Sunday, 29 August 2021

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...



आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण, मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्यास सुरूवात झालेली, आमच्या आबांसारख्याच अनेक कामगारांचीही तिच अवस्था होती. कधी काळी सोन्याचा धूर निघणा-या त्या कारखान्याच्या चिमणीतून दुःखाची आणि दैन्यावस्थेचा हूंकार बाहेर पडत होता. या अशा आर्थिक महामारीच्या अवस्थेतसुद्धा आमच्या आबांनी आम्हाला विद्यापीठात शिकवायला पाठवलं होतं. आक्काचं एमफिल संपत आलं होतं, आणि माझं एमए सुरू होतं. रिडिंगला बसून अभ्यास करताना आक्काच्या हातात अधांतर नावाचं पुस्तक बघितलं, अधांतर नाव कुठे कुठे आणि कधी कधी ऐकलं होतं. सायंकाळचे सात वाजलेले, लेडिज होस्टले बंद होतं म्हणून ते पुस्तक ठेवून निघून गेली आणि ते नाटक वाचायला सुरूवात केली. ते वाचताना नेहमी वाटत राहिलं, त्या अधांतर मध्ये जी चाळ आहे ती आमच्या कॉलनीसारखीच आहे का, तशीच माणसं, तिच कुटूंबं, तेच व्याप, तेच नातेसंबंध, घराघरातील तेच वाद, आर्थिक चणचण हे सगळं मी शाळेत असतानाच अनुभवलेलं. कारखानदारीतील कामगार सुखी संपन्न असतात की नाही माहित नाही पण तुमच्या अंधातर नाटकातल्या त्या पात्रांसारखी नेहमी अंधातरी असणा-या आशेच्या किरणावरच ती माणसं जगत असतात असच सारखं वाटत राहिल. अंधातर वाचून संपलं आणि जयंत पवार नावाचा माणूस माझा आवडता नाटककार झाला. मग कुठेही जयंत पवार हे तुमचं नाव दिसलं की मी आवर्जून वाचत थांबणार. तुम्ही म.टा. मध्ये चौथी भिंत नावाच्या सदरातून नाट्यपरीक्षण लिहायचात, आमच्या एनडी (मावस भाऊ) मुळे त्या सदराची गोडी लागली. नाटक बघण्यापेक्षा त्या तुमच्या परीक्षणाची गोडी वाटायची. त्या परीक्षणाच्या शेवटच्या परिच्छेदात सगळा नाटकाचा सार यायचा, ते वाचून त्या-त्या नाटकाविषयी प्रचंड उत्सुकता वाटायची. त्या काळात पैसे देऊन, तिकीट काढून नाटक बघायची आमची ऐपत नव्हती, पण तुमची म. टा. तील परीक्षण वाचताना प्रचंड भारी वाटायचं. तुम्हाला एकदा दोनदा भेटण्याचा योग येऊनही तुमच्या जवळ येऊन बोलण्याचं धाडस झालं नाही. त्यावेळी मी भेटलो असतोच तर सांगितलं असतं तुम्ही गिरणगावातील माणसांचं दुःख मांडलय तसच बंद पडलेल्या साखर कारखान्यावरच्या माणसंचही सगळं आयुष्य अधांतरी आहे. 

अधांतर वाचताना ते चाळीतील जगणं, राहणं, वाद प्रतिवाद हे सगळं माझच मला वाटायचं. मला माझ्या गावाकडच्या बंद पडलेल्या कारखान्याची आठवण आली की, मी माझ्या उशीकडे ठेवलेलं अधांतर पुस्तक काढायचो आणि वाचत बसायचो. नाटकातील संवाद वाचताना तो आमचा सगळा काऱखाना आणि आमची कॉलनी मला दिसायचा. चालू असतानाचाही आणि बंद पडल्यानंतरचाही. अधांतर नाटक वाचताना त्यातील नातेसंबंध, त्यांचं जगणं, गिरणी कामगार (कारखानदारी) आणि कुटूंब, त्यातील हेवेदावे, वाद प्रतिवाद, काम, दाम आणि रोजचं जगणं या सगळ्यातील भाव तुम्ही अधांतरी नाटकात किती सहजपणे बसवला होतात. एका काळाचं आहे तसं ते दर्शन असलं तरी त्या गोष्टी प्रत्येक काळात घडणा-या या असतातच. मग तुमच्या कथा वाचताना माझा मिच त्यात बघत राहत होतो. जयंत पवार माझ्या काळाचं लिहितात असं मला नेहमीच वाटत राहिलं. तुम्हाला कधी जवळून भेटून कधी सांगता आलं नाही, पण एका दिवाळीअंकातून तुमची कथा वाचून तुम्हाला प्रतिक्रिया कळविल्यावर तुम्ही दिलेला रिप्लाय मी मोबाईलमध्ये कितीतरी दिवस जपून ठेवलाय.

अधांतर नाटकात मोहन आणि बाबा आपल्या आईला चहा आणायला सांगतात तेव्हा ती आई पैश्याविषयी आपल्या पोरांना सांगते. त्या अधांतरमधील ती आई म्हणजे बंद पडलेल्या अनेक कारखान्यातल्या पोरांची आई वाटत राहते. चाळीतल्या माणसांच्या जगण्याची एक वेगळी संस्कृती आहे तिच संस्कृती तुम्ही अधांतर मधून किती सहजपणे मांडले. उपोषण म्हणजे जुगार खेळण्याचा अड्डा आहे असं मोहन म्हणतो त्यावेळी त्याची बहिण मंजू म्हणते गिरणीला टाळे लागले आहे म्हणून त्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलन, उपोषण सुरू झालं की, त्यातून काही तरी नवीन सुरू होतं किंवा कामगारांच्या यशाला फळ येत असं होत नाही. आम्ही कारखान्यात असताना हे सगळं व्हायचं. कामगार सायंकाळी घरी यायचे आणि आपापल्या पायरीवर बसून निवेदन देताना काय काय गमती जमती झाल्या ते सांगायचे. त्यातून बंद झालेले पगार सुरू व्हायचे नाहीत किंवा नवीन काही तरी मिळायचं असंही व्हायचं नाही. पण आंदोलनं आणि उपोषणं करणा-यांची हौस फिटायची नाही. ते करत राहायचे. घर मात्र बायको नावाची माणूस चालवायची. महिन्याची दहा तारीख झाली की, बायका आपल्या नव-याना विचारायच्या झाला का पगार तेव्हा चेह-यावर कमालीची निरागसता आणि गरीबी आणून नाही हा शब्द ऐकावायचे. कारखानदारीच्या या दुःखाच्या फेजमधून गेलेल्या माणसांना अधांतर नाटक आपलीच कहाणी वाटते. घरातील बाजार संपणं, ऐन वेळेला पैसे नसणं, तरुण पोरांना सांगणं समजावणं अवघड होणं ही प्रत्येक बंद पडलेल्या कारखान्यावरच्या माणसांची शोकांतिका आहे. काम करणा-या कामगारांच्या हातातलं काम जाणं म्हणजे पुढच्या पिढीच्या ताटात दुःख वाढून ठेवण्यासारखंच आहे.

