Sunday, 29 August 2021

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...



आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण, मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्यास सुरूवात झालेली, आमच्या आबांसारख्याच अनेक कामगारांचीही तिच अवस्था होती. कधी काळी सोन्याचा धूर निघणा-या त्या कारखान्याच्या चिमणीतून दुःखाची आणि दैन्यावस्थेचा हूंकार बाहेर पडत होता. या अशा आर्थिक महामारीच्या अवस्थेतसुद्धा आमच्या आबांनी आम्हाला विद्यापीठात शिकवायला पाठवलं होतं. आक्काचं एमफिल संपत आलं होतं, आणि माझं एमए सुरू होतं. रिडिंगला बसून अभ्यास करताना आक्काच्या हातात अधांतर नावाचं पुस्तक बघितलं, अधांतर नाव कुठे कुठे आणि कधी कधी ऐकलं होतं. सायंकाळचे सात वाजलेले, लेडिज होस्टले बंद होतं म्हणून ते पुस्तक ठेवून निघून गेली आणि ते नाटक वाचायला सुरूवात केली. ते वाचताना नेहमी वाटत राहिलं, त्या अधांतर मध्ये जी चाळ आहे ती आमच्या कॉलनीसारखीच आहे का, तशीच माणसं, तिच कुटूंबं, तेच व्याप, तेच नातेसंबंध, घराघरातील तेच वाद, आर्थिक चणचण हे सगळं मी शाळेत असतानाच अनुभवलेलं. कारखानदारीतील कामगार सुखी संपन्न असतात की नाही माहित नाही पण तुमच्या अंधातर नाटकातल्या त्या पात्रांसारखी नेहमी अंधातरी असणा-या आशेच्या किरणावरच ती माणसं जगत असतात असच सारखं वाटत राहिल. अंधातर वाचून संपलं आणि जयंत पवार नावाचा माणूस माझा आवडता नाटककार झाला. मग कुठेही जयंत पवार हे तुमचं नाव दिसलं की मी आवर्जून वाचत थांबणार. तुम्ही म.टा. मध्ये चौथी भिंत नावाच्या सदरातून नाट्यपरीक्षण लिहायचात, आमच्या एनडी (मावस भाऊ) मुळे त्या सदराची गोडी लागली. नाटक बघण्यापेक्षा त्या तुमच्या परीक्षणाची गोडी वाटायची. त्या परीक्षणाच्या शेवटच्या परिच्छेदात सगळा नाटकाचा सार यायचा, ते वाचून त्या-त्या नाटकाविषयी प्रचंड उत्सुकता वाटायची. त्या काळात पैसे देऊन, तिकीट काढून नाटक बघायची आमची ऐपत नव्हती, पण तुमची म. टा. तील परीक्षण वाचताना प्रचंड भारी वाटायचं. तुम्हाला एकदा दोनदा भेटण्याचा योग येऊनही तुमच्या जवळ येऊन बोलण्याचं धाडस झालं नाही. त्यावेळी मी भेटलो असतोच तर सांगितलं असतं तुम्ही गिरणगावातील माणसांचं दुःख मांडलय तसच बंद पडलेल्या साखर कारखान्यावरच्या माणसंचही सगळं आयुष्य अधांतरी आहे. 

अधांतर वाचताना ते चाळीतील जगणं, राहणं, वाद प्रतिवाद हे सगळं माझच मला वाटायचं. मला माझ्या गावाकडच्या बंद पडलेल्या कारखान्याची आठवण आली की, मी माझ्या उशीकडे ठेवलेलं अधांतर पुस्तक काढायचो आणि वाचत बसायचो. नाटकातील संवाद वाचताना तो आमचा सगळा काऱखाना आणि आमची कॉलनी मला दिसायचा. चालू असतानाचाही आणि बंद पडल्यानंतरचाही. अधांतर नाटक वाचताना त्यातील नातेसंबंध, त्यांचं जगणं, गिरणी कामगार (कारखानदारी) आणि कुटूंब, त्यातील हेवेदावे, वाद प्रतिवाद, काम, दाम आणि रोजचं जगणं या सगळ्यातील भाव तुम्ही अधांतरी नाटकात किती सहजपणे बसवला होतात. एका काळाचं आहे तसं ते दर्शन असलं तरी त्या गोष्टी प्रत्येक काळात घडणा-या या असतातच. मग तुमच्या कथा वाचताना माझा मिच त्यात बघत राहत होतो. जयंत पवार माझ्या काळाचं लिहितात असं मला नेहमीच वाटत राहिलं. तुम्हाला कधी जवळून भेटून कधी सांगता आलं नाही, पण एका दिवाळीअंकातून तुमची कथा वाचून तुम्हाला प्रतिक्रिया कळविल्यावर तुम्ही दिलेला रिप्लाय मी मोबाईलमध्ये कितीतरी दिवस जपून ठेवलाय.

