गावात चार महिन्यापूर्वी वीज आली, म्हणून आता आता गावात अनेकांच्या घरांवर डिश टीव्हीचे अँटीने दिसतात, गावात अनेकांकडे मोबाईल आहेत, पण सगळ्यानाच रेंज मिळत नाही. गावातील एका ठिकाणीच रेंज येते, म्हणून गावातील तरूण पोरांनी त्या जागी लाकडी फळी मारून लाकडावरचा स्टँड केला आहे. त्याठिकाणी मग अनेक जण मोबाईल ठेवतात, आणि मग फोन लावत राहतात. येथील पाण्याची गोष्ट तर भन्नाट आहे, गावात शासनाकडून नळपाणी पुरवठा योजना आजही राबवली गेली नाही, का ते शासनालाच माहित. पिण्यासाठी पाणी आहे ते सुद्धा अगदी नदी शेजारी असणा-या जिवंत झ-याचं. स्वच्छ आणि निर्मळ. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात झ-यावर जाऊन पाणी भरून आणता येतं, पण पावसाळ्यात मात्र झरा ओढ्याच्या पाण्याखाली गेला की ऐन पावसाळ्यात माणसांच्या घशाला कोरड पडते.
चारी बाजूंनी घनदाट जंगल गवा रेडा, अस्वल, पट्टेरी वाघ अशा प्राण्यांची सहज संगत येथील माणसांना लाभले, प्राण्यांचं अप्रूप असल्याची साधी एकही खूण त्यांच्या चेह-यावर जाणवत नाही. लहू नाईक यांच्यावर दोन महिन्यापूर्वी अस्वलाने हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी होऊन उजवा पाय मोडला आहे, तरीही ते म्हणतात, त्याच्या वाटेत मी आलो म्हणून मला त्यानं चावलं असं ते सहज सांगतात. अशा घटना सांगणारी ही माणसं आहेत घनदाट जंगलात वसलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आणि चंदगड तालुक्यातील जांबरे गावाजवळ असलेल्या बेरडकीवाडीतील.
मोबाईलच्या रेंजसाठी तयार तयार केलेला स्टँडचंदगडपासून पंधरा वीस
किलो मीटरवर असलेलं जांबरे गाव सोडलं की, गुरं ढोरं जाऊन झालेला अगदीच कच्चा रस्ता
लागतो. जनावरांची पावलट आणि डोंगरावर वाळलेल्या गवतावर उमटलेल्या दुचाकीच्या टायरच्या
वेड्या वाकड्या खुणा दिसतात म्हणून त्या डोंगरातूनही वाटत राहतं या घनदाट झाडांच्या
पलिकडेही एखादं गाव आहे. अंजनीची गर्द हिरवीगार झाडी, कच्च्या रस्त्याच्या दुतर्फा
असलेल्या करंवदीच्या काटेरी जाळ्या, जागोजागी अस्वलांनी काढलेले मातीचे ढिग,
गवांच्या शेणाचे पो आणि रानकोंबड्यांचं आरवणं ऐकत आणि पाहत डोंगरातील तांबड्या
मातीचा रस्ता संपतो अन् बेरडकीवाडीचा काम सुरू असलेला पक्का रस्ता लागतो.
डोंगराच्या त्या गडद हिरवळीतही काळाकुळीत डांबरी रस्ता डोंगरातून जाताना आणखी
उठावदार दिसतो आणि एका उंच टेकडीवरून आकसून असलेले गाव, लाल कौलारू घरं,
सूर्याच्या प्रकाशात चमकणा-या आयताकृती आकाराच्या मोठ्यमोठ्या सौरऊर्जेसाठी
लावलेल्या प्लेटस दिसतात आणि शेतवडीत शांत आणि मलूलपणे हिंडणारी गुरं नजरेत भरून
राहतात. उतारावरून खाली खाली उतरू तसं बेरडकीवाडी गाव आणखी आणखी गडद होत जातं आणि समोर
जनावरांच्या गोठ्यावर रचलेल्या गवताच्या गंजा नकळत आपलं लक्ष वेधून घेतात.
गंगारामदांनी बेरडकीवाडी
गावाबद्दल मला सांगितल्यानंतर त्यांना विनंतीवजा हट्टानेच म्हटलं दादा चला जाऊन तर
येऊ. गंगारामदा म्हणजे आमच्या टीममधील एक उत्साही व्यक्तीमत्व. काम कोणतंही असो,
ते प्रामाणिकपणे पार पडणार. मग ते काम लहान मुलानं सांगू दे किंवा वडीलधा-या
माणसांनी, सांगितलेलं काम वेळेत आणि चोख करण्यात गंगारामदा पटाईत. पक्क्या
रस्त्याचं काम सुरू असलेल्या रस्त्यावरून आम्ही येताना गावातल्या माणसांना दिसल्यानंतर
हळूहळू एक-एक जण जमा होऊ लागले. त्यांच्यामध्ये वयाने आजीसारख्या असणा-या
आयाबायाही जमू लागल्या आणि आम्ही आमची टू-व्हिलर पार्क करण्याआधीच एक जण पुढे येऊन
आम्हाला कोण पाहिजे म्हणून विचारू लागला. गंगारामदांनी शिवाजी नाईक या आपल्या
मित्राचं नाव सांगून तो कुठे रहायला आलाय म्हणून चौकशी केल्यानंतर अनेक जणांनी
ओळखीच्या खाणाखुणा चेह-यावर आणत बसण्याची विनंती केली. शेणानं सारवलेल्या मातीच्या
कट्यावर बसत असतानाच एका दादानं उभा राहून जुनी आणि कळमटलेली चटई कट्यावर टाकली,
पण शेणाच्या कट्यावर बसण्याचा आनंद क्षणात नाहीसा केला. बेरडकीवाडीतील प्रत्येक
घरांची एक ठेवण आहे. बुटकी, दाटीवाटीनं वसलेली, गावातील एकाही घरावर स्लॅब नाही,
जनावरांसाठी घराच्या पाठीमागे कारवीच्या काठ्यांचा घट्टपणे तयार केलेला गोठा,
त्यावर माच अन् त्या माचावर जनावरांसाठी वैरण. घर दोन मजली नसली तरी गावातील गोठे
मात्र दोन मजली. गोठ्यावर लावलेल्या गवताच्या गंज्या बघण्यासारख्या असतात. त्या
प्रत्येक गोठ्यात एकादी म्हैस नाही तर दोन रेडे तर आहेतच. गावात मोठ्या प्रमाणात
रेडे पाळले जातात. पावसाळ्यात भाताची रोप लागवड करताना रेड्यांच औत दणकट, आणि
कोकणातल्या पावसाचा प्रचंड मारा, त्याला रेडाहा सहज तोंड देतो असा समज येथील
शेतक-यांचा आहे. कोकणातील पावसात बैल चांगली साथ देत नाहीत हे हसत हसत सांगतात.
