Saturday, 30 December 2017

दक्षिणेतील देव राजकारणात येतोय....

जनीकांत तामीळ जन
तेला आपला वाटणारा, हक्‍काचा असा अभिनेता. आता तो राजकारणात प्रवेश करतो आहे. तशी घोषणा त्यांनी काही दिवसापूर्वी केली आहेच. ते इतर कुठला राजकीय पक्षात प्रवेश करणार नाहीत तर आपला स्‍वतंत्र पक्षच काढणार आहेत.

दक्षिण भारतातील सामान्य माणसांना रजनीकांत म्‍हणजे देव वाटतो. चित्रपटातील अनेक स्‍टाईल त्‍याच्या प्रसिध्द आहेत.

एकादा सामान्य कारपेंटर दक्षिणेतील सुपरस्‍टार बनला या गोष्टीवर खुद्द रजनीकांतसुध्दा कधी विश्वास ठेवणार नाही. मात्र तसे रजनीकांतच्या आयुष्यात झाले आहे. आजचा सुपरस्‍टार रजनीकांत सार्‍यांना दिसत असला तरी तो काही एका दिवसात घडला नाही, किंवा एका सिनेमानंतर तो लगेच सुपरस्‍टार झाला असं झालं नाही, कधी बस कंटक्‍टर, कधी कारपेंटर तर कधी मिळेल ते काम करून रजनीकांत सुपरस्‍टार झाला आहे.
नाटक, सिनेमांची आवड रजनीकांत यांना होतीच, मात्र त्‍यावेळी त्‍यांना पैशाचीही टंचाई होती. या सगळ्यात त्‍यांनी कधी आपल्यातला कलाकार मरू दिला नाही. पैशाची चणचण असतानाही त्यांनी मग मद्रासच्या फिल्‍म इन्‍सिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. १९७५ मध्ये आलेल्या अपूर्व रागड्‌गल चित्रपटातून त्यांनी सुरूवात केली आणि तो चित्रपट राष्ट्रीय पारितोषिक विजेता ठरला.

१९५० मध्ये बेंगळूर येथील मराठा हेंद्रे पाटील यांच्या कुटुंबियात त्यांचा जन्‍म झाला. शिवाजीराव गायकवाड असं त्यांचं पूर्ण नाव. आई जिजाबाई आणि रामोजीराव गायकवाड हे त्‍यांचे आई वडील. १९८१ मध्ये त्‍यांचा विवाह रंगाचारी यांच्याशी झाला. रजनीकांत यांना दोन मुली आहेत. रजनीकांत यांनी मागील निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली होती. मात्र त्यावेळी त्‍यांनी कोणताही पक्षाची घोषणा केली नव्‍हती.
-एएनआयवरून

Sunday, 24 December 2017

चालणार्‍या आणि वाहणार्‍या दुर्गांंची ही कथा



बिहारच्या रामगड जिल्‍ह्यातील कैमूर तालुक्‍यातील ही घटना. जमुरना गावातील लेकधनींंच्या आयुष्यातील ही चित्तरकथा. शाळा शिकण्यासाठीच पुर्‍या आयुष्याची जोखीम पत्‍करून जमुरना गावाच्या या लेकीबाळी दुर्गावती नदीतून शाळेला जातात. शाळेला जाणार्‍या प्रत्येकीच्या वाट्याला आलेली ही जोखीम. ऋतू कोणताही असो पावसाळा, हिवाळा किंवा उन्‍हाळा धोका कुणाला टळला नाही. सकाळ झाली की घराचं आवरून गावातील प्रत्‍येक लेकधन नावेत येऊन थांबते. गावातील सार्‍या पोरी जमल्‍या की, मग यांचा शाळेकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. जीव मुठीत धरून त्या दुर्गावती नदी पार करतात, आणि काठावर आल्या की हुश्श! करून श्वास सोडत पुन्‍हा मग शाळेचा रस्‍ता धरतात. २०१६ मध्ये ही नाव पाण्यात बुडाली होती, पण रोज याच नावेतून जाणार्‍या पोरी पाण्यातून पोहत सहीसलामत बाहेर पडल्या. उद्या पुन्हा हाच खेळ म्हणत दुसर्‍या दिवश बोटीमध्ये पुन्हा हजर.

शाळेत नाव दाखल झालंं की जमुरना गावातील प्रत्येकाचा हा शाळेसाठीचा संघर्ष. सध्याची मुलांंना आता दुचाकी आहेत. म्हणून कालांंतरानंं पोरंं दुचाकीनंं शाळेत जाऊ लागतात. पोरींंच्या आयुष्याती ही नाव शाळा संंपेपर्यंंत वाट्याला हेच. कैमूर तालुक्‍याच्या ठिकाणी, जवळच्या गावांना जाण्या येण्यासाठीही याच नावेचा आधार. ज्यांच्याजवळ वाहने आहेत ते सहज जाऊन येतात मात्र ज्यांच्याकडे वाहने नाहीत असे नागरिक, शाळकरी मुले मुली मात्र दुर्गावती पात्रातून नावेतून वाट काढत आपली पुढची वाट चालू लागतात.

