Wednesday, 29 November 2017

हिरवे रावे आणि ट्रेन

हिरवे रावे आणि ट्रेन

हिवाळ्याच्या दाट धुक्‍यात रेल्‍वेनं घरी जाताना अंतकरण कमालीचं जड व्‍हायचं. उगाच. शहर सोडल्याची भावना मनात येई. आपण कधीच आता इथं येणार नाही असं कायतरी वाटत रहायचं. समाजायचंच नाही, तसं का वाटायचं ते. रेल्‍वे आपल्या गतीनं ते दाट धुकं चिरत चिरत जाई. मध्येच तीkamblemahadev21@gmail.com आर्तपणे ओरडल्यासारखी वाटायची. लाल, पिवळे, हिरवे सिग्नल कुठे-कुठे दिसत होते. लाल सिग्नल दाट धुक्‍यातही इतका तीव्र वाटत होता की, भितीच वाटायची त्‍याची. अंधूक अंधूक झाला तरी तिव्रपणा त्‍याच्यातील जात नव्‍हता. घटप्रभा नदीच्या पूलावर धाडधाड असा खूप मोठ्यानं ट्रेनचा आवाज येई. चंद्र चमकत राही नदीत. हळूवार उमटलेल्या लाटांवर गोलकार चंद्राचे तरंग उटे. पुर्‍या नदीभर तो चंद्र घुमत राही, चंद्र, चांदण्या, झाडं, रात्रीचा गंध त्‍यात गडद दिसत राहत.
घटप्रभा ओलांडली की, रेल्‍वेचे दोन-दोन ट्रॅक दिसायचे. टिपूर चांदण्यात काळ्या पानावर पांढरी शुभ्र सरळ रेष मारावी असे ते रेल्‍वे रूळ दिसायचे. एकाद्या वळणार गोलकार होत जाणारे ट्रॅक दिसले की कलंडणारा चंद्र दिसे. त्‍या चंद्राच्या शीतल प्रकाशात बाजूला असलेल्या निलगिरीची झाडं चकाकत. आणि येथे येऊन ट्रेनने आर्त किंकाळी केली की, त्या उंचच उंच झाडावरून एक दोन कसले तरी
पक्षी हवेत उडून जात, आणि खूप उशिरापर्यंत त्या धूसर प्रकाशात तरंगत राहत. ट्रेन खूप लांब जाईपर्यंत त्‍या पक्षांच्या खूना त्‍या धूसर मंद काळोख्या प्रकाशात मला उमटून दिसत. खूपदा झालेला तो रेल्‍वेचा प्रवास असला तरी मला तो कधीच नकोसा वाटला नाही. दरवेळी नवी माणसं, नवी जागा, नव्या चर्चा, नवी रात्र, नव्या आठवणी, नव्या चर्चा, असं खूपसं सगळं नवनवं. पण आता आठवत नाही. मिरज स्‍टेशनवरून मी शेवटचं कधी रेल्‍वेनं प्रवास केला ते.