कामगार वसाहत जिथं जिथं स्थापन होते तिथं तिथं एक स्वतंत्र संस्कती उदयास येत असते. एक  कुटुंब अनेक कुटुंबाशी जोडलं गेलेलं असतं. चांगली वाईट माणसं दोन्ही काळात असतात तेच अधांतर नाटकात आहे, आई नावाचं त्यातील पात्रं एका काळ उभा करतं. ती दोन्ही गोष्टी सांगते तीन लेकांच्या तीन गोष्टी सांगताना तीन पिढ्यांचं ती सार सांगते. अधांतरमधील आई मला प्रचंड भावलेली आहे. नव-याचा, मुलांचा, मुलीचा, जावायचा आणि घर कसं चालवायचं या अशा अनेक गोष्टींचा ती विचार करते. ती थकलेली असली तरी घर चालवण्यात जराही कुचराई करत नाही. तुमच्या नाटकातीन मोहन, बाबा, आई, मंजू ही सगळी पात्रं वास्तवात कुठे ना कुठे भेटलेली आणि भावलेली असतात. साखर कारखानं बंद पडून कामगारांची आयुष्य बेचव झाली त्या काळातच तुमचं अधांतर वाचलेलं तेव्हा त्यातील ते आयुष्य आमचंच असल्याचं मला जाणवत होतं...



Thursday, 11 March 2021

बेरडकीवाडीत वीज आलेय २०२० मध्ये, तरीही अंधार कायमच...



गावात चार महिन्यापूर्वी वीज आली, म्हणून आता आता गावात अनेकांच्या घरांवर डिश टीव्हीचे अँटीने दिसतात, गावात अनेकांकडे मोबाईल आहेत, पण सगळ्यानाच रेंज मिळत नाही. गावातील एका ठिकाणीच रेंज येते, म्हणून गावातील तरूण पोरांनी त्या जागी लाकडी फळी मारून लाकडावरचा स्टँड केला आहे. त्याठिकाणी मग अनेक जण मोबाईल ठेवतात, आणि मग फोन लावत राहतात. येथील पाण्याची गोष्ट तर भन्नाट आहे, गावात शासनाकडून नळपाणी पुरवठा योजना आजही राबवली गेली नाही, का ते शासनालाच माहित. पिण्यासाठी पाणी आहे ते सुद्धा अगदी नदी शेजारी असणा-या जिवंत झ-याचं. स्वच्छ आणि निर्मळ. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात झ-यावर जाऊन पाणी भरून आणता येतं, पण पावसाळ्यात मात्र झरा ओढ्याच्या पाण्याखाली गेला की ऐन पावसाळ्यात माणसांच्या घशाला कोरड पडते.



चारी बाजूंनी घनदाट जंगल गवा रेडा, अस्वल, पट्टेरी वाघ अशा प्राण्यांची सहज संगत येथील माणसांना लाभले, प्राण्यांचं अप्रूप असल्याची साधी एकही खूण त्यांच्या चेह-यावर जाणवत नाही. लहू नाईक यांच्यावर दोन महिन्यापूर्वी अस्वलाने हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी होऊन उजवा पाय मोडला आहे, तरीही ते म्हणतात, त्याच्या वाटेत मी आलो म्हणून मला त्यानं चावलं असं ते सहज सांगतात. अशा घटना सांगणारी ही माणसं आहेत घनदाट जंगलात वसलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आणि चंदगड तालुक्यातील जांबरे गावाजवळ असलेल्या बेरडकीवाडीतील.

मोबाईलच्या रेंजसाठी तयार तयार केलेला स्टँड

चंदगडपासून पंधरा वीस किलो मीटरवर असलेलं जांबरे गाव सोडलं की, गुरं ढोरं जाऊन झालेला अगदीच कच्चा रस्ता लागतो. जनावरांची पावलट आणि डोंगरावर वाळलेल्या गवतावर उमटलेल्या दुचाकीच्या टायरच्या वेड्या वाकड्या खुणा दिसतात म्हणून त्या डोंगरातूनही वाटत राहतं या घनदाट झाडांच्या पलिकडेही एखादं गाव आहे. अंजनीची गर्द हिरवीगार झाडी, कच्च्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या करंवदीच्या काटेरी जाळ्या, जागोजागी अस्वलांनी काढलेले मातीचे ढिग, गवांच्या शेणाचे पो आणि रानकोंबड्यांचं आरवणं ऐकत आणि पाहत डोंगरातील तांबड्या मातीचा रस्ता संपतो अन् बेरडकीवाडीचा काम सुरू असलेला पक्का रस्ता लागतो. डोंगराच्या त्या गडद हिरवळीतही काळाकुळीत डांबरी रस्ता डोंगरातून जाताना आणखी उठावदार दिसतो आणि एका उंच टेकडीवरून आकसून असलेले गाव, लाल कौलारू घरं, सूर्याच्या प्रकाशात चमकणा-या आयताकृती आकाराच्या मोठ्यमोठ्या सौरऊर्जेसाठी लावलेल्या प्लेटस दिसतात आणि शेतवडीत शांत आणि मलूलपणे हिंडणारी गुरं नजरेत भरून राहतात. उतारावरून खाली खाली उतरू तसं बेरडकीवाडी गाव आणखी आणखी गडद होत जातं आणि समोर जनावरांच्या गोठ्यावर रचलेल्या गवताच्या गंजा नकळत आपलं लक्ष वेधून घेतात.

