Monday, 12 March 2018

राबणार्‍या बापाचा हात, हातात पाहिजे

आबा आमचे कारखान्यात नोकरीले होते. मग मला मी नोकदाराचा पोरगा आहे असं वाटे. आठवड्याच्या सुट्टी दिवशी मात्र आबा शेतात जाऊन राबायचे. आम्‍हा भावडांना ते दिसत नसे. शाळेची पोरं म्‍हणून आबा आजही आम्‍हाला शेतच्या बांधावर जाऊ देत नाहीत. आबा आजही शेतात जातात राबतात, कष्ट करतात आबांबरोबर आमची आईही असतेच. मी मात्र तटस्‍थ राहून त्‍यांचं राबणं आणि कष्टणारे हात पाहत उभा असतो बांधावर. बांधावर असणार्‍या झाडाच्या सावलीत. आमच्या आबांसारख्या अनेक राबणार्‍या हातांच्या लोकांचा लाँग मार्च निघालाय. शेतकर्‍याचं पोरगं असलो तरी या मोर्चाला मी काहीही देणं लागलो नाही. फेसबुक, ट्‌विटर, व्‍हॉटसअपवर फक्‍त रक्‍ताळलेल्या आणि पोळणार्‍या  पायांचे फोटो बघत ब
सलोय.

नंतर आबा कधी तरी रिटायर झाले आणि कारखान्यावरचा सगळा प्रपंच आमचा आमच्या गावाकडं आला. आपसूक आबांच्या हातात वेळ आला. मग आबा नेहमी शेतात दिसे. आमची शेती पाण्याची नाही. सगळी जमीन बॉक्‍साईट मिश्रीत. पावसाच्या दिवसात भाताची रोप होई तेवढीच. आता आता गावाकडच्या माणसांनी विहिरी, पाईपलाईन टाकून शेता शेतात पाणी फिरवलं आहे. आता पाणी असलं तरी इतर जमिनींपेक्षा आमच्या जमिनीत राबणूक दुप्‍पट. तरीही गावाकडची लोकांनी शेती बंद केली नाही. राबत राहिले, आणि अजून राबत आहेत. हे निरंतर आहे. कधीही न संपणारं. गावाकडच्या आमच्या आबांच्या पिढीनं कुठं, कुठं नोकरीधंद्ये केले, मुंबई पुणे गाठली. आपली पोरं शिकावी, रुबाबात नोकरी करावी या एकाच आशेनं. आबांची पिढी आता रिटायर झालीय, आणि आमच्यासारख्या पोरांची नवी पिढी शिक्षणात रमली. नोकरीसाठी धडपड, धडपड. काय काय शिकली, सवरली, परदेशात गेली. काय काय केलं नोकरीसाठी. नोकरी मिळालीही पण बिनभरवशाची. शेतकर्‍यांसारखीच अवस्‍था. बिकट आणि वाईट. शेतकरी म्‍हणजे चिखलात रुतलेला बैल. बैल कितीही ताकदवान असला तरी तो एकदा चिखलात रुतला की त्याची अवस्‍था वाईट होते. मग कुणीही येतं आणि रुबाबात असणार्‍या बैलाला धडे देतं. तशीच अवस्‍था शेतकर्‍याची. शाळेत असताना एकदा मित्राचे वडील शाळेत आले होते. ते बिचारे शेतकरी. साधाभोळा माणूस. आमच्या एका सरांनी त्यांना वर्गात बोलवून घेतले तेव्‍हा काही मुलं त्यांना हसली होती. त्या हसण्यार्‍यांमध्ये मी ही होतो. आता वाटतं त्यांना का म्‍हणून हसलो असेल. की त्यांच्या साध्याभोळ्या स्‍वभावाचं हसू आलं असेल. आमचे आबाही शेतकरीच आहेत की. आता हे विचार मनात येतात. प्रश्न उभा राहतात. तेव्‍हा उत्तरं नसतात माझ्याकडे.

