे तेथे एक गोष्ट होती. सुख आणि आनंद. आता ते दिवस आठवले की, क्षणात कित्येक आनंदी दिवसांची रांग लागते, जंत्री जमते, आणि एका विशिष्ट टप्प्यावर येऊन ती थांबते. ती पुढं सरकत नाही आणि मागे भुतकाळातही जात नाही. कारखान्याची धडधड थांबली असली तरी ह्रदयात तेवढी ती वाढत राहते आणि माणसांची धडधड थांबल्याच्या गोष्टी ऐकू येतात.
आज दुपारी कारखान्याच्या कॉलनीत दहावीची मुलगी उपचाराविना गेल्याचे मेसेज येत राहिले. आणि उगाच ते आमचे ऐशोआरामीचे दिवस आठवले. रात्र होण्याआधी लख्ख उजेडात चमकणारी कॉलनी आठवली, आणि पाण्याचा झरा लागवा तसं वाहनारं पाणीही आठवलं. किती सुखात गेले ते दिवस. आता जर कुणी ते सांगत असेल तर उगाच एकाद्याला अतिशयोक्ती असल्यासारखी वाटेल. त्या मुलीच्या मृत्यूनं कॉलनीतील माणसं आठवली, राहिलेली, गेलेली आणि झगडत असणारी सगळी माणसं आहेत तशी आठवली. कॉलनीत कुणाचा मृत्यू झाला नाही असं नाही, पण आताची डोळ्यादेखत वाढणारी पोरांचं जाणं हे काळीज चरकावणारी गोष्ट आहे. कॉलनीत असताना कुणाचा अपघाती तर कुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता. अशा घटना तुरळक होत्या, आणि माणसं सुखी आणि मजेत राहणारी होती.
नंतर नंतर मात्र कारखान्याच्या कॉलनीत तुरळक असणारं मरण , नंतर सहज आणि सोपं झालं. कुटुंब उद्धवस्त झाली, अगदी देशोधडीला लागली नसली तरी जगण्याचा प्रश्न गंभीर झाला. आता कधी तरी कोणतरी भेटलं की, मरता येत नाही म्हणून जगायचं असं कातर स्वरात सांगतात तेव्हा कारखान्याला शिव्या द्यावाशा वाटतात, आणि नंतर पुन्हा मायेचं पांघरून असणारा कारखाना होता म्हणून वाढलो, शिकलो असंही वाटतं. कारखान्यावर असलेल्या प्रत्येकाला कारखाना म्हणजे आपल्या घरातला सदस्य वाटत होता. भलं त्याचं नाव घरातल्या कोणत्याही कागदोपत्री नसलं तरी कारखाना म्हणजे आपलं कुणीतरी खूप जवळचं आहे हिच भावना प्रत्येकाची.
कारखान्याची कामगार वसाहत म्हणजे एखादा देश, राष्ट्र असावं तसं होतं. स्वत:चं असं एक स्वातंत्र्य होतं ते. काही अलिखित नियम होते, काही रक्ताची नसली तरी सख्यापेक्षा जिव्हाळा जपणारी माणसं या कारखान्यानाच दिली होती.
कोणतरी आजारी माणूस हळुहळू संपत जावा तसा कारखाना संपत गेला. हवेत कापूर उडून जावा तसं अगदी सहज बघता बघता कारखाना नाहीसा झाला, कुणाला कळलंही नसलं तरी माणसं धडपडत राहिली. जगण्याचा प्रश्न समोर होता. कारखान्यावर एक पिढी राबरणारी, कमवणारी होती, तर एक पिढी सुखाच्या ऐशोआरामात लोळणारी होती. हे चित्र फार काळ राहिलं नाही. कारखाना बंद पडेल आणि आख्खी एक पिढी देशोधडीला लागेल असं कधी कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण झालं तसं. कारखाना बंद पडला, राबणारे हात थांबले, हातावर जगणारी नवी पिढी मात्र रस्त्यावर आली.