गंगारामदांनी बेरडकीवाडी गावाबद्दल मला सांगितल्यानंतर त्यांना विनंतीवजा हट्टानेच म्हटलं दादा चला जाऊन तर येऊ. गंगारामदा म्हणजे आमच्या टीममधील एक उत्साही व्यक्तीमत्व. काम कोणतंही असो, ते प्रामाणिकपणे पार पडणार. मग ते काम लहान मुलानं सांगू दे किंवा वडीलधा-या माणसांनी, सांगितलेलं काम वेळेत आणि चोख करण्यात गंगारामदा पटाईत. पक्क्या रस्त्याचं काम सुरू असलेल्या रस्त्यावरून आम्ही येताना गावातल्या माणसांना दिसल्यानंतर हळूहळू एक-एक जण जमा होऊ लागले. त्यांच्यामध्ये वयाने आजीसारख्या असणा-या आयाबायाही जमू लागल्या आणि आम्ही आमची टू-व्हिलर पार्क करण्याआधीच एक जण पुढे येऊन आम्हाला कोण पाहिजे म्हणून विचारू लागला. गंगारामदांनी शिवाजी नाईक या आपल्या मित्राचं नाव सांगून तो कुठे रहायला आलाय म्हणून चौकशी केल्यानंतर अनेक जणांनी ओळखीच्या खाणाखुणा चेह-यावर आणत बसण्याची विनंती केली. शेणानं सारवलेल्या मातीच्या कट्यावर बसत असतानाच एका दादानं उभा राहून जुनी आणि कळमटलेली चटई कट्यावर टाकली, पण शेणाच्या कट्यावर बसण्याचा आनंद क्षणात नाहीसा केला. बेरडकीवाडीतील प्रत्येक घरांची एक ठेवण आहे. बुटकी, दाटीवाटीनं वसलेली, गावातील एकाही घरावर स्लॅब नाही, जनावरांसाठी घराच्या पाठीमागे कारवीच्या काठ्यांचा घट्टपणे तयार केलेला गोठा, त्यावर माच अन् त्या माचावर जनावरांसाठी वैरण. घर दोन मजली नसली तरी गावातील गोठे मात्र दोन मजली. गोठ्यावर लावलेल्या गवताच्या गंज्या बघण्यासारख्या असतात. त्या प्रत्येक गोठ्यात एकादी म्हैस नाही तर दोन रेडे तर आहेतच. गावात मोठ्या प्रमाणात रेडे पाळले जातात. पावसाळ्यात भाताची रोप लागवड करताना रेड्यांच औत दणकट, आणि कोकणातल्या पावसाचा प्रचंड मारा, त्याला रेडाहा सहज तोंड देतो असा समज येथील शेतक-यांचा आहे. कोकणातील पावसात बैल चांगली साथ देत नाहीत हे हसत हसत सांगतात.

बेरडकीवाडीत शिवाजी नाईक यांच्या सास-यांच्या घरात बोलत बसल्यानंतर गावातील माणसांमधील आणि आमच्यामधील ओळखीचं हसू प्रत्येकाच्या चेह-यावर दिसू लागलं आणि बोलताना आमच्यातील असलेला आडपडदा नाहीसा झाला. आमचं काम होतं वेगळं पण गाव बघून काम थोडं बाजूला ठेऊन कुतूहलानं आम्ही गावाविषयी विचारू लागलो. एका-एका प्रश्नावर बोलून झालं की, लोकं भन्नाट काय तरी सांगू लागले. गवा रेडा, अस्वल, पट्टेरी वाघ आणि मुसळधार पावसाच्या गोष्टी एका मागून एक लोक सांगू लागले. त्या ऐकताना आनंदही आणि अस्वस्थही वाटत होतं.

गंगारामदा आणि मी ज्या घराच्या अंगणात बसलो होतो, तिथं आणि बाजूच्या, समोरच्या घरांच्या अंगणात सौरऊर्जेच्या लावलेल्या मोठ्या मोठ्या प्लेटस् समोरच दिसत होत्या. सौरऊर्जा प्रत्येकाच्या घरात कशी काय असा प्रश्न विचारताच, आमच्याजवळ बसलेली आजी म्हणू लागली, व्हय लेका पंधरा सोळा वर्षं याच लायटावर दिवस काढलाव, आत्त चार महिने झाले ही लाईट यऊन. आमचा दुसरा प्रश्न उपस्थिती होण्याआधीच आजीच पुढच्या गोष्टी सांगत होती. हे गाव तरी कधी स्थापन झालं असं विचारताच आजी म्हणाली, तीन चार डोया गेल्या असतील. म्हणजेच या गावात विजेशिवाय आणि नळपाणी योजनेशिवाय वाढलेली ही चौथी पिढी आहे.  माझ्या मनात त्याची मी गणितं घातली.

गावात शिरताना, एका टेकडीवरून लाल कौलारू घरं दिसू लागताच, मनात एक सुंदर गावाचं चित्र निर्माण होतं, आणि ते समोर दिसतंही. गावात गेल्यावर मात्र लक्षात येतं, इथं वीज नाही, आणि विजेवर चालणा-या कुठल्याच गोष्टीही इथं पाहायला मिळत नाहीत, कुणाच्याही घरात जोडलेली नळपाणी योजना नाही की, सांडपाणी वाहण्यासाठी गावातील कुठल्याच गल्लीत इथं गटारीही नाहीत. त्याविषयी गावातील लोकांना विचारल्यावर मात्र ती दिलखुलासपणे सांगतात, सरकारनच केलं नाही. हे सांगताना त्यांच्या चेह-यावर कोणताही नाराजीचा स्वर नसतो की, सरकारविषयी त्यांच्या मनात कटूताही नसते. कारण गावात उच्च शिक्षण घेतलेली माणसं कमी, आणि त्यांच्या गरजाही कमी आहेत.

