Wednesday, 31 January 2018

आम्ही शेतकर्‍याची पोरंं पण...

शाळेत असताना देश आपला काय आहे? असं विचारलं तर पोटतिडकीनं, गळ्याच्या शिरा ताणून ओरडून ओरडून 'कृषीप्रधान' म्‍हणण्यात केवढा आनंद वाटायचा. नंतर नंतर कृषीप्रधान शब्द कानावर पडला की, शेताचे बांध, झाडं, गुरं, पिकावर येणारी पाखरं, पावसाळ्याच्या दिवसात गडद हिरवं झालेलं शेत आठवायचं. ते डोळ्यासमोर दिसे. मग शाळा, कॉलेज नंतर शहरात शिकायला आल्यावर असं कृषीप्रधानतेशी वाचण्यापुरता आणि कुठल्या तरी अर्जात वडीलांच्या व्‍यवसायासमोर शेती असं लिहाण्यापुरताचा संबंध आला, अन्‌ तसा संबंध ठेवला. शेतीशी आणि शेतकर्‍यांशी नाळ कधी जुळली नाही आणि जुळू दिली नाही.  
बाप शेती करतो, असा सांगण्यापुरता अभिमान, नाही तर मित्र मैत्रिणींना ठासून सांगायला बरं वाटतं म्‍हणून. शेतकर्‍यांबरोबर असलेली नाळ कधी झुळली नाही, अन्‌ कधी जुळवून घेतली नाही. का? तर ते शेतात राबतात, घामाचा वास येतो, हातपाय मातीत राड झालेले असतात, त्यांचे कपडे बॅण्डेड नसतात, पसरून राहणारा कोणताही बॉडीस्‍प्रे ते अंगावर मारत नाहीत अथवा शेतात मायचे केस कधी तजेलदार आणि स्‍मूतही नसतात. म्‍हणून आम्‍हाला ते कधी आपले वाटले नाहीत, बाकी कृषीप्रधान हे शब्द ऐकायला आणि लिहायला तेवढेच बरे वाटले. बाकी सगळं अलाहिदा....
धर्मा पाटील शेतकर्‍यांनं आत्‍महत्‍या केली आणि सगळा सोशल मीडिया शेतकर्‍याच्या दु:खानं ढवळून निघाला. अगदी हीन पातळीवर जाऊन शासनावर, राज्यकर्त्यांवर टीका झाली, सोशल मीडियावर अनेक ग्रुपही ॲक्‍टिव्‍ह झाले. शेतकर्‍यांचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत टेक्‍नोसेव्‍ही पिढीनं सोशल मीडियावर दुखवटा पाळला, सरकारची आईबहीण काढून ही पिढी रिकामी झाली अन्‌ पुन्‍हा आपल्या मोबाईलमध्येही ती दंगही झाली. 
शेतकर्‍याचा मृत्यू होतो तेव्‍हा, ते दु:ख फार तात्‍कालीक असतं, तेवढ्यापुरतं तीव्र वाटणारं असतं. सध्याच्या जगात तसा कुणाचा समोरासमोर दुरान्‍वयेही शेतकर्‍याचा संबंध येत नाही. शेती काय असते आणि त्‍यातील राबणूक मरमरणं काय असतं हे शहरातल्या सध्याच्या पिढीला कुठं माहित असतं. त्यांना शेतकर्‍यापेक्षा इतर गोष्टी महत्‍वाच्या आणि काळजीच्या वाटतात. 
आम्‍ही शेतकर्‍यांची पोरं एवढं म्‍हटलं म्‍हणजे आमच्या पिढीची जबाबदारी संपते, त्‍यानंतर कशाचाही आमचा शेतकर्‍यांशी दुरान्‍वये संबंध येत नाही आणि आला तरी तो आम्‍ही येऊही देत नाही.
शाळा, काॅॅलेज, विद्यापीठ, नोकरी लग्न हा प्रवास सुरू राहतो. शेतकर्‍याचा मात्रंं शेती, कष्ट, शेती आणि मरण या पलिकडंं तो जात नााही. अााणि गेलााच तर सरकार मायबाप आहेच की, वेगाला खीळ बसवायला. त्या वेगानंं गती घेतली काय किंंवा मंंदावली काय, आम्हा त्याच्या पोरांंना काही फरक पडत नााही. सो काॅॅल्ड जगात राहणारी पोरंं मात्रंं शेतकर्‍यांंनी केलच आंंदोलन तर मग बघा यांंना आणि काय पडलंं म्हणत कुचेष्टाचा स्वर या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंंत सुरूच ठेवायचा, आणि झालीच आत्महत्या तर मग महागाईचा डांंगोरा पिटत रहायचा कायम.