सांगली, मिरजेत तसे आपले कुणी पै पाहुणे नाहीत. गावाकडची माणसं होती. कुठं, कुठं. तेवढचं. बाकी प्रसाद, अजित, समीरशिवाय तिथं कोण जीवाभावाचं नव्‍हतं. ऑफिसमधल्या लोकांनीही खूप जीव लावला. पण जीव लावल्याचं समजलं तेव्‍हा, खूप उशिर झाला होता. मी सांगली सोडून जाण्याच्या निर्णयानंतर ते मला तीव्रपणं समजू लागलं. प्रेम, जिव्‍हाळा, आपुलकी, माया देणारी माणसं प्रचंड असतात. जाणलं पाहिजे त्यांना आपण. वेळेत. नाहीतर ट्रेनच्या एका आर्त किंकाळीनंतर आपण खूप असे खूप मोठ्या अस्‍वस्‍थेच्या पोकळीत ढकलेले जातो. वर येता येत नाही लवकर. वर्षे दोन वर्षे सतत रेल्‍वेचा प्रवास. भारी वाटायचं. पण अस्‍वस्‍थ व्‍हायला व्‍हायचं. का ते माहित नाही. दोन वर्षे सलग रेल्‍वेचा प्रवास. डब्बे, माणसं, मोटरमन, चेकर, रेल्‍वे पोलिस, चहावाले, भेळवाले सगळे अगदी ओळखीचे झाले होते. दर सोमवारी रात्री स्‍टेशनवर थांबलं की, एक मोटरमन हमखास भेटायचा. नेहमी बघू बघून आमची ओळख झाली. आधी हसणं, नंतर एक दोन शब्द, आणि नंतर नंतर ट्रेन सुटेपर्यंत बोलणं व्‍हायचं. खूप वेळ बोलत बसायचं. चल बसून घे, म्‍हणून सांगून इंजिनच्या त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला की, एक आर्त किंकाळी असावी तसा हॉर्न वाजवत तो मोटरमन हळू हळू गाडी मार्गस्‍थ करी. गोकाकच्या पुढे एका वळणावर तो माझ्या खिडकीतून स्‍पष्ट दिसे. कधी तरी त्‍याचं लक्ष माझ्याकडं गेलं की खूप सुंदरपणे हसे तो. बिहारी हिंदी भाषेचा लहेजा देत बेळगाव स्‍टेशनवर उतरल्यार आम्‍ही दोघं त्या म्‍हातार्‍याकडचा चहा घेई. मग दहा बारा मिनिटानंतर ट्रेन सुटे. तेव्‍हा मी त्‍याला माझ्या मराठमोळ्या हिंदी भाषेत एकदा मोटरमनजवळ बसून प्रवास करायचा म्‍हटल्यावर म्‍हणाला, मत बैठ मेरे दोस्‍त इसमें. मी ओशाळून हसत पुन्‍हा विचारत राहिलो तर म्‍हणाला जायेंगे जायेंगे एक दिन, धारवाड घुमने. म्‍हणत म्‍हणत माझा तो निरोप घेई, पुन्‍हा आर्त किंकाळी देई. आणि मोठ्यानं हॉर्नचा आवाज करीत ट्रेन निघू लागली की तो दाखवत असलेला हिरवा सिग्नल बघून मला #जीएंच्या #हिरवे रावेची आठवण होई. आणि पुन्‍हा अस्‍वस्‍थ वाटे. मनात धारवाडची आठवण येई आणि हळू हळू ट्रेन दिसेनासी होई आणि तीव्र लाल रंगातील सिग्नल लुकलूकत राही.
photo : Apurva Bahadur