गावात सातवीपर्यंत शाळा असली तरी विद्यार्थ्यांची संख्या रोढावलेलीच. विद्यार्थिनीही आहेत, मात्र त्याही सातवीपर्यंतच शाळेला गेल्या तर गेल्या नाही तर सातवीतच पोरींची शाळा बंद. सातवीनंतर चंदगड नाही तर इसापूर, तेही सात आठ कि. मी. वर. गावातील काही पोरं पोरी चालत शाळेत जातातही मात्र अस्वल, गवा रेडा नाही तर जंगली प्राण्यांचं भीती कायम आहेच. बेरडकीवाडीत गेलं की, वाटतं खरच का आपण २०२१ मधील हे गाव बघतोय, आता वीज गेली असली तरी गावातील काही घरांवर मात्र अजून त्याच सौरऊर्जेच्या दिव्यांसाठी लागणा-या मोठ्या मोठ्या प्लेटसच्या अंधाराखाली घरं अजून प्रकाशाच्या प्रतिक्षेत आहेत.


Sunday, 21 February 2021

कारण इथे जन्मच मृत्यूचं कारण आहे...


     स्टीलच्या वाटीवर बोटाचं ठसे असावेत तशी काही माणसं असतात, असतात पण दिसत नाहीत आणि स्पष्ट करून दाखवताही येत नाहीत. अशीच जिया शहा. पाळीव आणि भटक्या कुत्र्यांवर काम करणारी, त्यांच्यावर उपचार करणारी जिया हा तिचा प्रवास खूप भावूकपणे सांगते. कुत्र्यांवर काम ती एकटीच नाही करत. तर तिची आई आणि तिची बहीणही हे काम खूप गंभीरपणे करतात. शहरातील भटक्या कुत्र्यांना कुणीच वाली नसतं, पंढरपूरातील कुत्र्यांसाठी मात्र शहा कुंटुंबातील या तिघी मायलेकी जीव तोडून काम करतात. तोही एक जीव आहे,  हे त्या अगदी पोटतिडकीनं सांगतात.


चंदगड तालुक्यात तिने काम सुरू केल्यावर ती सांगते की, आजोबा, वडील, मुलगा आणि नातू या सगळ्यानाच कुत्र्यांच्या पिल्लांविषयी विचारलं की, या तिन्ही पिढीतील माणसं मला एकच गोष्ट सांगतात की, कुत्री व्याली की, कुत्रीची एक-दोन पिल्लं घरात ठेवणार आणि राहिलेली आम्ही नदीत बुडविणार. हे ऐकताना मन हेलवाणारं होतं. त्या बुडविण्याच्या एका गोष्टीनं मन प्रचंड अस्वस्थ झालं. हे सांगताना तिचा स्वर कातर होता आणि  ही हेलावणारी गोष्ट सांगते, मुळची पंढरपूरची असलेली आणि सध्या रशियात मेडिकलचे शिक्षण घेणारी जिया शहा. अवघ्या तीन दिवसाच्या आणि डोळेही उघडले नसलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव वाचविण्यासाठीच तिने निर्णय घेतला की,कुत्र्यांची नसबंदी करण्याचा. यासाठी तिने कोल्हापूर जिल्ह्याचे पशूसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांची मदत घेऊनच तिने नसबंदीचे शिबिर चंदगड तालुक्यात आयोजन केले. ती म्हणते हे माझं एकटीचं काम नाही, त्यासाठी अनुप्रिया शहा, सूरज मधाळे, गंगाराम कांबळे, मनोहह बुरूड,  किशोर बोकडे यांचीही साथ आहे म्हणून हे करू शकले.



चंदगड फिल्म कंपनीच्या सावित्र्यायण या चित्रपटात मेडिकल कन्सलटन्ट म्हणून काम करणारी, रशियात मेडिकलचे शिक्षण घेणारी जिया शहा. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती चंदगड तालुक्यातील पुंद्रा, काजिर्णे, आणि गवसे गावात येऊन राहिली होती. यावेळी तिला येथील एक रुढ आर्थाने चालत आलेली, वाईट प्रथा समजली, ती म्हणजे, कुत्रीला पिल्ले झाली की, त्यातील एक दोन पिल्ले ठेऊन घ्यायची आणि राहिलेली पिल्ले माणसं नदीत बुडावायची. 


तालूक्यातील अनेक गावातील ही वाईट प्रथा तिच्या लक्षात आल्यावर तिने तालुक्यातील कानूर परिसरातील पुंद्रा, कानूर खुर्द, कानूर बुद्रूक, मासूरे, सडेगुडवळे, पिळणी, भोगोली, बिजूर, कुरणी, गवसे, बुझवडे, इब्राहिमपूर आणि कानडी या गावांतील कुत्र्यांचा सर्व्हे केला. प्रत्येक कुत्र्याच्या मालकाला जाऊन भेटून त्यांच्याशी संवाद साधून तिने आपल्या सर्व्हेत १११ कुत्र्यांची नोंद केली.


सर्व्हे करतानाही तिने तीन चार गट केले, प्रत्येक गटाला काम वाटून दिले, आणि सर्व्हे पूर्ण केला. जियाचा हा पहिलाच प्रोजेक्ट नाही, तिने याआधीही पंढरपूरातील भटक्या कुत्र्यांसाठी काम केले आणि आहे तिचे ते काम सुरूच आहे. शहरातील कुत्र्यांना आजार होतो, वाहनांची धडक बसून जखमी होतात, कुणी दगड मारतं तर कुठलं तरी कुत्रं खड्यात नाहीतर गटारीत पडलेलं असतं. तिला ते समजल्या समजल्या ती मग तिच्या कुत्र्यांचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू होते.



कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने जियाने पशूसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांची भेट घेतली. डॉ. पठाण यांनाही, तिने चंदगडमधील या प्रथेची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांनीही सकारात्मक पाऊल उचलून, त्यांनी व जिया शहाने कानूर, सडेगुडवळे, गवसे येथे दोन दिवसाच्या नसबंदीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. नसबंदीची शस्त्रक्रीया करण्यासाठी डॉ. अनिल परभणे, डॉ. चिकभिरे यांच्यासारख्या डॉक्टरांनी ते काम केले.

