Friday, 16 February 2018

मऊशार हातांच्या मायेची शांत लयीची सायंकाळ

सायंकाळ झाली की, म्‍हातारीच्या डोंगरावरच्या गवतात लोळत पडणं नेहमी अचंबित करणारं होतं. का माहित नाही पण हिवाळाचे दिवस सुरू झाले की, ढगाकडं बघताना अशी काय अनामिक हुरहूर लागल्यासारख्या वाटायची की ती अनामिकच रहायाची. निरभ्र ढग कुठूनपासून कुठेपर्यतं पसरलेले दिसायचे. ढगांचा कुठूनतरी एक धागा पकडावा आणि दूर दिसणार्‍या कुठल्यातरी डोंगरावर नेऊन ठेवावा असं वाटायचं. पण ढगांची सुरूवात आणि शेवट कळतच नव्‍हती. ढगच ढग पसरलेले असायचे. आनंदी, मलूल, अस्‍वस्‍थदायी, पळणारे, थांबणारे, चकाकणारे, काळेकुट्टू, पांढरेशुभ्र असे बरेच ढग असत. डोळ्यांच्या अवकाशात. डोळे फिरतील तसे ढगांचे विविध चेहरे दिसत. सोनेरी कडा असलेले ढग कुणीतरी रंगवावेत तसे वाटायचे. आतून कुठून तरी सूर्याची तिरपी किरणे तीव्रतेने बाहेर पडत आणि त्या तीव्र कोमल प्रकाशात वेगाने झेपावणारे कावळे मला सुंदर भासत. ढगातून जाणारे कावळे माझ्या समान  आले की, काव..!असा आवाज करून म्‍हातारीच्या डोंगरावरची शांतता ते एकदम भंग करीत. पण त्‍यावेळी कावळे सुंदर वाटत, आणि मान तिरकी करुन पुढच्या प्रवासाला मग पुन्‍हा ते मार्गस्‍थ होत.

रंगबेरंगी ढगांच्या खाली आमच्या गावच्या बारीचं चित्रंही त्यावेळी मला प्रचंड सुंदर दिसे. गडद हिरव्‍या रंगात पसरलेली ती दाट झाडी, बांबुच्या बेटी, पिवळ्या रंगानी लगडलेल्या फुलांची बाहव्‍याची झाडं, रिकामी आणि रिती रिती वाटणारी शेतवड हे चित्र बघताना नेमकं काय वाटायचं सांगता येणार नाही, पण खूप काय तरी माझ्या मनात आहे असं वाटायचं. सगळा दिवस तिथं शांत, मलूल होऊन थांबलाय असंही वाटे. त्‍या गर्द झाडीच्या एका कोपर्‍यातून काळाकुट्ट लांबवर जाणारा डांबरी रस्‍ता दिसायचा. अनेक वाहने असायची. त्या रस्‍त्यावरून एखादा ट्रक खूप वेगानं येताना दिसे, राँय, राँय असा आवाज यायचा आणि हळू हळू आवाज कुठच्या कुठे तर निघून जाई.

मग कधी तरी सायंकाळ मध्येच गडद झाली, काळीकुट्ट रात्र येण्याआधी म्‍हातारीच्या डोंगरावरून पुन्‍हा घरी परतताना अस्‍वस्‍थतेचं मलूल आकाश मनात दाटून राही. तेव्‍हा शेतवडीतल्या बाहव्‍याच्या झाडावरून एक पांढरा शुभ्र बगळा मोकळ्या आकाशात झेपावताना दिसायचा. त्या अंधूक अंधूक रात्रीत तो पांढरा शुभ्र बगळा, त्या रित्या रित्‍या शेतवडीत खूप अस्‍वस्‍थपणे घिरट्या घालतोय असं वाटत राही. तरीही तो गडद बगळा त्या शेतात उठून दिसे. एका लयीत तरंगत राही आणि संथ गतीनं वर वर जाई, आणि मग त्‍या लयीत तो डोंगराच्या दाट झाडीत तो कुठेतरी लुप्‍त झाल्यासारखा दिसेनासा होई.

मग बगळ्याचा विचार मनात कितीतर वेळ घिरट्या घालत राही. कुठे गेला असेल? त्‍याच्या घरी कुणी कुणी असतील?, तो अस्‍वस्‍थ आहे की त्याची अस्‍वस्‍थपणाची जातकुळीच आहे, बगळ्यासारखं शांत आणि संथ इतर पक्षी का तरंगत नसावेत, त्याच्या अस्‍वस्‍थ डोळ्यात कशाची करूणा असेल किंवा कुणासाठी तो करूणा भाकत असेल किंवा असंही वाटे मोरासारखं, कबुतरासारखं, भारद्वाजासारखं, घुबडासारखं याचा कशातच का उल्‍लेख आढळत नाही? असे अनेक प्रश्न डोक्‍यात येत असत. मग बगळ्याच्या विचारात माझे घराकडे वळणारे पायही म्‍हातारीच्या डोंगरावरच घुटमळत राहत. रात्र गडद नसे, त्‍या सायंकाळच्या रात्रीत म्‍हातारीचं थडगं किती उदास दिसे. त्या काळोखातही. जातान मी हळूच त्या थडग्यावर दगड मारी. मग म्‍हातारी माझ्याकडं चमकून बघते आणि मऊशार हाताने माझ्या गालावरून हात फिरवते असा भास त्‍या शांत लयीच्या काळोखात होई...

-महादेव पार्वती रामचंद्र

No comments:

Post a Comment

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...