शेतकर्‍याचं पोर म्‍हणून त्याकाळी मला खरचं अभिमान वगैरे वाटायला पाहिजे होतो. पण शाळेत असताना आपला देश कृषीप्रधान आहे एवढ्याशीशी काय तो माझा कृषीव्‍यवस्‍थेशी आणि कृषीसंस्‍कृतीशी संबंध. नंतर नंतर कळू लागलं तसं शेतकर्‍याचं जगणं म्‍हणजे काय ते आमच्या आबांकडंचं मी पाहू लागलो. दुनिया खूप मोठी आहे. दुनियेचं कुणामुळं काही आडणार नाही असं वाटलं जातं तेव्‍हा शेतकरी आठवला की वाटतं. त्याच्यामुळे सगळं आडू शकतं आपलं. आज शेतकर्‍यांचा लाँग मार्च निघालाय. मनातील आक्रोश घेऊन तो सत्ताधीशांजवळ आलाय. याआधीही शेतकर्‍यांना आक्रोश केलाय, आंदोलन केलंय, रस्‍ते आडवले, रेल्‍वे बंद पाडल्या, दर द्या, मालाला हमीभाव द्या अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. सगळ्यां मागण्यांसाठी रस्‍त्यावर उतरूनच आवाज द्यावा लागला. घसा कोरडे पडेपर्यंत घोषणा द्यायच्या आणि रिकाम्या हाताने, पोटानेच पुन्‍हा घराचा रस्‍ता धरायचा हेच शेतकर्‍याच्या नशिबी. काळ बदलला तसा वेळही बदलला. शेतकर्‍यांसाठी मग नेते रस्‍त्‍यावर उतरले. संघटना आल्या. त्यांनी मूळ धरलं. कार्यकर्ते असणारी माणसं नंतर नेते झाले आणि आता नेत्‍यांचे मंत्रीही झाले. या सगळ्या प्रोसेसमध्ये कार्यकर्ता असणारा मंत्री, खासदार झाला. आगेमागे कार्यकर्त्यांची फौज आली. लाल पिवळ्या दिव्याच्या गाड्या आल्या मात्र शेतात राबणारा शेतकरी तसाच शेतात राहिला, रस्‍त्यावर उतरणारा बळीराजा उपाशी, रिकाम्या हातानेच घरी परतलाय. उद्याच्या आशेवर.

आता उगाच वाटू लागलय. आपण शेतकर्‍याचं पोरगं. शेतकर्‍यांचा आजचा लाँग मार्च निघलाय. शेतकर्‍यांचा, शेतकर्‍यांचा असा आवाज घुमलाय. आणि मी मात्र हां ते शेतकर्‍यांच आहे म्‍हणत ऑफिसाच्या खिडकीतून एकाद्या रस्‍त्‍यावरच्या शेतकर्‍याकडे बघत बसलोय. बारा महिने, चोवीस तास शेतकर्‍यांसमोर अडचणींचा डोंगर. त्या वाढत नसल्या तरी कमी मात्र होत नाहीत. तरीही एकामागून एक वाढतच जातात. आज हे तर उद्या ते. कधी पाण्याचा, कधी पिकाचा, कधी पैशाचा, कधी काळाचा, कधी वेळेचा तर कधीचा जीवाचा सामना ठरलेला.उन्‍हाच्या झळा वाढल्या, चटके बसू लागले, विहिरीच्या पाण्यानं तळ गाठला, घरात असणारी जनावरांची पेंड संपली किंवा घरातील कुत्रं कधी तरी दिसलं नाही म्‍हणून कासावीस होणारा शेतकरीच असतो. स्‍वत: पेक्षा घरातल्या माणसांची आणि गोठ्यातल्या जनावरांची चोवीस तास, बारा महिने काळजी. मुक्‍या जनावरांसाठी रात्रीचा दिवस करणारा शेतकरीच असतो. कधीतरी घरातील जनावर बाजारात विकायला काढलं की त्याची दशा बघायला मिळते. डोळ्यातील पाणी कमी नसतं. दावणीचं ढोर कधी, कुठं जाईल म्‍हणून आतल्या आत तीळ तीळ तुटणारा शेतकरी जेव्‍हा आपल्या मागण्यांसाठी तहान भूक हरपून रस्‍त्‍यावर उतरतो तेव्‍हा आम्‍ही आमच्यात मश्गूल असतो नाही तर ट्रफिक झाम म्‍हणून चुकचूकत कुठून तरी कुठे तरी जात राहतो. शेतकर्‍याला न विचारता, न बोलता.
फोटो twittwer यांच्या सौजन्याने

4 comments:

  1. देव सर नेहमीप्रमाणेच काळजाला भिडणारं लिखाण

    ReplyDelete
  2. Unveils heart touching ground reality of farmer's life..

    ReplyDelete

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...