कुत्र्यांच्या या नसबंदीसाठी जियाने स्थानिक माणसांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यासाठी गावागावातून फिरू लागली. नुकताच जन्मलेली म्हणजे डोळेही न उघडलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना पाण्यात बुडविणे किती अमानवी आणि क्रूर आहे. हे ती चंदगड तालुक्यातील माणसांना समजावू लागली. तरीही काही पारंपरिक आणि धार्मिकतेचा पगडा असलेले नागरिक तिलाच समजावू लागले. त्यांच्या मते, कुत्र्याची पिल्ले पाण्यात बुडविणे म्हणजे, त्यांना पापातून मुक्त करण्यासारखे आहे. त्यावर तिने याबाबत वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली. त्यामुळे लोकांच्यात मानसिकतेत बदल होत गेला. अकरा गावातील कुत्री पाळणारे नागरिक कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तयार झाल्यावर ती त्यांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या तयारीला लागली. स्वतः आणि काही दानशूर व्यक्तींकडून पैश्याची जूळवाजूळव करून तिने आर्थिक पाठबळ उभा केले. त्यानंतर कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, बेल्ट, साकळ्या त्यांची तजवीज मुंबईतील एका एनजीओमध्ये काम करणा-या अनुप्रिया शहाच्या मदतीने मुंबईतून काही साहित्य मागविले. साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर लगेच डॉ. पठाण यांच्याबरोबर संवाद साधून नसबंदी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 या कामासाठी तिला अनुप्रिया शहा, सूरज मधाळे, एकनाथ बांदिवडेकर, गंगाराम कांबळे, मनोहर बुरूड, किशोर बोकडे, मनस्विनी कांबळे, संतोष कांबळे यांची मदत झाली.

...........................................


कुत्र्यांची नसबंदीचे काम सुरू केल्यावर कामाचा एक दस्ताऐवज रहावा म्हणून एफटीआयचा विद्यार्थी सूरज मधाळे याने कामावर माहितीपट बनवला आहे. कामाच्या सुरूवातीपासून सगळ्या गोष्टींचे चित्रीकरण, शिबिर घेतलेल्या गावातील, कुत्र्यांच्या मालकांच्या मुलाखती, जियाबरोबर काम करणारी अनेक माणसांचे अनुभव त्यांनी कॅमेराबद्ध केले आहेत. सूरज मधाळेंनी तयार केलेला माहितीपट पाळीव प्राण्यांच्या आणि माणसांच्या जगण्याचा एक वेगळा पैलू सांगणारा माहितीपट तयार झाला आहे. या माहितीपटासाठी त्याचा एफटीआयचाच सहकारी मित्र केतन पांडकर याने कॅमे-याची जबाबदीरी तर साऊंडची जबाबदारी सिध्दार्थने सांभाळली आहे.



................................

डॉ. वाय. ए. पठाण कोल्हापूर विभागाचे पशूसंवर्धन खात्याचे उपायुक्त. स्वभावात कमालीचा मृदूपणा, भाषेत आपुलकीचा गोडवा आणि मुक्या प्राण्याची भाषाही सहज समजून घेणारा असा हा अवलिया. मुक्या प्राणी आजारे असले काय किंवा बरे, टणटणीत असले तरी ती त्यांची भाषा समजून घेण्याची कुवत माणसाकडे लागते. ती कुवत सहज सुंदर त्यांनी मिळविली आहे. म्हणून त्यांच्या कार्यालयात गेलं की माणूस आपसूकच डॉ. पठाण सरांसारख सहज निरागसपणे व्यक्त होऊ लागतो.



........................................... 

मुंबईतील एका एनजीओमध्ये काम करणा-या अनुप्रिया शहा सांगतात, शहरी भागातील भटक्या कुत्र्यांसाठी शासकीय पातळीवर अनेक उपाय योजना केल्या जातात. त्या यशस्वापणे राबविल्याही जातात. मात्र ग्रामीण भागात याविषया कुठलीही जागृती झालेली दिसत नाही. म्हणून आम्ही नसबंदीचे शिबिर आयोजनाचा निर्णय घेतला. काही दानशूर व्यक्तींकडून आणि काही खर्चाचा भाग आम्ही करून चंदगड तालुक्यातील काही भागात हे शिबिराचे आयोजन केले आहे.



..................................................

दै. सकाळचे पत्रकार संदीप खांडेकर यांनी घेतलेली दखल



एबीपी माझाने घेतलेली कामाची दखल. कोल्हापूरचे ब्युरो चिफ विजय केसरकर यांचा स्पेशल रिपोर्ट

https://youtu.be/GGT4ipoelnM


Saturday, 13 June 2020

आरूड झालेल्या कट्टरतेतील फोलपणा


नव्वदच्या दशकात आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात खासकरून मराठी शाळेत शिकलेली पिढी सर्वार्थाने घडली आहे...

शाळेत असताना कट्टर हिंदूत्ववादी, संभाजी भिडेंचा प्रचंड मोठा प्रभाव, धारकरी, मुसलमानांचा तिरस्कार आणि मनात छत्रपती शिवरायांची फक्त हिंदूत्ववादी प्रतिमा. याच विचारातून बाळासाहेब ठाकरेंच्या हातात एक दिवस भारताची सत्ता द्या, ते अणूबॉंब टाकून पाकिस्तानचा नामोनिशान मिटवतील यावर या पिढीचं ठाम मत.

तर काँग्रेसने या देशाचे वाटोळे केले. गांधीजी नसते तर देश ५० वर्षे आधीच स्वातंत्र्य झाला असता, गांधीना भगतसिंगांची फाशी रद्द करता येवू शकली असती पण त्यांनी तसं केलं नाही. अशा एक ना अनेक डोक्यात विचार. हेच विचार मग डोक्यात बसलेले. या देशाचा नथूराम हाच खरा देशभक्त कारण त्यानं गांधींना मारलं. हे नेहमीच डोक्यात म्हणून मी नथूराम गोडसे बोलतोय नाटकाची सीडी गुपचूप आणून बघणं आणि परत कट्टरतेकडं जोमानं प्रवास सुरू करणं आणि तो प्रवास नेटानं सुरू ठेऊन तो आणखी इतरांना सांगण्यासाठीची गडबड होती ती वेगळीच.

