फकरुद्दीन बेन्नुर...कॉलेजमध्ये असताना कधीतरी त्यांचे लेख वाचत होतो. का कुणास ठाऊक पण त्या दिवसांपासून उगाच मला वाटायचं यांना भेटलं पाहिजे. कदाचित आता असं वाटतं हमीद दलवाईंच्या इंधन कांदबरीमुळे मला उगाच त्यांच्याबद्दल अप्रुप वाटायचं. ते अधिक चांगलं सांगितील असंही नेहमी वाटत राहिलं. परिवर्तनाचा वाटसरूमध्ये त्यांचे लेख यायचे तेव्हा मग परिवर्तनाचा मी नेहमीचा वाचक झालो. त्यांच्या लेखासाठी मी ते मासिक घेत होतो. बाकीचेही लेख अभ्यासपूर्ण असायचेच. पण बन्नुर सरांचे लेख विशेष आवडायचे. कोल्हापुरात एकदा दोनदा आले होते, तेव्हा मला तीव्रपणे भेटायची इच्छा झाली, पण त्यांच्याजवळच्या गर्दीनं ते शक्य झालं नाही. पण त्यांचे कुठं कुठं छापून आलेलं वाचत राहिलो. भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता हे त्यांचं वाचलेलं पुस्तक. वाचून झाल्यावर त्यांना पत्र लिहून कळवावं असं वाटलं पण ते आळसामुळं झालं नाही.
त्यांच्यामुळं मग सोलापुरविषयी आपुलकी वाटायची. सोलापुरचं कोण भेटलं की आनंद व्हायचा आणि त्याला मग माझा प्रश्न असायचा फकरुद्दीन बेन्नुर सरांना कधी भेटलाय की नाही...मग ते म्हणायचे ऐकलय, वाचालय त्यांचं, तेव्हा मला भारी वाटायचं. त्यांना प्रत्येकानं वाचलं पाहिजे असंही वाटत रहायचं आणि आता तर ते तीव्रपणे वाटू लागलंय.
गेल्या वर्षी सांगलीत असताना ते एकदा एका कार्यक्रमाला आले होते, प्रसादाला सांगितल्यावर तो घेऊनही गेला. त्यावेळी रात्रीचे आठ साडे आठ वाजले होते. ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तिथेच मग प्रसाद घेऊन गेला. जेवत होते, शांतपणे समोर बसलेल्यांना काहीतरी सांगत होते. त्याही गर्दीतही मग भेटायचं राहून गेलं. पण मग आम्ही त्यांच्यासमोरच जेवायला बसलो. जेवणानंतर तरी भेटायचं ठरवलं पण शेवटपर्यंत गर्दी काय कमी झाली नाही...आणि भेटायची इच्छाही पूर्ण झाली नाही...
No comments:
Post a Comment