अधांतर नाटकात मोहन आणि बाबा आपल्या आईला चहा आणायला सांगतात तेव्हा ती आई पैश्याविषयी आपल्या पोरांना सांगते. त्या अधांतरमधील ती आई म्हणजे बंद पडलेल्या अनेक कारखान्यातल्या पोरांची आई वाटत राहते. चाळीतल्या माणसांच्या जगण्याची एक वेगळी संस्कृती आहे तिच संस्कृती तुम्ही अधांतर मधून किती सहजपणे मांडले. उपोषण म्हणजे जुगार खेळण्याचा अड्डा आहे असं मोहन म्हणतो त्यावेळी त्याची बहिण मंजू म्हणते गिरणीला टाळे लागले आहे म्हणून त्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलन, उपोषण सुरू झालं की, त्यातून काही तरी नवीन सुरू होतं किंवा कामगारांच्या यशाला फळ येत असं होत नाही. आम्ही कारखान्यात असताना हे सगळं व्हायचं. कामगार सायंकाळी घरी यायचे आणि आपापल्या पायरीवर बसून निवेदन देताना काय काय गमती जमती झाल्या ते सांगायचे. त्यातून बंद झालेले पगार सुरू व्हायचे नाहीत किंवा नवीन काही तरी मिळायचं असंही व्हायचं नाही. पण आंदोलनं आणि उपोषणं करणा-यांची हौस फिटायची नाही. ते करत राहायचे. घर मात्र बायको नावाची माणूस चालवायची. महिन्याची दहा तारीख झाली की, बायका आपल्या नव-याना विचारायच्या झाला का पगार तेव्हा चेह-यावर कमालीची निरागसता आणि गरीबी आणून नाही हा शब्द ऐकावायचे. कारखानदारीच्या या दुःखाच्या फेजमधून गेलेल्या माणसांना अधांतर नाटक आपलीच कहाणी वाटते. घरातील बाजार संपणं, ऐन वेळेला पैसे नसणं, तरुण पोरांना सांगणं समजावणं अवघड होणं ही प्रत्येक बंद पडलेल्या कारखान्यावरच्या माणसांची शोकांतिका आहे. काम करणा-या कामगारांच्या हातातलं काम जाणं म्हणजे पुढच्या पिढीच्या ताटात दुःख वाढून ठेवण्यासारखंच आहे.

कामगार वसाहत जिथं जिथं स्थापन होते तिथं तिथं एक स्वतंत्र संस्कती उदयास येत असते. एक  कुटुंब अनेक कुटुंबाशी जोडलं गेलेलं असतं. चांगली वाईट माणसं दोन्ही काळात असतात तेच अधांतर नाटकात आहे, आई नावाचं त्यातील पात्रं एका काळ उभा करतं. ती दोन्ही गोष्टी सांगते तीन लेकांच्या तीन गोष्टी सांगताना तीन पिढ्यांचं ती सार सांगते. अधांतरमधील आई मला प्रचंड भावलेली आहे. नव-याचा, मुलांचा, मुलीचा, जावायचा आणि घर कसं चालवायचं या अशा अनेक गोष्टींचा ती विचार करते. ती थकलेली असली तरी घर चालवण्यात जराही कुचराई करत नाही. तुमच्या नाटकातीन मोहन, बाबा, आई, मंजू ही सगळी पात्रं वास्तवात कुठे ना कुठे भेटलेली आणि भावलेली असतात. साखर कारखानं बंद पडून कामगारांची आयुष्य बेचव झाली त्या काळातच तुमचं अधांतर वाचलेलं तेव्हा त्यातील ते आयुष्य आमचंच असल्याचं मला जाणवत होतं...



2 comments:

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...