मि. इंडिया, सदमा हे चित्रपट जेव्हा टीव्हीवर लागत होते, तेव्हा आमच्या घरात टीव्ही नव्हता. कामगार वसाहतीत तेव्हा राहत होतो. त्यावेळी शेजार्यापाजर्यांच्या टीव्हीवर जाऊन पिक्चर बघत बसू. खरं सांगायचं तर त्यावेळी तुझं नाव ही नीटसं मला माहित नव्हतं. पण तुझा मि. इंडिया आणि सदमा हे चित्रपट मी टीव्हीवर बघितले होते. तुझे चित्रपट मला थिएटरवर कधीच पाहता आले नाहीत. आणि ते वयही नव्हतं थिएटरवर जाऊन बघण्याचं, पण २०१२ सालात तू पुन्हा दमदार एन्ट्रीने पुनरागमन केलीस.English Vinglish त्यावेळी सदमासारखाच भावला मला. त्यावेळी थिएटवर पाहिलेला तुझा तो मी पाहिलेला पहिला सिनेमा होता. मोठ्या पडद्यावर पाहताना मला पुन्हा त्या कॉलनीतील आणि मि. इंडियाची आठवण झाली. ती अगदी चित्रपटगृहातून निघेपर्यंत निघाली नाही. तिच आठवत राहिलीस कधी तुझ्या खर्या रूपात, कधी चार्ली चॅप्लिनच्या तर कधी समुद्रावर पायांच्या खूणांनी पुढं पुढं सरकणारी तू मि. इंडियासारखी लाल काचेच्या पडद्याआड असावीस तशी वाटत राहिलीस.मि. इंडिया किंवा सदमा पाहताना तुझ्याविषयी एक जवळीक वाटायची. ती नंतर नंतर वाढत गेली. खुदागवा, जुदाई, नगिना असं आधलेमधले चित्रपट पाहत राहिलो, हवा हवा हवाई म्हणत गुणगुणत राहिलो.
तुझ्या एक्झिटनंतर माझ्या लॅपटॉपवर असलेला सदमा पुन्हा पाहताना एक अस्वस्थतेची जाणीव होत राहिली. हवा हवाई म्हणत, किंवा सदमामध्ये तू आयस्क्रीम खात असतानाची तू आठवत राहिलीस. मि. इंडियातील कॅलेंडरला तू हाक मारताना मला तू कमालीची आवडायचीस. लहान होतो म्हणून असेल कदाचित पण त्यावेळी मलाही वाटायचं की तुझ्यासारखी एकादी सीमा आपल्याही आयुष्यात हवी जी मुलांची काळजी घेते तशी आपल्याही मित्रांच्यात असावी. ते दिवस कैक काही वाटण्याचे होते म्हणून बरचं काही वाटत राहिलं होतं.
खरं सांगायचं तर मला तुझ्यापेक्षा तो मि. इंडियाच आवडे. त्याचं गायब होणं, गरजवंतांच्या मदतीला धावून जाणं, कॅलेंडरबरोबर मुलांमध्ये मिसळून रहाणं, मोगाम्बोसारखं एकादं पात्र दृष्ट असलं तरी ते आवडण्याचं वय होतं ते माझं. त्या लाल काचेतून बघताना आणि त्याशिवाय न दिसणारा मि. इंडिया माझ्या वयाच्या पोरांच्या गळ्यातील ताईत होता. तर तू सोबतीण असल्यासारखी वाटायचीस.
निष्पाप नात्यांची कथा सांगणारा सदमा आता पाहताना आणि त्यावेळी पाहताना कितीतरी मोठं अंतर पडलंय पण आजही तो आवडत्या सिनेमाच्या यादीत खूप वर आहे. पण त्यावेळी तुझ्याकडं मी असाच ओढला गेलो. तुझ्या निरागस आणि निरपेक्ष सवालांनी त्यावेळचा माझा काळ असा भारवलेला आणि अस्वस्थदायीच होता. सदमा पाहताना नेहमी एक अस्वस्थतेची झालर माझ्याबरोबर जोडली जायची. म्हणूनच त्यावेळी कधीतरी बघितलेली रेश्मी, सोमू मला आजही तेवढ्याच तीव्रतेने आठवतात.
कळत नव्हतं तेव्हा पण आयुष्यात आवड नावडण्याची प्रोसेस सुरू झाली होती त्याकाळातच रेश्मी, मि. इंडिया, कॅलेंडर म्हणून ओरडणार्या अभिनेत्रीचं नाव श्रीदेवी आहे हे खूप काळानंतर समजलं पण त्याआधीच श्रीदेवी नावाच्या अभिनेत्रीनं माझ्या मनावर गारूड घातलं होतं. ते कायम राहिल. कधीतरी कुठेतरी हरल्याची, दु:खाची, एकाकीपणाची, अस्वस्थदायी अशी सायंकाळ जेव्हा जाणवेल तेव्हा,
ऐ ज़िन्दगी गले लगा ले
हमने भी तेरे हर इक ग़म को
गले से लगाया है, है न
हे गाणं असच मनात रेंगाळत राहिल आणि तू आहेस असंच वाटत राहिल.
आपले लिखाण खूप छान आहे। आपण लवकरच एखाद्य पुस्तक लिहावं असं वाटतं आम्हा पामराना
ReplyDeleteभावुक शब्द श्रद्धांजली
ReplyDeleteखूप कातर एक्झिट घेतली तिने...
ReplyDeleteसदमा म्हणजे तिच्याकरताच होता व जातांनाही तिने सदमाच दिला .
ReplyDelete