नेहरूंची एडविनाबरोबरची भानगड शाळेतल्या सगळ्या पोरांना तोंडपाट. त्यांचं ते पाकिस्तानला ५५ कोटी रूपये देणे तिच्याच सांगण्यावरून. पाचवीत आल्यापासूनच गांधी आणि नेहरूंवर पांचट जोक्स, त्यांना शिव्या देणं, चेस्टा करणं नेहमीचंच. सुभाषबाबूंना नेहरू-गांधींनी संधी दिली नाही, नाहीतर आता काँग्रेस नावालापण शिल्लक राहीली नसती हे पक्क डोक्यात भरलेलं.

या अशा अनेक अफवा आणि चूकीचे समज हे शाळेत असल्यापासूनच मनावर बिंबवले गेले. विशेष म्हणजे अनेक ऐकीव संदर्भ देवून हा समज शाळेतल्या मुलांच्या मनात दृढ करायला काही शिक्षकांनीच हातभार लावलेला.

शाळा संपून कॉलेजात गेल्यानंतर त्यातील खूप कमी लोकांनी वाचन आणि मनन केलं असेल. त्यामुळे शाळेत मनात ठासून भरलेला गांधी-नेहरू अन् कॉंग्रेस विरोध तसाच त्या पिढीवर कायम आरूड झाला. ज्यांनी अधिक वाचन केलं, संदर्भ पाहीले ते यातून सूटले, त्यांची काही निश्चीत मतं झाली. एक धारणा बनली. शाळेतल्या त्या ऐकीव माहितीतील फोलपणा त्यांच्या लक्षात आला, म्हणून ते नव्यानं विचार करू लागले.

.....पण ज्यांनी शाळा संपल्यानंतर नवा विचार शोधण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, नवं कधी काही वाचलच नाही ते मात्र आजही ५५ कोटींच्या इतिहासावर ठाम आहेत. २०१४ नंतर अशांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तेच लोक आज भक्तम्हणून उद्याला आलेत. आता हीच भक्तमंडळी केवळ व्हॉटस्अप विद्यापीठाच्या माहितीवर सोशल मीडियावर अनेकांवर टोळधाडी टाकतात.
मुळात उजवा, डावा, काँग्रेस, भाजप असा कोणताही विचार असो, त्यामागे त्याचा निश्चीत असा काहीतरी उद्देश असतो. त्या मार्गानं त्या-त्या विचारांचे ते-ते सच्चे कार्यकर्ते मार्गाक्रमण करत राहतात. पण वर्षानूवर्षे चूकीचा इतिहास सांगून निर्माण केलेल्या पिढ्या या काही वैचारिक कार्यकर्ते होवू शकत नाहीत....ते केवळ अन् केवळ भक्तच राहतात. या भक्तांचा त्या-त्या विचारांना काही प्रमाणात राजकीय फायदा सोडला तर इतर काहीच फायदा होत नाही हे कालांतराने लक्षात येते.
आणि हो, हे भक्त गॅंगकेवळ मोदींकडे आहेत हा समज नको. मोदीभक्तांची संख्या तुलनेने जास्त असली तरी इंदिरा गांधीचे भक्तआजही आहेत.... अहो तुमचा विश्वास बसणार नाही, जवळपास १३५ वर्षाचा वैभवशाली इतिहास असणारा काँग्रेस पक्ष आज मोडकळीला आला असताना तो केवळ राह़ुल गांधीच चालवू शकतात असे कित्येक वर्षे ठाम मत मांडणारे भक्तआजपण जोरात आहेत आणि ते पुढेही राहतीलच हे नक्की.
………………………

Abhijit Jadhav
abhi.jadhav65@gmail.com
following on twitter: @SahyadriAbhi

Monday, 25 May 2020

लाल मातीतील पांढरं सोनं मातीमोल होताना...

...म्हणजे आम्ही कधी तरी लहान होतो, मग दुपारी केव्हातरी गावात गारेगारवाला येई आणि आम्ही गावातील सगळी पोरं हातात पाच पाच काजू घेऊन त्याच्या भोवती घोळका करी. नंतर तो प्रत्येकाच्या पाच काजू घ्यायचा आणि त्याच्या
बदल्यात आम्हाला तो गारगार गारेगार द्यायचा. कुणाच्या दहा काजू असतील त्याला पांढरा शुभ्र असा दुधाचा गारेगार मिळायचा पण आम्हाला तो पाच काजूंचा लाल भडक थंडगार गारेगारच आवडायचा. ध्याही अगदी शांत शांत व्हायची, आणि भारी वाटायचं. तेव्हा पासून म्हणजे अगदी कळू लागल्यापासून काजू आणि मुरठा कायतरी मिळवून देणारं पीक आहे हे तेव्हापासूनच ध्यानात आलं. म्हणूनच याला चंदगडच्या लाल मातीतील, पांढरं सोनं म्हणतात असेल.

दिवस बदलत गेले आणि काजू बहुमोल झाली. चंदगडच्या प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधा बांधाला छोट्या पानांची, भरगच्च बुटकी अशी ही काजूची झाडं दिसू लागली. त्यातलं मोल आणखी समजू लागलं म्हणून उसातही काजू बहरु लागली. काजूच्या झाडांवर पानांपेक्षा लाल, पिवळे मुरटे डोलू लागले आणि घरातील सगळी कच्ची बच्ची मंडळी काजूच्या बागेत राबू लागली, आणि रमूही लागली.
काजू म्हणजेच सोनं हे लक्षात यायलं खूप उशीर लागला नाही, म्हणून बांध तिथं काजूच झाड बहरु लागलं. कधी काळी एक दोन किलो काजू घालणारे शेतकरी पोत्यानं काजू घालू लागले. मनासारखा पाऊस पडू लागला म्हणून दरवर्षी काजूची रोपं बांधा बांधावर डोलू लागली.
mahadev parvati ramchandra kaju chandgad marathi maharashrta

काही दिवसातच इथला शेतकरी एका पोत्याचा दहा पोत्यांचा मालक होऊ लागला. चंदगडच्या सगळ्याच शेतकर्‍यांची मग गोळा बेरीजेची गणित काजूवरच विसंबू लागली कारण काजू म्हणजे पांढरं सोनं होतं.
या लाल मातीत जसा धो पाऊस असतो तसच कडक्याच ऊनही असतं, पण हे ऊन चंदगडच्या माणसाला लागत नाही कारण बहरलेल्या काजू बागेत गर्द सावल्यांचं अधिराज्य असतं.  कडक ऊन सुटलच तर काजूच्या बागेत झाडांच्या मुळावर सुखाची वामकुक्षी घेणारा शेतकरी फक्त चंदगडमध्येच भेटणारा असतो, कारण असतं पांढर्‍या सोन्याच्या खाणीचं.