धर्मा पाटील गेले तेव्‍हाची गोष्ट. जमिनीला योग्य मोबदला मिळाला नाही म्‍हणून मंत्रालयात खेटे मारूमारूनही शासनाने दखल घेतली नाही मग मंत्रालयातच विषप्राशन केले. अन्‌ जीवनयात्रा संपवली. शेतकर्‍याचं आयुष्याचं वैराण वाळंवटासारखं आहे. ना एैल आहे ना पैल. पीक आलं तर पाऊस नाही, पाऊस आला तर पीक नाही, अशी एक ना अनेक समस्यांचा डोंगर. तरीही यातून तो जगत राहतो, जगण्यासाठी धडपडतो, पोरांबाळांना शिकवतो, मोठ्ठं करतो आणि आपण मात्रं पुन्‍हा शेताच्या बांधावर घाम घाळत काळ्या जमिनीच्या हवाली होतो. शेती म्‍हणजे नोकरी नव्‍हे. आठ तास काम केलं की, मोबादला हा मिळतो असं कधी होत नाही. वर्षभर राबूनही हातात पिकांच्या पालापोचाळा घेऊन कधी कधी घराची वाट धरायची आणि पुन्‍हा उद्या हाच खेळ म्‍हणत उद्याची जोडणी करायची. दु:ख भोग हे कधी सुटलं नाही त्याच्या आयुष्यातून ते सुरूच आहे.
गावाकडचा शेतकरी कधीतरी शेतकरी शहरात माल विकायला शेतात येतो तेव्‍हा, शहरातला सुखी संपन्‍न माणूस ताज्या मालाला नाकं मुरडत, त्‍याची किंमत करीत, त्याच्यावर आवाज वाढवत, द्या आता, माहित आहे तुमचा माल ताजा आहे
असं त्‍याच्याच तोंडावर सुनावत, त्याच्याच मालाची कवडीमोल भावानं मागणी केली जाते, आणि हताश शेतकरी मिळेल ते पदरात पाडून तो शेवटच्या बसनं घराची वाट धरतो, चकचकीत काचेआड बसलेल्या माणसांच्या दुनियेचा विचार करत घरात जातो खरा पण उद्याचा प्रश्न असतोच त्याच्यासमोर आ वासून उभा. 
ब्रॅण्डेडच्या नावाखाली विकल्या जाणर्‍या वस्‍तूंना म्‍हणेल ती किंमत देत, ब्रॅण्डेड आहे असं ओरडून सांगत आपल्याकडं असणार्‍या वस्‍तूंची जाहिरात करणार्‍या या पोरा पोरींना शहरात विकायला आलेल्या भाजीवाल्या शेतकर्‍याची भाजीपाला म्‍हणजे कवडीमोल वाटतो, आणि कुजवलेले ब्रेड खाऊनही ब्रॅण्डेड खातो असं सांगताना त्‍यांची छाती ५६ नाही तर शंभर इंच होते. 
कुणाला काहीच नाही, शेतकरी राबतो आणि कधी राबता राबता तर कधी कुठलं तरी फवारणी द्रव्‍य पिऊन, नाही तर बांधावरच्या झाडाला गळफास घेऊन जीव संपवतो. आम्‍हाला त्‍याचं काहीच नाही. देशाला नव्‍हे पण माणसांना जगवणार्‍या या किमयागाराला उपाशी ठेवण्यातच आम्‍ही वर्षानुवर्षे धन्यता मानत आलो... 
आताही तसच झालंय धर्मा पाटील यांनी मंत्रालयात जाऊन जीवन संपवलं म्‍हणून आम्‍हाला त्याची तीव्रता वाटली, जाणवली. नाही तर रोज कित्‍येक धर्मा पाटील विषानं, नाही तर गळफासानं जीव द्यायला बांधाबांधावर बसून आहेत, त्यांच्याकडं कसं काय कुणाचच लक्ष नाही...

