...आता नेमकं मी शाळेत कोणत्या वर्गात होतो ते माहित नाही, पण त्यावेळची एक गोष्ट आठवते. वाचायला यायला लागलं होतं, मेंदू पूर्ण नाही पण घडण्याच्या प्रोसेसमध्ये होता. अगदी तुपाचा गोळा असावा तसा मेंदू होता. म्हणजे कुठल्या तरी धगीजवळ तूप ठेवावं आणि ते वितळून जावं तसं अगदी. वाचायला येऊ लागल्यानंतर मेंदू वितळायला लागला की, घडत होता माहिती नाही. पण आत आत कुठेतरी काही तरी घडत होतं माझ्यात. मेंदू वितळत होता आणि घडण्याच्याआधीच मी बिघडत होतो. आम्ही कॉलनीत रहायला होतो आणि वाचायला येत होतं मला. आज आणतात तसेच त्यावेळीही आमचे आबा रोज पेपर आणायचे. कॉलनीतील काही म्हातारी माणसं माझ्याकडून पेपर वाचून घेत होती. आणि मी मोठ मोठ्यानं वाचून दाखवत होतो. एक दिवस सकासकाळी पेपर वाचत होतो. तेव्हा पेपरात एक फोटो छापून आला होतो. अगदी मोठा. नजरेत भरेल एवढा. हातात कसल्यातरी रंगाचा झेंडा, चेहर्यावर उग्र भाव आणि कुठल्यातरी धर्मस्थळच्या वास्तुचा वरचा भाग. त्या भागावर उभा राहून तो झेंडा फडकवत होता. झेंडा फडकवणार्या माणसा पाठीमागे आणखी काही माणसं होती. त्यांच्याही हातात झेंडे आणि काठीसारख्या वस्तू दिसत होत्या. तो फोटो मी बराच काळ पहात बसलो होतो. तपकीर्या रंगात छापलेल्या त्या उग्रवादी माणसाचा चेहरा नंतर कित्येक वर्षे माझ्या मनपटालावर कायम कोरला गेला. तो आजही कायम तसाच आहे.
तो झेंडा फडकवणारा, चेहर्यावर विचित्र भाव आणून लोकांना उद्दीपित करणारा माणूस म्हणजे काय तरी विचित्र घडतय असच कायम मला वाटत आलय. आजही तेच वाटतं. आज कुठंही दंगल झाली. स्फोट झाला, माणसं मेली, आया बहिणींच्यावर अत्याचार झाले की मला तेच चित्र, त्याच माणसाचा उग्र चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. वाटतं हे घडवणारा तोच असणारा. हे कधी काळी माझ्या मनावर बिंबलेलं चित्र. कारण मेंदू तुपाचा गोळा होता. आता या वेळी तो कुठे असेल माहित नाही पण तोच आहे असं वाटत राहिलं कित्येक दिवस.
आता काळ खूप पुढं निघून गेलाय. पण हे आहे हे तसच आहे. माझ्या मनात. दंगली झाल्या की, हे चित्र आपोआप माझ्या मनात तरळू लागतं. आवाज येऊ लागतात माणसांचे. लाल लाल असणारं रक्त किती विभागल जातय असं वाटू लागतं आणि पुन्हा पुन्हा मला तेच आठवू लागतं. आणि मनात पुन्हा पुन्हा तेच तरळू लागत.
मी लहान होतो का, मला कळत नव्हतं की हे सगळं होतं ते. शाळेत इतिहास शिकताना वाटायचं की, शिवाजी महाराज म्हणजे इतिहास, आणि ज्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाबरोबर युद्ध केलं तो अफजल खान मुस्लीम होता आणि मुस्लीम म्हणजे आपल खरे विरोधक. शाळेत असणार्या मुस्लीम पोरांकडंही मग असच कुठल्यातरी चष्म्यातून बघायला लागू लागलो. कारण तो चष्मा मिळाला होता, त्या उग्रवादी माणसाकडून. झेंडा फडकवणार्या, वास्तुवर नाचणार्या आणि वास्तू पाडणार्या माणसांकडून.
मग कधी तरी मेंदू पडत धडपडत मेंदू वयात आला. चांगली माणसं भेटली. चांगूलपणाची संकल्पना मला अजूनही कधीच समजली नाही. त्याच्या शोधात आहे. पण वाईटपणाची संकल्पना मात्र मनात कधीच रुजली. त्याला कधी धक्का लागला नाही. धक्का लागू दिला नाही.
तो धक्का लागू दिला असता तर मीही तसाच हातात झेंडा हातात घेऊन त्या वास्तुवर मिरवला, नाचलो असतो. आणखी कितीतरी जणांना चेतवत राहिलो असतो. भूक, अन्न, पाणी यापेक्षा चेतवणं मला महत्वाचं वाटलं असतं.
बाबरी पाडल्यानंतर मनात असं असुरक्षितते एवेजी सुरक्षितच वाटू लागलं होतं. यांच्यापेक्षा आपली खूप मोठी झुंड आहे असंही वाटत होतं. आपलं कुणीच वाकडं करू शकत नाही, कुणी आलंच वाटेत तर त्यांना कापायला किती वेळ लागले असा केवढा मोठा विश्वास वाटत होता. कापाकापाची भाषा त्यावेळी आपोआप मला जमू लागली. कुठला तरी रंग मनात गडद होत होता आणि मी अधिकचअधिकच तीव्र, गडद आणि हिंसक असं काय तरी होत होतो. त्यावेळी असणार्या माझ्या सायकलवरही एक झेंडा काढून घेतला होता. त्यावेळी आबा म्हणत होते हे असलं कायतरी करण्यापेक्षा शाळा शिक नीट, अभ्यास कर, बरोबरची पोरं बघ आणि तुझं काय चाललय बघ. कुठला तरी फालतू अति उग्रवादी विश्वास घेऊन मी जेव्हा वाढत होतो, प्रोसेसमध्ये घडत होतो त्यावेळी कॉलनी नावाच्या गोष्टीनं मला एक अद्दल घडवली होती. आम्ही त्यावेळी कॉलनीत काय काय करत होतो. सगळं अगदी एकत्र. कधी तरी बाबरी पाडली आणि मनात उगाच पाल चुकचुकत राहिली. ती जास्त काळ राहिली नसली तरी मनात राहू बघत होती. शाळेत मग कधी सर, बाई काय काय चांगलं चांगलं शिकवत राहिल्या अन्बाबरी पडावी तशी मनातली कवाडं पडत राहिली. माणसं सुंदर भासू लागली, नाही ती सुंदर आहेतच, आणि सुंदरच दिसू लागली. Babri_Masjid
तू अप्रतिम लिहितोस
ReplyDeleteती बाबरी... त्या लोकांची करून गाथा... समान्याची होणारी घालमेल... उत्तम मांडणी आणि सहोदरा लिखाण
ReplyDelete