हे पांढरं सोनं असलं तरी मिळणारा भाव म्हणजे शेतकर्‍यांची हेळसांडच असायची. बाग बहरली आणि एकाची दहा पोती झाली तरी काजूवाला शेतकरी, शेतकरीच रहायचा. काजू विकत घेणारे मात्र गब्बर होत, आधी काजू विकत घ्यायची नंतर काजू फॅक्टरीचे मालक व्हायचं नंतर उद्योजक म्हणून चेअरमन बिरमन म्हणून मिरवत रहायचं. शेतकरी मात्र सालोंसाल जैसे थे अवस्थेत. कारण मनासारखा दर चंदगडच्या शेतकर्‍याच्या वाट्याला कधी आलाच नाही. काजू संपत आली की खरिपाची काळजी. बी-बियाणं घ्यायची कधी, महागलेली खतं वापरायची कुठली आणि भाताच्या रोपेत औतं की ट्रॅक्टर परवडणार याच चिंतेत इथला शेतकरी.

कधी तरी मनासारखा दर मिळेल आणि कधी तरी आमच्या लाल मातीतील काजू उत्पादक शेतकरी बागायतदार म्हणून मिरवेल तेव्हाच काजूभावाची ही चर्चा होईल. लाल मातीतील पांढरं सोनं घेणा-यांचं दुःख वेगळच आहे कारण ते दिवसेंदिवस मातीमोल होतय....
kamblemahadev21@gmail.com

Wednesday, 29 April 2020

तुझ्या अस्तित्वाची ही रिकामी पोकळी



...खूप लहान असल्यापासून अगदी आमच्या आबांच्या मांडीवर बसून मी गावाकडची नाटकं बघितलेत. एखादं नाटक भावलच तर त्यातील अनेक पात्रात माझं मी पण शोधत होतो. नंतर मोठ्या झाल्यावर मोठ्या पडद्यावरचा सिनेमा बघताना तर कोणत्या पात्रात मी फीट  बसतो किंवा कोणतं पात्रं माझ्यासारखं आहे हेच मी पाहत राही. यावेळी दोन्ही गोष्टी मिळायच्या, सुखही आणि आनंदही. पण ते फार काळ टिकायचं नाही, तिसरी बेल वाजायची आणि थिएटरात मंद मंद दिवे लागायचे अन् मग ते सुख, दुःख दोन्ही मंद मंद होत जाई.

आणि मग कधीतरी इरफान खान नावाचा माणूस सिनेमागृहाच्या भव्य दिव्य पडद्यावर भेटला, तो फक्त भेटलाच नाही तर अगदी माझ्यातला अगदी आतला आतला वाटला.
इरफान खान. नावातच खान पण तुझं खान पण कधीच माझ्या आड आलं नाही. खूप वर्षं कोल्हापुरात राहिलोय म्हणून असेल कदाचित., आता आता तू गेल्यानंतर तुझ्याविषयी हळहळणारी काही माणसं अल्लाकडे तुझ्यासाठी शांती विश्रांती मागत होती, पण मला फक्त आता तुझ्या अस्तित्वाची रिकामी पोकळीच तेवढी भासत होती, आणि ती आता कायम भासत राहिल, आणि ती भासावीच, असचं वाटतं.

आता इथं लिहिताना मला सारखं वाटतं , तुझ्या सिनेमांची इथे यादी द्यावी मग वाटलं, राहू दे, जे केलं आहेस त्याची छाप निरंतर राहणार आहे.

टीव्हीवर कधी कधी तुझा सिनेमा लागेल तेव्हा तेव्हा तू कुठेतरी तुझ्या कामात व्यस्त असशील नाही तर सिस्का लाईटची आणखी कुठली तरी नवी जाहिरात दाखवत काही सेकंदात तू निघूनही जाशील, असच मला तेव्हाही वाटेल.

Mahadev parvti ramchandra blogger irfankhan म मराठी

अनिरुद्ध संकपाळ आणि मी मुंबईत असताना रोज वर्सोवा, मड, जेट्टी असा प्रवास असे. शिप्टला जाताना त्या बोटीतून अनेक कलाकार भेटायचे तेव्हा मला कधीतरी सारखं वाटायचं तू, नवाजुद्दीन नाहीतर मिलिंद शिंदे भेटावा, पण तसं झालच नाही. त्यावेळी चेहर्‍यावर रंग चढवलेली अनेक माणसं भेटली पण इरफानभाई तुझ्याही चेहर्‍यावर रंग होताच की, पण तो कधीच आम्हाला दिसला नाही. तू आमच्यातलाच एक आम्हाला वाटत राहिलास, रंगाशिवायचा खराखुरा माणूस.
आता खरच तू आम्हाला कधीच भेटणार नाहीस, सिनेमाच्या नव्या पोस्टरवर तुझं चित्रं नसेल, डोळ्यांनीच असंख्य आणि प्रत्येकाची भाषा बोलणारे तुझे डोळे नसतील तेव्हा मात्र सिनेमागृहाच्या बाहेर आणि आतल्या काळोखतल्या गर्दीतही
अगदी ढगाएवढी मोठी तुझी पोकळी जाणवेल....
(चित्रःसौरभ गुगलवरुन साभार)

-महादेव पार्वती रामचन्द्र

Saturday, 28 September 2019

लहान असल्यापासून शरद पवार नावाची गोष्ट पाहतोय...