Sunday, 14 January 2018

शहरात आहे ती गर्दी वेगळीच आहे

ध्यरात्र कधीच उलटून गेलेय. रात्रीतल्या घनगंभीर काळोखाचं अस्तित्व कुठेतरी लोप पावलय या काळोखात. पुरं शहर झोपेच्या आधीन गेलय आणि शहरातले पुतळे तेवढे पहारा देत उभा आहेत शहराभर. माझ्या ऑफिसच्या बाहेर आलो तर पेपरवाली मुलं, हाताच्या चलाखीवर पुरवणीत जाहिरातीची पत्रकं घुसडताहेत. जाहिरातीसारखचं त्यांचं थोपवणं चालूय. आता खरं तर हा साखर झोपेचा काळय, मात्र ही पोरं चेहर्‍यावर साखरेएवढा गोडवा घेऊन त्यांचे हात राबताहेत. चित्रं सुंदरय पण जगणं वाईटय. मला उगाच वाटलं दिवसा ही पोरं, कुठं जात असतील किंवा दिवसाची साखर झोप यांना लागत असेल का? प्रश्न अनुत्तरित. मग नंतरचा माझा प्रवास सुरूच झाला. ऑॅफिस ते बस स्टॅण्ड चालताना हे शहर वेगळच भासत राहिलं. काळोखाचं अस्तित्व नाहीसं झालय तसच या शहरातली  काही तरी मोठी गोष्ट नाहीशी झालेय. शहर कदाचित त्याच नाहीशापणाच्या शोधात असेल, किंवा शहरानचं हळूवारपणे आपल्यातलं आपलेपण सोडूनही दिलं असेल.

रात्र अजब असते. स्वप्नांचा कल्लोळ, निद्राधीन माणसं, मनं, थडपडणारे, शांततेच्या महासागरासारखे, सळसळणारी, कुजबूजणारी आणि आलेलं जीवन गपगुपान जगणारी माणसं शहरात कुठेच कमी नाहीत. आणि अस्‍वस्‍थ माणसांची मनं माणसांशिवाय ही शहरात वेगळीच आणि अधिकच ही गर्दी. माणसं काय या सगळ्याला निमित्तं. चालताना वाहनांचा उजेड हॉर्न, कुत्र्यांचं भुंकणं, खांबावरचा तीव्र प्रकाश, एटीएम सेंटरच्या आता लुकलुकणारा तो हिरवा सिग्नल आणि पैशासाठी मध्यरात्र ओलांडून गेल्यानंतरही देहविक्रय करणार्‍या बायांना बघून मन मरुन जातं. त्यांचा राग येत नाही, त्यांच्या जगण्याची घृणाही वाटत नाही. कुठे तरी दया येत रहाते. डोळ्यात त्यांच्या सुरमा नसेल, साधच कुठलं तरी काजळ असेल, आणि बर्‍याच काळानंतर त्याच काजळानं नजर अंधूकही होत असेल. कदाचित कालांतराने डोळे जात असतील. तरीही त्यांचं जगणं चालूचय. थांबत नाही किंवा थांबूही देत नाही. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे ते निरंतर दुःख चालूच आहे त्यांचं. पिवळ्या प्रकाशात आरपार दिसणारं शहर त्यांनी ते कधीच बघितलं असेल, आतून बाहेरून. म्हणून त्या बिनधक्कपणे शहरात थांबत असतील. कोणत्याही नात्यागोत्याशिवाय. तिथे कधीतरी थिएटर होतं. जिथं मी पहिल्यांदा देवदास सिनेमा पाहिला होता. मग माझ्या मनात आता देवदास सिनेमा चालू झाला. देवदासचं ते दुःख मला प्रचंड आवडतं. मनात देवदास चालू असताना रिक्षावाल्यानं स्टॅण्ड काय? असं त्राग्यानं विचारलं, मी नाही म्हटल्यावर तो चौकात जाऊन थांबला.

