Saturday, 2 December 2017

...तुम्‍ही कुठं जाता ? मिनिटभर आधी


दहावीच्या मुलांसाठी आता एक मिनिट जरी उशीरा झाला तरी विद्यार्थ्यांना आता परीक्षेला मुकावं लागणार आहे. या सरकारच्या निर्णयानं 
माझी शाळा आठवली. माझ्या गावाकडच्या पोरांचे दहावी-बारावीत असताना करावी लागणारी धडपड आठवली. हलकर्णी हायस्कूल हलकर्णी माझी शाळा.हलकर्णीच्या शाळेचे दिवस म्‍हणजे जगलेली शाळा असे होते. पण माझ्या गावाकडच्या पोरांचं तसं नव्‍हतं. घरात काम करून, गाई, म्‍हशींना हिंडवून, त्‍यांची सोय करून मग आपल्या शाळेची सोय. पण हलकर्णीच्या शाळेचं तसं नव्‍हतं. पण लांबू लांबून येणार्‍या पोरांचे हाल हलकर्णी शाळेतही होते. कॉलनीत राहणार्‍या पोरांचे दिवस एकदम सुखाचे. चैनीचे. कारखान्याची शाळा म्‍हणून परिसरात नाव होतं, मान होता. मग काय परिसरातली कित्‍येक पोरं, पोरी हलकर्णीच्या शाळेत येत. करंजगाव, आंबेवाडी, सदावरवाडी, हलकर्णी, धुमडेवाडी, तांबुळवाडी, बागिलगे, नरेवाडी, डुक्‍करवाडी, पाटणे फाटा, तावरेवाडी, अशा कित्‍येक गावची पोरं आमच्या शाळेत होती आणि आताही आहेत, आणि खूप असतीलही.

त्‍यावेळी म्‍हणजे २००१ मध्ये गाड्यांचं एवढं फॅड नव्‍हतं. लांबू लांबून येणारी पोरं सायकल घेऊन येत तर सगळ्या पोरी पायी चालत येत. दहावी-बारावी असली कीआमच्या भागातल्या पोरांची पायपीट दुप्‍पट व्‍हायची. एकदा स्‍टडीरूमला, एकदा जादा क्‍लासला आणि आधेमध्ये कधी कार्यक्रम असले की लांबवरनं येणारी पोरं-पोरी पायपीट करत यायची. कधी, कुणाचा डबा असायचा तर कधी कुणाचा नसायाचाही. शनिवार आणि सकाळच्या शाळा सुरू झाल्या की, लांबच्या पोरांनं मग पाच सहा वाजतातच बाहेर पडावं लागायचं. आणि गावाकडच्या आयाबायांना फक्‍त डबा करून देणं एवढचं काम नसतं. दिवस रात्र एकच असतो. सरकारनं शिस्‍त लागावी म्‍हणून निर्णय घेतला असल्याचं संबंधित खात्याचे मंत्री सांगतात. पण गावाकडच्या माणसांचं जगणं कधीतरी डोकावून बघितलं तर एक मिनिटाचा हिशोब लावताना कळून येतं अरे एवढं सोपं नाही तुमच्या जगण्याएवढं हे जगणं.

कोल्‍हापूरपासून दीडशे पावणे दोनशे किमीवर माझं गाव. गावात अजून बस येत नाही, टीव्‍ही आला तो १९९८ मध्ये. आता दारोदारी पाण्याचे नळ दिसत असले तरी, उन्‍हाळ्यात तीन ते पाच किमी पायपीट असते. तीही आया बायांचीच. परीक्षेच्या काळातच आमच्या भागातील पोरांच्या शाळेच्या आणि जगण्याच्या परीक्षा सुरू होतात. बस फक्‍त आमच्याच गावात येत नाही असं नाही तर चंदगड तालुक्यातल्या अनेक गावात बस जात नाही, येत नाही. पक्‍के रस्‍ते नाहीत. तालुक्‍यातील अनेक गावात दहावीपर्यंत शाळा नाहीत, मग लांब शाळेला जावं लागतं म्‍हणून पोरींना चौथी, सातवीपर्यंतच शाळा शिकावी लागते, आणि मिनिटभर उशीर झाला तर परीक्षेला मुकावं लागणार असं शासन आमच्या पोरांना सांगतं.
इथं शाळेसाठीच आयुष्याची तारांबळ उडते. अजूनही. नीति नियम आयुष्यासाठी ठिक वाटत असले तरी गावाकडच्या पोरांचं आयुष्य कुठं असतं ठिक. असलेल्या शाळा बंद करत चाललाय आणि मिनिटाचा हिशोब मागताय तुम्‍ही.

माझ्या गावाकडं या कधीतरी. गावाकडचे धनगरवाडे बघा, प्रकल्‍पग्रस्‍त बघा, दलित, मागास, गरीबांची दैना बघा. मग भले तुमचे नियम आमच्या आयुष्याला शिस्‍त लावत असतील, पण आमचं जगणं तुमचे नियम हिरावून घेत असतील तर तुमचे नियम तुम्‍हाला लखलाभ असू द्या.

No comments:

Post a Comment

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...