Thursday, 4 January 2018

इतिहास राहतो दूर,उगाच माथी तेवढी भडकतात

मी गावाकडं वाढलो. लहान होतो तेव्‍हा शिवसेनेचे  संस्‍थापक बाळासाहेब ठाकरे जिवंत होते. गावाकडं कुठल्‍या तरी निवडणूका लागल्या की, वाघ असलेली काही फलक, पत्रकं, झेंडे असं काय काय बरचं फिरायचं. गावाकडं भला मोठा हात असलेली काँग्रेसच्या गाड्याही यायच्या. तिरंग्यावर असलेला हात लावलेली गाडी जेव्‍हा गाडी गावाकडं फिरायची तेव्‍हा माहित नाही पण तिरंग्यामुळे तो झेंडा कुठं पडला तर कसकसच वाटायचं आणि तो हळून उचलून मग कुठे तरी नेऊन ठेवला जायचा. हातवाले तेव्‍हा असं काय सांगत फिरत असं कधी ऐकवीत नव्‍हतं. मात्र गावाकचा आंदूदा मुंबईला कामाला गेला होता, आणि परत गावाकडं आलेला. तेव्‍हा तो काय काय सांगत फिरायचा. भारी वाटायचं, कान मोठं करून ऐकताना, वाटायचं आपणबी मुंबईला गेलं पाहिजे आणि आपले खरे शत्रू आपण ओळखले पाहिजेत. आंदूदा जास्‍त शिकला नव्‍हता, पण तो असा काय काय सांगायचा की, आता वाटतं काय म्‍हणून ते ऐकत होतो. आता आंदूदा कधी तरी भेटतो पण गावात नाही, हॉटेलात भांडी घासताना भेटतो, तेव्‍हा वाईट वाटतं.
गावाकडचं पोरं धड कोण शाळा शिकली नाहीत. कॉलेज तर लांबची गोष्ट. दहावी बारावी झाली की, पुणे मुंबई गाठायचं वर्षभर काम करायचं आणि मे महिन्‍यात गावाकडं बक्‍कळ (त्‍यांच्यासाठी बक्‍कळ) पैसा घेऊन येत. यावेळी निवडणूका लागल्या की, कपाळावर नाम ओढून, गळ्याच्या शिरा तारवटून मोठ मोठ्यानं घोषणा देत गल्‍लो गल्‍लो फिरायचं. कोणतरी माथं फिरवणारा इतिहास सांगायचं आणि तोच इतिहास खरा मानून झूंडशाहीच्या वृत्तीनं गावाकडच्या माणसांना हैराण करून सोडायचं. या अशात गावाकडची एक पिढी हाकनाक खड्यात गेली त्‍यांच्याच भाषेत सांगायच तर ती पिढी बाराच्या भावात गेली, कुठे गेली आणि कुठे मेली माहित नाही पण आता ती कुठेच दिसेनासी झाली. कधी तरी कोण तरी अरे तो वश्या, किश्या कुठं हाईत असं कोणतरी आता विचारलंच तर मग ते कोणतरी वडापच्या गाडीवर किन्‍नर नाहीतर नाहीतर गावाकडच्या कुठल्यातरी हॉटेलच्या मोरीत भांडी घासताना ही गळा ताणून ओरडणारी माणसं बघितली की वाटतं कुठं गेली असेल ती गर्जना.
त्‍यानंतरची पिढी माझी. गावाकडं ढिगभर टीव्‍ही चॅनेल आले, सुसाट धावणार्‍या टू व्‍हिलर, काय काय अनेक तर्‍हेच्या फॅशेन, पळून जाऊन लव्‍ह मॅरेज केलेली अनेक प्रकरण आली, जाती जातीत भांडणं आली आणि आलं बाबरी गोध्रा ही प्रकरणंही. हे एकदमच आमच्यावर थोपलं. बाबरी मस्‍जिदीवर झेंडा घेऊन, त्‍वेषाने ओरडणार कोणतरी एक युवक आणि त्याच्या मागे असलेली गर्दीचं चित्र. त्यावेळी नाही म्‍हटलं तरी आमच्या पोरांच्या ते फेमस होतं. आम्‍हाला त्‍यावेळी कळतही नव्‍हतं बाबरी प्रकरण काय आहे ते?  