मग पुन्हा चालणं सुरू. मगाशीच अक्षयनं विचारलं, प्रवास चाललाय का? तर हो म्हटलं. ते असं आता सहज आठवलं. फुटपाथवर, बंद दुकानांसमोर, रस्त्याकडेला, दुकानांच्या, वाहनांच्या अडोशाला कित्येक निद्राधीन माणसं उघड्या अंगाने झोपेच्या आधीन गेलेत. ती कोणत्या स्वप्नाप रंगत असतील? रात्रीच्या काळोखात सुंदर झोप घेणं एवढचं स्‍वप्‍न असेल की स्‍वप्‍नांचे इमल्यांसारखेच घरांचे इमलेही उभा रहात असतील.

Wednesday, 10 January 2018

कारखान्यानंं दिलंं काय; जगणंं अन् मरणंं

कारखाना. कारखाना म्हणजे माझ्या पिढीला दिवसा पडलेलं एक सुंदर स्वप्न. माझ्यावेळी कारखान्यात सगळच आलबेल होतं. एकाद्या चित्रात सुखी, सुंदर कुटुंब बघावं तसं कारखान्याचं चित्र होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाकडे तेथे एक गोष्ट होती. सुख आणि आनंद. आता ते दिवस आठवले की, क्षणात कित्येक आनंदी दिवसांची रांग लागते, जंत्री जमते, आणि एका विशिष्ट टप्प्यावर येऊन ती थांबते. ती पुढं सरकत नाही आणि मागे भुतकाळातही जात नाही. कारखान्याची धडधड थांबली असली तरी ह्रदयात तेवढी ती वाढत राहते आणि माणसांची धडधड थांबल्याच्या गोष्टी ऐकू येतात.