बेरडकीवाडीत शिवाजी नाईक
यांच्या सास-यांच्या घरात बोलत बसल्यानंतर गावातील माणसांमधील आणि आमच्यामधील ओळखीचं
हसू प्रत्येकाच्या चेह-यावर दिसू लागलं आणि बोलताना आमच्यातील असलेला आडपडदा
नाहीसा झाला. आमचं काम होतं वेगळं पण गाव बघून काम थोडं
बाजूला ठेऊन कुतूहलानं आम्ही गावाविषयी विचारू लागलो. एका-एका प्रश्नावर बोलून
झालं की, लोकं भन्नाट काय तरी सांगू लागले. गवा रेडा, अस्वल, पट्टेरी वाघ आणि
मुसळधार पावसाच्या गोष्टी एका मागून एक लोक सांगू लागले. त्या ऐकताना आनंदही आणि
अस्वस्थही वाटत होतं.
गंगारामदा आणि मी
ज्या घराच्या अंगणात बसलो होतो, तिथं आणि बाजूच्या, समोरच्या घरांच्या अंगणात
सौरऊर्जेच्या लावलेल्या मोठ्या मोठ्या प्लेटस् समोरच दिसत होत्या. सौरऊर्जा
प्रत्येकाच्या घरात कशी काय असा प्रश्न विचारताच, आमच्याजवळ बसलेली आजी म्हणू
लागली, व्हय लेका पंधरा सोळा वर्षं याच लायटावर दिवस काढलाव, आत्त चार महिने झाले
ही लाईट यऊन. आमचा दुसरा प्रश्न उपस्थिती होण्याआधीच आजीच पुढच्या गोष्टी सांगत
होती. हे गाव तरी कधी स्थापन झालं असं विचारताच आजी म्हणाली, तीन चार डोया गेल्या
असतील. म्हणजेच या गावात विजेशिवाय आणि नळपाणी योजनेशिवाय वाढलेली ही चौथी पिढी
आहे. माझ्या मनात त्याची मी गणितं घातली.
गावात शिरताना, एका
टेकडीवरून लाल कौलारू घरं दिसू लागताच, मनात एक सुंदर गावाचं चित्र निर्माण होतं,
आणि ते समोर दिसतंही. गावात गेल्यावर मात्र लक्षात येतं, इथं वीज नाही, आणि विजेवर
चालणा-या कुठल्याच गोष्टीही इथं पाहायला मिळत नाहीत, कुणाच्याही घरात जोडलेली
नळपाणी योजना नाही की, सांडपाणी वाहण्यासाठी गावातील कुठल्याच गल्लीत इथं गटारीही
नाहीत. त्याविषयी गावातील लोकांना विचारल्यावर मात्र ती दिलखुलासपणे सांगतात,
सरकारनच केलं नाही. हे सांगताना त्यांच्या चेह-यावर कोणताही नाराजीचा स्वर नसतो
की, सरकारविषयी त्यांच्या मनात कटूताही नसते. कारण गावात उच्च शिक्षण घेतलेली
माणसं कमी, आणि त्यांच्या गरजाही कमी आहेत.
गावात सातवीपर्यंत
शाळा असली तरी विद्यार्थ्यांची संख्या रोढावलेलीच. विद्यार्थिनीही आहेत, मात्र
त्याही सातवीपर्यंतच शाळेला गेल्या तर गेल्या नाही तर सातवीतच पोरींची शाळा बंद.
सातवीनंतर चंदगड नाही तर इसापूर, तेही सात आठ कि. मी. वर. गावातील काही पोरं पोरी
चालत शाळेत जातातही मात्र अस्वल, गवा रेडा नाही तर जंगली प्राण्यांचं भीती कायम
आहेच. बेरडकीवाडीत गेलं की, वाटतं खरच का आपण २०२१ मधील हे गाव बघतोय, आता वीज
गेली असली तरी गावातील काही घरांवर मात्र अजून त्याच सौरऊर्जेच्या दिव्यांसाठी
लागणा-या मोठ्या मोठ्या प्लेटसच्या अंधाराखाली घरं अजून प्रकाशाच्या प्रतिक्षेत
आहेत.
No comments:
Post a Comment