Saturday, 13 June 2020

आरूड झालेल्या कट्टरतेतील फोलपणा


नव्वदच्या दशकात आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात खासकरून मराठी शाळेत शिकलेली पिढी सर्वार्थाने घडली आहे...

शाळेत असताना कट्टर हिंदूत्ववादी, संभाजी भिडेंचा प्रचंड मोठा प्रभाव, धारकरी, मुसलमानांचा तिरस्कार आणि मनात छत्रपती शिवरायांची फक्त हिंदूत्ववादी प्रतिमा. याच विचारातून बाळासाहेब ठाकरेंच्या हातात एक दिवस भारताची सत्ता द्या, ते अणूबॉंब टाकून पाकिस्तानचा नामोनिशान मिटवतील यावर या पिढीचं ठाम मत.

तर काँग्रेसने या देशाचे वाटोळे केले. गांधीजी नसते तर देश ५० वर्षे आधीच स्वातंत्र्य झाला असता, गांधीना भगतसिंगांची फाशी रद्द करता येवू शकली असती पण त्यांनी तसं केलं नाही. अशा एक ना अनेक डोक्यात विचार. हेच विचार मग डोक्यात बसलेले. या देशाचा नथूराम हाच खरा देशभक्त कारण त्यानं गांधींना मारलं. हे नेहमीच डोक्यात म्हणून मी नथूराम गोडसे बोलतोय नाटकाची सीडी गुपचूप आणून बघणं आणि परत कट्टरतेकडं जोमानं प्रवास सुरू करणं आणि तो प्रवास नेटानं सुरू ठेऊन तो आणखी इतरांना सांगण्यासाठीची गडबड होती ती वेगळीच.

नेहरूंची एडविनाबरोबरची भानगड शाळेतल्या सगळ्या पोरांना तोंडपाट. त्यांचं ते पाकिस्तानला ५५ कोटी रूपये देणे तिच्याच सांगण्यावरून. पाचवीत आल्यापासूनच गांधी आणि नेहरूंवर पांचट जोक्स, त्यांना शिव्या देणं, चेस्टा करणं नेहमीचंच. सुभाषबाबूंना नेहरू-गांधींनी संधी दिली नाही, नाहीतर आता काँग्रेस नावालापण शिल्लक राहीली नसती हे पक्क डोक्यात भरलेलं.

या अशा अनेक अफवा आणि चूकीचे समज हे शाळेत असल्यापासूनच मनावर बिंबवले गेले. विशेष म्हणजे अनेक ऐकीव संदर्भ देवून हा समज शाळेतल्या मुलांच्या मनात दृढ करायला काही शिक्षकांनीच हातभार लावलेला.

शाळा संपून कॉलेजात गेल्यानंतर त्यातील खूप कमी लोकांनी वाचन आणि मनन केलं असेल. त्यामुळे शाळेत मनात ठासून भरलेला गांधी-नेहरू अन् कॉंग्रेस विरोध तसाच त्या पिढीवर कायम आरूड झाला. ज्यांनी अधिक वाचन केलं, संदर्भ पाहीले ते यातून सूटले, त्यांची काही निश्चीत मतं झाली. एक धारणा बनली. शाळेतल्या त्या ऐकीव माहितीतील फोलपणा त्यांच्या लक्षात आला, म्हणून ते नव्यानं विचार करू लागले.

.....पण ज्यांनी शाळा संपल्यानंतर नवा विचार शोधण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, नवं कधी काही वाचलच नाही ते मात्र आजही ५५ कोटींच्या इतिहासावर ठाम आहेत. २०१४ नंतर अशांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तेच लोक आज भक्तम्हणून उद्याला आलेत. आता हीच भक्तमंडळी केवळ व्हॉटस्अप विद्यापीठाच्या माहितीवर सोशल मीडियावर अनेकांवर टोळधाडी टाकतात.
मुळात उजवा, डावा, काँग्रेस, भाजप असा कोणताही विचार असो, त्यामागे त्याचा निश्चीत असा काहीतरी उद्देश असतो. त्या मार्गानं त्या-त्या विचारांचे ते-ते सच्चे कार्यकर्ते मार्गाक्रमण करत राहतात. पण वर्षानूवर्षे चूकीचा इतिहास सांगून निर्माण केलेल्या पिढ्या या काही वैचारिक कार्यकर्ते होवू शकत नाहीत....ते केवळ अन् केवळ भक्तच राहतात. या भक्तांचा त्या-त्या विचारांना काही प्रमाणात राजकीय फायदा सोडला तर इतर काहीच फायदा होत नाही हे कालांतराने लक्षात येते.
आणि हो, हे भक्त गॅंगकेवळ मोदींकडे आहेत हा समज नको. मोदीभक्तांची संख्या तुलनेने जास्त असली तरी इंदिरा गांधीचे भक्तआजही आहेत.... अहो तुमचा विश्वास बसणार नाही, जवळपास १३५ वर्षाचा वैभवशाली इतिहास असणारा काँग्रेस पक्ष आज मोडकळीला आला असताना तो केवळ राह़ुल गांधीच चालवू शकतात असे कित्येक वर्षे ठाम मत मांडणारे भक्तआजपण जोरात आहेत आणि ते पुढेही राहतीलच हे नक्की.
………………………

Abhijit Jadhav
abhi.jadhav65@gmail.com
following on twitter: @SahyadriAbhi

No comments:

Post a Comment

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...