आज दुपारी कारखान्याच्या कॉलनीत दहावीची मुलगी उपचाराविना गेल्याचे मेसेज येत राहिले. आणि उगाच ते आमचे ऐशोआरामीचे दिवस आठवले. रात्र होण्याआधी लख्ख उजेडात चमकणारी कॉलनी आठवली, आणि पाण्याचा झरा लागवा तसं वाहनारं पाणीही आठवलं. किती सुखात गेले ते दिवस. आता जर कुणी ते सांगत असेल तर उगाच एकाद्याला अतिशयोक्‍ती असल्यासारखी वाटेल. त्या मुलीच्या मृत्यूनं कॉलनीतील माणसं आठवली, राहिलेली, गेलेली आणि झगडत असणारी सगळी माणसं आहेत तशी आठवली. कॉलनीत कुणाचा मृत्यू झाला नाही असं नाही, पण आताची डोळ्यादेखत वाढणारी पोरांचं जाणं हे काळीज चरकावणारी गोष्ट आहे. कॉलनीत असताना कुणाचा अपघाती तर कुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता. अशा घटना तुरळक होत्या, आणि माणसं सुखी आणि मजेत राहणारी होती.
नंतर नंतर मात्र कारखान्याच्या कॉलनीत तुरळक असणारं मरण , नंतर सहज आणि सोपं झालं. कुटुंब उद्धवस्‍त झाली, अगदी देशोधडीला लागली नसली तरी जगण्याचा प्रश्न गंभीर झाला. आता कधी तरी कोणतरी भेटलं की, मरता येत नाही म्‍हणून जगायचं असं कातर स्‍वरात सांगतात तेव्‍हा कारखान्याला शिव्या द्यावाशा वाटतात, आणि नंतर पुन्‍हा मायेचं पांघरून असणारा कारखाना होता म्‍हणून वाढलो, शिकलो असंही वाटतं. कारखान्यावर असलेल्या प्रत्‍येकाला कारखाना म्‍हणजे आपल्या घरातला सदस्य वाटत होता. भलं त्याचं नाव घरातल्या कोणत्याही कागदोपत्री नसलं तरी कारखाना म्‍हणजे आपलं कुणीतरी खूप जवळचं आहे हिच भावना प्रत्‍येकाची. 
कारखान्याची कामगार वसाहत म्‍हणजे एखादा देश, राष्ट्र असावं तसं होतं. स्‍वत:चं असं एक स्‍वातंत्र्य  होतं ते. काही अलिखित नियम होते, काही रक्‍ताची नसली तरी सख्यापेक्षा जिव्‍हाळा जपणारी माणसं या कारखान्यानाच दिली होती. 
कोणतरी आजारी माणूस हळुहळू संपत जावा तसा कारखाना संपत गेला. हवेत कापूर उडून जावा तसं अगदी सहज बघता बघता कारखाना नाहीसा झाला, कुणाला कळलंही नसलं तरी माणसं धडपडत राहिली. जगण्याचा प्रश्न समोर होता. कारखान्‍यावर एक पिढी राबरणारी, कमवणारी होती, तर एक पिढी सुखाच्या ऐशोआरामात लोळणारी होती. हे चित्र फार काळ राहिलं नाही. कारखाना बंद पडेल आणि आख्खी एक पिढी देशोधडीला लागेल असं कधी कुणाला स्‍वप्‍नातही वाटलं नसेल. पण झालं तसं. कारखाना बंद पडला, राबणारे हात थांबले, हातावर जगणारी नवी पिढी मात्र रस्‍त्यावर आली.
कारखान्यातील कामगारांच्या कोणत्‍या पोराला कधी वेट ॲण्ड वॉच करावं लागलं नाही. सायंकाळी कामावरून बाप घरी आला की, पोरांनी फक्‍त आदेश सोडायचा. दुसर्‍या दिवशी पाहिजे ती वस्‍तू घरात हजर. आता वाटतं अशा किती सुंदर चित्र होतं ते. त्यात आम्‍ही वाढलो, शिकलो, पोरं धावत राहिली, पुढं गेली. डॉक्‍टर, इंजीनियर, परदेश दौरा केला. गाड्या, बंगले, इमारती उभा राहिल्या. हे ज्याच्या त्‍याच्या कतृत्‍वावर उभं राहिलं, आणि भरभराट झाली. 
आणि दुसरीकडं एक एक पिढी गलितगात्र होऊन अन्‍नासाठी, पाण्यासाठी आणि पाठीपुस्‍तकासाठी आणि जगण्यासाठीही हातपाय हलवू लागली. कारखान्याची धडधड थांबली आणि एक पिढी रस्‍त्यावर आली, उंचच उंच दिसणारी ती कारखान्‍याची चिमणी दिवसेंदिवस उभा असली तरी ती उद्धवस्‍त होत राहिली.
या सगळ्यात एक झालं माणसं खंगत गेली, कडक असणारी इस्त्री नाहीशी झाली, आणि माणसंही मग मऊ कपड्यासारखी मऊ झाली. काही जिर्ण झाली तर काही उसवत राहिली, राहत अहेत. चुरगळलेली मऊ मेणासारखी माणसं बघून आता मलाही हताशपण येतं. ते वैभव आठवतं. कारखान्यावर असणारं मंदिर एकाद्या शिल्‍पासारखं भासायचं. दरवर्षी होणारी मंदिराला रंगरंगोठी गंध पसरवत राही. कित्‍ये दिवस तो रंगांचा गंध पसरून राही. मंदिरातही आणि मंदिराबाहेरही. आता मंदिराचा रंग उडालेला आहे, देखणंपण नाहीसं झालंय. मंदिराची हिरवीगार असणारी बाग आता बाग राहिली नाही. बागेपूरता तीव्र दुष्काळ जाणवत राहतो. आणि हे सगळं आठवत असताना मंदिराच्या प्राणी संग्रहालयात असणार्‍या मोराची आर्त किंकाळी तेवढी कानात घुमत राहते.

कारखान्याचा निळा पांढरा ड्रेस आठवला की, आजही शाळा आठवते, २६ जानेवारी, १५ ऑगस्‍ट हे दिवस कुठल्यातरी सणाहून मोठे असायचे आमच्यासाठी. कारखान्‍याचा गणपती म्‍हणजे प्रत्‍येकाचा सण.
कारखान्याचे हे वैभवाचे दिवस जास्‍त काळं राहिले नाहीत. कारखाना बंद पडत गेला आणि राबणारी माणसं थकत गेली. कामगारांच्या पोरांची होणारी कुत्तरओढ बघून बापमाणसं हेलावून जाऊ लागली, झुरत राहिली, कारखाना, कारखाना म्‍हणून जीव सोडत राहिली. मग कॉलनी भकास आणि उदास होऊ लागली. 
कोणत्याही बापाला किंवा मुलाला असं एकमेकांचं संपत जाणं परवडणारं आणि सहनशक्‍ती पलिकडचं होतं. कारखान्यावरच्या आई बापांच असं दु:ख असलं की मग ते किती पहाडाहून मोठं वाटतं. हातातोंडाशी आलेली, स्‍वप्‍नांचे इमले बांधणारी आणि परिस्‍थितीशी झगडणारी पोरं बघून आई बापाला कौतुकाचं वाटणारं असतं, मात्र ज्यांच्या स्‍वप्‍नांसाठी रक्‍तांचं पाणी पाणी करणार्‍या आई बापासाठी अशी डोळ्यादेखत पोरं गेली तर जीवंतपणीच जळाल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.