मात्र आपला एक शत्रू आपल्याच समाजात वावरतोय असं त्यावेळी बिनडोक असणारी टाळकी आम्‍हला सांगत. मला तेही भारी वाटे. माझ्याही मनात ते शत्रू असल्याची जाणीव कधी कधी उफाळून येई. आणि मी त्‍यांना शत्रू मानत मनातल्या मनात खदखदत फिरत राही. हे वारं निवडणूका होईपर्यंत डोक्‍यात असे. निवडणूका झाल्या, रिजल्‍ट लागले की पुन्‍हा भानावर येई मी. मग कुठे कुठे ते झेंडे, ते वाघ, ती पत्रक पडलेली दिसत आणि उगाच कसली तरी घृणा वाटे.
पोरं मग दहावी बारावीच्या परीक्षेला लागत, परीक्षा होई आणि रिजल्‍ट लागे. मग ॲडमिशन सुरू झाली की, मग जात पुन्‍हा डोकं वर काढी. गल्‍ली गल्‍लीत असणारे मित्र बोलणासे होत, ॲडमिशन मिळाल्यांवर अदृश्य प्रकारचा बहिष्कार टाकला जाई आणि तुच्छतेनं मग ॲडमिशन कसं मिळालं हे सांगण्यात अर्धा पेक्षा जास्‍त दिवस, शिक्षणदार पोराची आई वडील बहीण भाऊ हे आपली शक्‍ती वाया घालवत, आणि आपला टेंभा कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्यात शड्डू ठोकून उभा रहात. तुम्‍ही आहात ते आरक्षणामुळं आहात, त्यामुळंच तुम्‍ही जिवंत आहात, तुमची गाडी आहे की मग तुम्‍हाला कशाला पाहिजे आरक्षण, आडनाव बदलता मग का घेता आरक्षण, बहिणीनं लव्‍ह मॅरेज केलय म्‍हणून काय त्यांच्या पोरांची जात नाही बदलत, शिकला सवरला म्‍हणून काय देवळात तुम्‍ही पू
जा बांधणार का, आरक्षण पाहिजे तर मग सरहद्दीवर पण आरक्षण मागा आणि सगळ्यात पुढं जाऊन लढाकी, शिवाजी महाराज तुमचे नाहीत, आणि बाबासाहेब आमच्यातले कुठे आहेत असे एक ना अनेक प्रश्न बिनडोक पुढची पिढी कुठल्यातरी कॉलेजला जाणार्‍या पोराला विचारत राहत, आणि विनाकारण त्‍याच्या मनातल्या आत्‍मीयतेला डिवचत रहात. मग कुठे तरी त्‍याचीही भावनाही दुखे आणि रागाच्या भरात राडा होई, आणि सारी गल्‍ली मग त्या पोराच्या विरोधात उभा राही आणि जातीचा नको इतका स्‍वाभिमान बाळगत नाही ते विष मग कालवत फिरत राही...
आता कोण काय सांगत फिरत नसलं तरी जे सांगायचं आहे, जे फिरावायचं आहे ते सहजपणे आता फिरवता येतं. नको तो इतिहास, नको त्या घटना, परंपरा बिनधिक्‍कपणे सांगता येतं, आणि एकाद्यावर खूप सहजपणे बिंबावताही येतं, यात मग खरा इतिहास कुठे जातो माहित नाही, इतिहास तेवढा दूर राहतो, आणि उगाच माथी तेवढी भडकली जातात...
तूर्तास इतकचं...

3 comments:

  1. आपण खांबासारखे मजबूत उभे राहूया. वादळे येतील आणि जातील.

    ReplyDelete

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...