जमुरनातून दुर्गावती नदी पार केली चौरसिया गावाचे अंतर कमी होते. गावातील ८० टक्‍क्‍यांंपेक्षा जास्‍त लोकांची जमीन नदी पलिकडे आहे. मग नदीपार केल्याशिवाय इथल्या शेतकर्‍यांनाही शेती करायला मिळत नाही. पावसाळ्याच्या दिवसात शेतकरी, शाळकरी मुलं पाऊस जाण्याची वाट बघतात. मुसळधार पावसात दुर्गावती दुथडी भरून वाहते. यावेळी सगळ्यांचे व्‍यवहार सगळे ठप्प होतात, बंद होतात, शाळा चुकते आणि नुकसान होते. येथील अनेक पोरींना शिकून मोठं व्‍हायचय, बदल करायचे आहेत आणि आपल्या गावाला जोडणारा एक रस्‍ताही बनावयाचा आहे म्‍हणून आम्‍ही आता नावेतून शाळेला जातो असं त्या हसत हसत बोटीतून उतरताना सांगतात.

Saturday, 2 December 2017

...तुम्‍ही कुठं जाता ? मिनिटभर आधी


दहावीच्या मुलांसाठी आता एक मिनिट जरी उशीरा झाला तरी विद्यार्थ्यांना आता परीक्षेला मुकावं लागणार आहे. या सरकारच्या निर्णयानं 
माझी शाळा आठवली. माझ्या गावाकडच्या पोरांचे दहावी-बारावीत असताना करावी लागणारी धडपड आठवली. हलकर्णी हायस्कूल हलकर्णी माझी शाळा.हलकर्णीच्या शाळेचे दिवस म्‍हणजे जगलेली शाळा असे होते. पण माझ्या गावाकडच्या पोरांचं तसं नव्‍हतं. घरात काम करून, गाई, म्‍हशींना हिंडवून, त्‍यांची सोय करून मग आपल्या शाळेची सोय. पण हलकर्णीच्या शाळेचं तसं नव्‍हतं. पण लांबू लांबून येणार्‍या पोरांचे हाल हलकर्णी शाळेतही होते. कॉलनीत राहणार्‍या पोरांचे दिवस एकदम सुखाचे. चैनीचे. कारखान्याची शाळा म्‍हणून परिसरात नाव होतं, मान होता. मग काय परिसरातली कित्‍येक पोरं, पोरी हलकर्णीच्या शाळेत येत. करंजगाव, आंबेवाडी, सदावरवाडी, हलकर्णी, धुमडेवाडी, तांबुळवाडी, बागिलगे, नरेवाडी, डुक्‍करवाडी, पाटणे फाटा, तावरेवाडी, अशा कित्‍येक गावची पोरं आमच्या शाळेत होती आणि आताही आहेत, आणि खूप असतीलही.

त्‍यावेळी म्‍हणजे २००१ मध्ये गाड्यांचं एवढं फॅड नव्‍हतं. लांबू लांबून येणारी पोरं सायकल घेऊन येत तर सगळ्या पोरी पायी चालत येत. दहावी-बारावी असली कीआमच्या भागातल्या पोरांची पायपीट दुप्‍पट व्‍हायची. एकदा स्‍टडीरूमला, एकदा जादा क्‍लासला आणि आधेमध्ये कधी कार्यक्रम असले की लांबवरनं येणारी पोरं-पोरी पायपीट करत यायची. कधी, कुणाचा डबा असायचा तर कधी कुणाचा नसायाचाही. शनिवार आणि सकाळच्या शाळा सुरू झाल्या की, लांबच्या पोरांनं मग पाच सहा वाजतातच बाहेर पडावं लागायचं. आणि गावाकडच्या आयाबायांना फक्‍त डबा करून देणं एवढचं काम नसतं. दिवस रात्र एकच असतो. सरकारनं शिस्‍त लागावी म्‍हणून निर्णय घेतला असल्याचं संबंधित खात्याचे मंत्री सांगतात. पण गावाकडच्या माणसांचं जगणं कधीतरी डोकावून बघितलं तर एक मिनिटाचा हिशोब लावताना कळून येतं अरे एवढं सोपं नाही तुमच्या जगण्याएवढं हे जगणं.

कोल्‍हापूरपासून दीडशे पावणे दोनशे किमीवर माझं गाव. गावात अजून बस येत नाही, टीव्‍ही आला तो १९९८ मध्ये. आता दारोदारी पाण्याचे नळ दिसत असले तरी, उन्‍हाळ्यात तीन ते पाच किमी पायपीट असते. तीही आया बायांचीच. परीक्षेच्या काळातच आमच्या भागातील पोरांच्या शाळेच्या आणि जगण्याच्या परीक्षा सुरू होतात. बस फक्‍त आमच्याच गावात येत नाही असं नाही तर चंदगड तालुक्यातल्या अनेक गावात बस जात नाही, येत नाही. पक्‍के रस्‍ते नाहीत. तालुक्‍यातील अनेक गावात दहावीपर्यंत शाळा नाहीत, मग लांब शाळेला जावं लागतं म्‍हणून पोरींना चौथी, सातवीपर्यंतच शाळा शिकावी लागते, आणि मिनिटभर उशीर झाला तर परीक्षेला मुकावं लागणार असं शासन आमच्या पोरांना सांगतं.
इथं शाळेसाठीच आयुष्याची तारांबळ उडते. अजूनही. नीति नियम आयुष्यासाठी ठिक वाटत असले तरी गावाकडच्या पोरांचं आयुष्य कुठं असतं ठिक. असलेल्या शाळा बंद करत चाललाय आणि मिनिटाचा हिशोब मागताय तुम्‍ही.

माझ्या गावाकडं या कधीतरी. गावाकडचे धनगरवाडे बघा, प्रकल्‍पग्रस्‍त बघा, दलित, मागास, गरीबांची दैना बघा. मग भले तुमचे नियम आमच्या आयुष्याला शिस्‍त लावत असतील, पण आमचं जगणं तुमचे नियम हिरावून घेत असतील तर तुमचे नियम तुम्‍हाला लखलाभ असू द्या.

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...