Thursday, 4 January 2018

इतिहास राहतो दूर,उगाच माथी तेवढी भडकतात

मी गावाकडं वाढलो. लहान होतो तेव्‍हा शिवसेनेचे  संस्‍थापक बाळासाहेब ठाकरे जिवंत होते. गावाकडं कुठल्‍या तरी निवडणूका लागल्या की, वाघ असलेली काही फलक, पत्रकं, झेंडे असं काय काय बरचं फिरायचं. गावाकडं भला मोठा हात असलेली काँग्रेसच्या गाड्याही यायच्या. तिरंग्यावर असलेला हात लावलेली गाडी जेव्‍हा गाडी गावाकडं फिरायची तेव्‍हा माहित नाही पण तिरंग्यामुळे तो झेंडा कुठं पडला तर कसकसच वाटायचं आणि तो हळून उचलून मग कुठे तरी नेऊन ठेवला जायचा. हातवाले तेव्‍हा असं काय सांगत फिरत असं कधी ऐकवीत नव्‍हतं. मात्र गावाकचा आंदूदा मुंबईला कामाला गेला होता, आणि परत गावाकडं आलेला. तेव्‍हा तो काय काय सांगत फिरायचा. भारी वाटायचं, कान मोठं करून ऐकताना, वाटायचं आपणबी मुंबईला गेलं पाहिजे आणि आपले खरे शत्रू आपण ओळखले पाहिजेत. आंदूदा जास्‍त शिकला नव्‍हता, पण तो असा काय काय सांगायचा की, आता वाटतं काय म्‍हणून ते ऐकत होतो. आता आंदूदा कधी तरी भेटतो पण गावात नाही, हॉटेलात भांडी घासताना भेटतो, तेव्‍हा वाईट वाटतं.
गावाकडचं पोरं धड कोण शाळा शिकली नाहीत. कॉलेज तर लांबची गोष्ट. दहावी बारावी झाली की, पुणे मुंबई गाठायचं वर्षभर काम करायचं आणि मे महिन्‍यात गावाकडं बक्‍कळ (त्‍यांच्यासाठी बक्‍कळ) पैसा घेऊन येत. यावेळी निवडणूका लागल्या की, कपाळावर नाम ओढून, गळ्याच्या शिरा तारवटून मोठ मोठ्यानं घोषणा देत गल्‍लो गल्‍लो फिरायचं. कोणतरी माथं फिरवणारा इतिहास सांगायचं आणि तोच इतिहास खरा मानून झूंडशाहीच्या वृत्तीनं गावाकडच्या माणसांना हैराण करून सोडायचं. या अशात गावाकडची एक पिढी हाकनाक खड्यात गेली त्‍यांच्याच भाषेत सांगायच तर ती पिढी बाराच्या भावात गेली, कुठे गेली आणि कुठे मेली माहित नाही पण आता ती कुठेच दिसेनासी झाली. कधी तरी कोण तरी अरे तो वश्या, किश्या कुठं हाईत असं कोणतरी आता विचारलंच तर मग ते कोणतरी वडापच्या गाडीवर किन्‍नर नाहीतर नाहीतर गावाकडच्या कुठल्यातरी हॉटेलच्या मोरीत भांडी घासताना ही गळा ताणून ओरडणारी माणसं बघितली की वाटतं कुठं गेली असेल ती गर्जना.