कारखान्यातील कामगारांच्या कोणत्या पोराला कधी वेट ॲण्ड वॉच करावं लागलं नाही. सायंकाळी कामावरून बाप घरी आला की, पोरांनी फक्त आदेश सोडायचा. दुसर्या दिवशी पाहिजे ती वस्तू घरात हजर. आता वाटतं अशा किती सुंदर चित्र होतं ते. त्यात आम्ही वाढलो, शिकलो, पोरं धावत राहिली, पुढं गेली. डॉक्टर, इंजीनियर, परदेश दौरा केला. गाड्या, बंगले, इमारती उभा राहिल्या. हे ज्याच्या त्याच्या कतृत्वावर उभं राहिलं, आणि भरभराट झाली.
आणि दुसरीकडं एक एक पिढी गलितगात्र होऊन अन्नासाठी, पाण्यासाठी आणि पाठीपुस्तकासाठी आणि जगण्यासाठीही हातपाय हलवू लागली. कारखान्याची धडधड थांबली आणि एक पिढी रस्त्यावर आली, उंचच उंच दिसणारी ती कारखान्याची चिमणी दिवसेंदिवस उभा असली तरी ती उद्धवस्त होत राहिली.
या सगळ्यात एक झालं माणसं खंगत गेली, कडक असणारी इस्त्री नाहीशी झाली, आणि माणसंही मग मऊ कपड्यासारखी मऊ झाली. काही जिर्ण झाली तर काही उसवत राहिली, राहत अहेत. चुरगळलेली मऊ मेणासारखी माणसं बघून आता मलाही हताशपण येतं. ते वैभव आठवतं. कारखान्यावर असणारं मंदिर एकाद्या शिल्पासारखं भासायचं. दरवर्षी होणारी मंदिराला रंगरंगोठी गंध पसरवत राही. कित्ये दिवस तो रंगांचा गंध पसरून राही. मंदिरातही आणि मंदिराबाहेरही. आता मंदिराचा रंग उडालेला आहे, देखणंपण नाहीसं झालंय. मंदिराची हिरवीगार असणारी बाग आता बाग राहिली नाही. बागेपूरता तीव्र दुष्काळ जाणवत राहतो. आणि हे सगळं आठवत असताना मंदिराच्या प्राणी संग्रहालयात असणार्या मोराची आर्त किंकाळी तेवढी कानात घुमत राहते.
कारखान्याचा निळा पांढरा ड्रेस आठवला की, आजही शाळा आठवते, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे दिवस कुठल्यातरी सणाहून मोठे असायचे आमच्यासाठी. कारखान्याचा गणपती म्हणजे प्रत्येकाचा सण.
कारखान्याचे हे वैभवाचे दिवस जास्त काळं राहिले नाहीत. कारखाना बंद पडत गेला आणि राबणारी माणसं थकत गेली. कामगारांच्या पोरांची होणारी कुत्तरओढ बघून बापमाणसं हेलावून जाऊ लागली, झुरत राहिली, कारखाना, कारखाना म्हणून जीव सोडत राहिली. मग कॉलनी भकास आणि उदास होऊ लागली.
कोणत्याही बापाला किंवा मुलाला असं एकमेकांचं संपत जाणं परवडणारं आणि सहनशक्ती पलिकडचं होतं. कारखान्यावरच्या आई बापांच असं दु:ख असलं की मग ते किती पहाडाहून मोठं वाटतं. हातातोंडाशी आलेली, स्वप्नांचे इमले बांधणारी आणि परिस्थितीशी झगडणारी पोरं बघून आई बापाला कौतुकाचं वाटणारं असतं, मात्र ज्यांच्या स्वप्नांसाठी रक्तांचं पाणी पाणी करणार्या आई बापासाठी अशी डोळ्यादेखत पोरं गेली तर जीवंतपणीच जळाल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.
Colony dolyasamor ubhi Rahili tumcha jwalant likhan vachun ....kharach khup Sundar likhan.
ReplyDelete... unforgettable moments..
सलाम तुझ्या लेखणीला...
ReplyDeleteसलाम तुझ्या लेखणीला...
ReplyDelete