प्रिय साहेब,
तुम्ही माझ्या वडिलांसमान आहात, तरीही मी तुम्हाला प्रिय साहेब लिहिलय. तुमच्याविषयी मला प्रचंड आदरही वाटतो म्हणूनच माझ्या गावाकडच्या डोंगराएवढे तुम्ही मला प्रिय वाटता.
शाळेत असतानाची गोष्ट. लहान होतो अगदी तिसरी-चौथीत असेन. त्यावेळी हलकर्णीतील दौलत साखर कारखान्यावर वडिल नोकरीला होते. कारखान्याची शाळा म्हणूनच ती इतर शाळांपेक्षा सुंदरच होती.  आता नीटसं आठवत नाही पण रविवार की शनिवार होता. आणिं त्यावेळी दौलत कारखान्याच्या बाॅयलर प्रतिपादन तुमचे हस्ते झालं होतं. त्यावेळी तुम्ही हेलीकाॅप्टरनं कारखान्यावर आला होता. आम्ही सगळे शाळेत बसलेलो आणि तुमच्या हेलिकाप्टरचा वरती आवाज आला. वर्गात बाई शिकवत होत्या. तुमच्या हेलिकाॅप्टरचा आवाज आल्यावर तिघा चौघाना आम्हाला कसलच भान राहिलं नाही आणि वर्गातूनच बाहेर तुमच्या हेलिकाप्टरच्या दिशेनं पळत सुटलो ते अगदी धूळ उडवत उतरलेल्या हेलिकाप्टरच्या जागेजवळ जाऊन थांबलो. मग खूप गर्दीतून, पायाच्या टाचा उंच करुन तुम्हाला बघण्याचा आम्ही प्रयत्न करत राहिलो, तुम्ही आम्हाला जवळून दिसाल म्हणून. एक क्षणी तुम्ही आम्हाला दिसलाही पण त्यावेळी तुम्ही दूर अलोट गर्दीत होतात. अगदी त्यावेळेपासून मी तुम्हाला जवळून बघण्याचा आणि भेटण्याचा प्रयत्न करतोय. पण ते झालंच नाही. पण तरीही मी तुम्हाला माझ्या जवळच ठेऊन मी पाहत आलोय तुम्हाला.

साहेब मला राजकारणातलं काही कळत नाही पण तुम्ही म्हणजेच राजकारण, तुम्ही म्हणजेच नेता, तुम्ही म्हणजेच मुख्यमंत्री आणि तुम्ही म्हणजेच पंतप्रधान असचं मला कायम वाटत राहिलं. वय कळतं झाल्यापासून आणि मंत्री म्हणजे काय, मुख्यमंत्री कोण असतो हे जेव्हापासून कळू लागलं तेव्हा पहिलं नाव माझ्या मनावर कोरलं गेलंय ते म्हणजेच शरच्चंद्रजी पवार. शरच्चंद्रजी पवार हे नाव जिथं जिथं वाचलय तिथं तिथ मला तुमचा हसणारा चेहरा आणि डोक्यावर डौलानं उभा असणारा तुमचा फेटाच मला कायम दिसत आलाय. म्हणूनच हे नाव माझ्या मनावर कायम कोरलं गेलय. परवाच्या घटने ते अधिक गहिरं आणि दृढ झालय.
मतदान म्हणजे काय हे जेव्हा कळू लागलं त्यावेळेपासून आमची आजी, आई-आबा सांगायचे शरद पवारांच्या पार्टीला मतदान केलो. अगदी त्यावेळेपासून मला कायम वाटू लागलं मीही मतदान करीन तेव्हा पवारांनाच करीन. आणि मग आयुष्यातील पहिलं मतदान केल तेही तुम्हालाच. मी तुम्हाला मतदान केलं अस मी मुद्दामच सांगतोय. कारण आमच्या मतदार संघात कोण? कुठला उमेदवार आहे हे मला माहित नसतं पण तुमचा उमेदवार आहे तर मग करा मतदान हेच चित्र कायम मनात आकार घेत राहिलं. आणि आता तुमच्यावरचा विश्वास अधिक दृढ झालाय. पण तो नेहमीच असतो.
मग मग वाचायला सुरुवात केल्यावर प्रत्येक पेपरमध्ये तुमचं नाव या ना त्या कारणानं येत राहिलं मग तुम्ही मला आणखी  जवळचे वाटू लागलात. वाटत नाही तुम्ही आहातच जवळचे. म्हणूनच अनेकजण तुमच्याकडे बघूनच मतदान करतात, नाव, गाव न वाचता खुशाल सांगितलं जातं की मी राष्ट्रवादीलाच मतदान केलं कुणा कुणाला उमेदवार कोण हेसुद्धा माहिती नसतं. माहिती असते ती शरद पवार या नावाची.
गेल्या पाच सहा वर्षात तुमचे विरोधक आणि सत्ताधार्‍यानी एकच गोष्ट नवमतदारांवर बिंबवत राहिले की आजच्या घडीला हे सगळं दिसतय ते भाजपनच केलंय. मग त्यासाठी त्यांचा आयटी सेल कामाला लागतो आणि नको नको ती कामं मग या नव्या पोराना लावतो.
पवार साहेब माझ्यासारखीच अनेकांची इच्छा असेल की या आधारवडाबरोबर आयुष्यातील काही क्षणतरी घालवले पाहिजेत. पण ते सगळ्यानाच कुठं शक्य आहे, नाहीच.
कधी कधी हे पण वाटतं की तुम्ही कुठून आणत असाल ही ऊर्जा. ही शक्ती, कुठून येतं हे तुमच्यात हत्तीचं बळ. तुमच्याबाबतीत असलेले हे माझे प्रश्न. आणिं तुमच्यामुळेच स्वतःला मिळालेली उत्तरंही तुमचीच असतात. तेव्हा तेव्हा वाटतं हा माणूस म्हणजे समुद्र आहे समुद्र आणि अथांग आणि निस्सीम.
गेल्या काही दिवसांपासून मला नेहमी वाटत राहिलं तुम्हाला पत्र लिहावं आणि सांगावं  साहेब राजकीय, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती गंभीर असतानाही तुम्ही धीरगंभीरपणे सामोरे गेलात कोणताही आकांड तांडव करता आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणूनही त्या-त्या तुम्ही लढत राहिलात आणि लढताहातही. ही लढाई तुमच्यासाठी महत्वाची नाही पण तुम्हाला महत्वाची वाटतात ती लाखमोलाची माणसं. याच लाखमोलात मीही नक्की कुठेतरी असेन म्हणून हा पत्र प्रपंच.
                                           -महादेव आर. कांबळे,
                                               9921799478
फोटो सौजन्य: गुगुलकडून
--------------------------------------------------------
ii

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...