त्‍यानंतरची पिढी माझी. गावाकडं ढिगभर टीव्‍ही चॅनेल आले, सुसाट धावणार्‍या टू व्‍हिलर, काय काय अनेक तर्‍हेच्या फॅशेन, पळून जाऊन लव्‍ह मॅरेज केलेली अनेक प्रकरण आली, जाती जातीत भांडणं आली आणि आलं बाबरी गोध्रा ही प्रकरणंही. हे एकदमच आमच्यावर थोपलं. बाबरी मस्‍जिदीवर झेंडा घेऊन, त्‍वेषाने ओरडणार कोणतरी एक युवक आणि त्याच्या मागे असलेली गर्दीचं चित्र. त्यावेळी नाही म्‍हटलं तरी आमच्या पोरांच्या ते फेमस होतं. आम्‍हाला त्‍यावेळी कळतही नव्‍हतं बाबरी प्रकरण काय आहे ते?  मात्र आपला एक शत्रू आपल्याच समाजात वावरतोय असं त्यावेळी बिनडोक असणारी टाळकी आम्‍हला सांगत. मला तेही भारी वाटे. माझ्याही मनात ते शत्रू असल्याची जाणीव कधी कधी उफाळून येई. आणि मी त्‍यांना शत्रू मानत मनातल्या मनात खदखदत फिरत राही. हे वारं निवडणूका होईपर्यंत डोक्‍यात असे. निवडणूका झाल्या, रिजल्‍ट लागले की पुन्‍हा भानावर येई मी. मग कुठे कुठे ते झेंडे, ते वाघ, ती पत्रक पडलेली दिसत आणि उगाच कसली तरी घृणा वाटे.
पोरं मग दहावी बारावीच्या परीक्षेला लागत, परीक्षा होई आणि रिजल्‍ट लागे. मग ॲडमिशन सुरू झाली की, मग जात पुन्‍हा डोकं वर काढी. गल्‍ली गल्‍लीत असणारे मित्र बोलणासे होत, ॲडमिशन मिळाल्यांवर अदृश्य प्रकारचा बहिष्कार टाकला जाई आणि तुच्छतेनं मग ॲडमिशन कसं मिळालं हे सांगण्यात अर्धा पेक्षा जास्‍त दिवस, शिक्षणदार पोराची आई वडील बहीण भाऊ हे आपली शक्‍ती वाया घालवत, आणि आपला टेंभा कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्यात शड्डू ठोकून उभा रहात. तुम्‍ही आहात ते आरक्षणामुळं आहात, त्यामुळंच तुम्‍ही जिवंत आहात, तुमची गाडी आहे की मग तुम्‍हाला कशाला पाहिजे आरक्षण, आडनाव बदलता मग का घेता आरक्षण, बहिणीनं लव्‍ह मॅरेज केलय म्‍हणून काय त्यांच्या पोरांची जात नाही बदलत, शिकला सवरला म्‍हणून काय देवळात तुम्‍ही पू
जा बांधणार का, आरक्षण पाहिजे तर मग सरहद्दीवर पण आरक्षण मागा आणि सगळ्यात पुढं जाऊन लढाकी, शिवाजी महाराज तुमचे नाहीत, आणि बाबासाहेब आमच्यातले कुठे आहेत असे एक ना अनेक प्रश्न बिनडोक पुढची पिढी कुठल्यातरी कॉलेजला जाणार्‍या पोराला विचारत राहत, आणि विनाकारण त्‍याच्या मनातल्या आत्‍मीयतेला डिवचत रहात. मग कुठे तरी त्‍याचीही भावनाही दुखे आणि रागाच्या भरात राडा होई, आणि सारी गल्‍ली मग त्या पोराच्या विरोधात उभा राही आणि जातीचा नको इतका स्‍वाभिमान बाळगत नाही ते विष मग कालवत फिरत राही...
आता कोण काय सांगत फिरत नसलं तरी जे सांगायचं आहे, जे फिरावायचं आहे ते सहजपणे आता फिरवता येतं. नको तो इतिहास, नको त्या घटना, परंपरा बिनधिक्‍कपणे सांगता येतं, आणि एकाद्यावर खूप सहजपणे बिंबावताही येतं, यात मग खरा इतिहास कुठे जातो माहित नाही, इतिहास तेवढा दूर राहतो, आणि उगाच माथी तेवढी भडकली जातात...
तूर्तास इतकचं...

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...