Saturday, 25 November 2017

मऊशार सायंकाळ


सायंकाळ झाली की, म्‍हातारीच्या डोंगरावरच्या गवतात लोळत पडणं नेहमी अचंबित करणारं होतं. का माहित नाही पण हिवाळाचे दिवस सुरू झाले की,ढगाकडं बघताना अशी काय अनामिक हुरहूर लागल्यासारख्या वाटायची ती अनामिकच रहायाची. निरभ्र ढग कुठूनपासून कुठेपर्यतं पसरलेले दिसायचे. ढगाचा कुठूनतरी एक धागा पकडावा आणि दूर दिसणार्‍या कुठल्यातरी डोंगरावर नेऊन ठेवावा असं वाटायचं. पण ढगांची सुरूवात आणि शेवट कळतच नव्‍हती. ढगच ढग पसरलेलं असायचे. आनंदी, मलूल, अस्‍वस्‍थदायी, पळणारे, थांबणारे, चकाकणारे, काळेकुट्टू, पांढरेशुभ्र असे बरेच ढग असत. डोळ्यांच्या अवकाशात. डोळे फिरतील तसे ढगांचे विविध चेहरे दिसत. सोनेरी कडा असलेले ढग कुणीतरी रंगवावेत तसे वाटायचे. आतून कुठून तरी सूर्याची तिरपी किरणे तीव्रतेने बाहेर पडत आणि त्या तीव्र कोमल प्रकाशात वेगाने झेपावणारे कावळे मला सुंदर भासत. माझ्या समान ते कावळे आले की, काव..!असा आवाज करून म्‍हातारीच्या डोंगरावरची शांतता ते एकदम भंग करीत. पण त्‍यावेळी कावळे सुंदर वाटत, आणि मान तिरकी करुन पुढच्या प्रवासाला मग पुन्‍हा ते मार्गस्‍थ होत.
रंगबेरंगी ढगांच्या खाली आमच्या गावच्या बारीचं चित्र त्यावेळी मला प्रचंड सुंदर दिसे. गडद हिरव्‍या रंगात पसरलेली ती दाट झाडी, बांबुच्या बेटी, पिवळ्या रंगानी लगडलेल्या फुलांची बाहव्‍याची झाडं, रिकामी आणि रिती रिती वाटणारी शेतवड हे चित्र बघताना नेमकं काय वाटायचं सांगता येणार नाही, पण खूप काय तरी माझ्या मनात आहे असं वाटायचं. त्‍या गर्द झाडीच्या एका कोपर्‍यातून काळाकुट्ट लांबवर जाणारा डांबरी रस्‍ता दिसायचा. एखादा ट्रक खूप वेगानं येताना दिसे, रॉय, रॉय असा आवाज यायचा आणि हळू हळू आवाज कुठच्या कुठे तर निघून जाई.
आणि सायंकाळ मध्येच गडद झाली, काळीकुट्ट रात्र येण्याआधी म्‍हातारीच्या डोंगरावरून पुन्‍हा घरी परतताना शेतवडीतल्या बाहव्‍याच्या झाडावरून एक पांढरा शुभ्र बगळा मोकळ्या आकाशात झेपावतान दिसायचा. त्या अंधूक अंधूक रात्रीत तो पांढरा शुभ्र बगळा त्या रित्या रित्‍या शेतवडीत खूप अस्‍वस्‍थपणे घिरट्या घालतोय असं वाटत राही. तरीही तो गडद बगळा उठून दिसे. एका लयीत तरंगत राही आणि संथ गतीनं वर वर जाई, आणि मग संथ लयीत तो डोंगराच्या दाट झाडीत तो कुठेतरी लुप्‍त झाल्यासारखा दिसेनासा होई.
मग बगळ्याचा विचार मनात कितीतर वेळ घिरट्या घालत राही, कुठे गेला असेल, त्‍याच्या घरी कुणी कुणी असतील, तो अस्‍वस्‍थ आहे की त्याची अस्‍वस्‍थपणाची जातकुळीच आहे, बगळ्यासारखं शांत आणि संथ इतर पक्षी का तरंगत नसावेत, त्याच्या अस्‍वस्‍थ डोळ्यात कशाची करूणा असेल किंवा कुणासाठी तो करूणा भाकत असेल किंवा असंही वाटे मोरासारखं, कबुतरासारखं, भारद्वाजासारखं, घुबडासारखं याचा कशातच का उल्‍लेख आढळत नाही असं अनेक प्रश्न डोक्‍यात येत असत. मग बगळ्याच्या विचारात माझे घराकडे वळणारे पायही म्‍हातारीच्या डोंगरावरच घुटमळत राहत. रात्र गडद नसे, पण म्‍हातारीचं थडगं किती उदास दिसे त्या काळोखातही. जातान मी हळूच त्या थडग्यावर दगड मारी. मग म्‍हातारी माझ्याकडं चमकून बघते आणि मऊशार हाताने माझ्या गालावरून हात फिरवते असा भास त्‍या शांत लयीच्या काळोखात होई...

Monday, 13 November 2017

कधी तरी नाही तर कायमच उगाच पोलिसांची कमालीची भिती वाटायची. खाकी वर्दी आपली वाटली पाहिजे असं नेहमी सांगणारी माणसं या जगात खूप आहेत. पण सांगलीच्या अनिकेत कोथळेला पोलिस कोठडीत असताना पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे हाकनाक जीव गमवावा लागला. घरचे बिचारे अनिकेत कधीतरी सुटेल आणि आपल्या बायको मुलीला भेटेल याच आशेवर.

पण कहर म्‍हणजे पोलिसांच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर दीडशे किमी जाऊन त्याचा मृतदेह जाळला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्‍न केला. आणि तरीही ही माणसं छातीवर शासनाचा बिल्‍ला लावून मोठ्या दिमाखात फिरतात. हे सगळं सहन करण्यापलिकडंच आहे...
 maharashtra police sangli aniket kothale issue

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...