Monday, 12 March 2018

राबणार्‍या बापाचा हात, हातात पाहिजे

आबा आमचे कारखान्यात नोकरीले होते. मग मला मी नोकदाराचा पोरगा आहे असं वाटे. आठवड्याच्या सुट्टी दिवशी मात्र आबा शेतात जाऊन राबायचे. आम्‍हा भावडांना ते दिसत नसे. शाळेची पोरं म्‍हणून आबा आजही आम्‍हाला शेतच्या बांधावर जाऊ देत नाहीत. आबा आजही शेतात जातात राबतात, कष्ट करतात आबांबरोबर आमची आईही असतेच. मी मात्र तटस्‍थ राहून त्‍यांचं राबणं आणि कष्टणारे हात पाहत उभा असतो बांधावर. बांधावर असणार्‍या झाडाच्या सावलीत. आमच्या आबांसारख्या अनेक राबणार्‍या हातांच्या लोकांचा लाँग मार्च निघालाय. शेतकर्‍याचं पोरगं असलो तरी या मोर्चाला मी काहीही देणं लागलो नाही. फेसबुक, ट्‌विटर, व्‍हॉटसअपवर फक्‍त रक्‍ताळलेल्या आणि पोळणार्‍या  पायांचे फोटो बघत ब
सलोय.

नंतर आबा कधी तरी रिटायर झाले आणि कारखान्यावरचा सगळा प्रपंच आमचा आमच्या गावाकडं आला. आपसूक आबांच्या हातात वेळ आला. मग आबा नेहमी शेतात दिसे. आमची शेती पाण्याची नाही. सगळी जमीन बॉक्‍साईट मिश्रीत. पावसाच्या दिवसात भाताची रोप होई तेवढीच. आता आता गावाकडच्या माणसांनी विहिरी, पाईपलाईन टाकून शेता शेतात पाणी फिरवलं आहे. आता पाणी असलं तरी इतर जमिनींपेक्षा आमच्या जमिनीत राबणूक दुप्‍पट. तरीही गावाकडची लोकांनी शेती बंद केली नाही. राबत राहिले, आणि अजून राबत आहेत. हे निरंतर आहे. कधीही न संपणारं. गावाकडच्या आमच्या आबांच्या पिढीनं कुठं, कुठं नोकरीधंद्ये केले, मुंबई पुणे गाठली. आपली पोरं शिकावी, रुबाबात नोकरी करावी या एकाच आशेनं. आबांची पिढी आता रिटायर झालीय, आणि आमच्यासारख्या पोरांची नवी पिढी शिक्षणात रमली. नोकरीसाठी धडपड, धडपड. काय काय शिकली, सवरली, परदेशात गेली. काय काय केलं नोकरीसाठी. नोकरी मिळालीही पण बिनभरवशाची. शेतकर्‍यांसारखीच अवस्‍था. बिकट आणि वाईट. शेतकरी म्‍हणजे चिखलात रुतलेला बैल. बैल कितीही ताकदवान असला तरी तो एकदा चिखलात रुतला की त्याची अवस्‍था वाईट होते. मग कुणीही येतं आणि रुबाबात असणार्‍या बैलाला धडे देतं. तशीच अवस्‍था शेतकर्‍याची. शाळेत असताना एकदा मित्राचे वडील शाळेत आले होते. ते बिचारे शेतकरी. साधाभोळा माणूस. आमच्या एका सरांनी त्यांना वर्गात बोलवून घेतले तेव्‍हा काही मुलं त्यांना हसली होती. त्या हसण्यार्‍यांमध्ये मी ही होतो. आता वाटतं त्यांना का म्‍हणून हसलो असेल. की त्यांच्या साध्याभोळ्या स्‍वभावाचं हसू आलं असेल. आमचे आबाही शेतकरीच आहेत की. आता हे विचार मनात येतात. प्रश्न उभा राहतात. तेव्‍हा उत्तरं नसतात माझ्याकडे.

शेतकर्‍याचं पोर म्‍हणून त्याकाळी मला खरचं अभिमान वगैरे वाटायला पाहिजे होतो. पण शाळेत असताना आपला देश कृषीप्रधान आहे एवढ्याशीशी काय तो माझा कृषीव्‍यवस्‍थेशी आणि कृषीसंस्‍कृतीशी संबंध. नंतर नंतर कळू लागलं तसं शेतकर्‍याचं जगणं म्‍हणजे काय ते आमच्या आबांकडंचं मी पाहू लागलो. दुनिया खूप मोठी आहे. दुनियेचं कुणामुळं काही आडणार नाही असं वाटलं जातं तेव्‍हा शेतकरी आठवला की वाटतं. त्याच्यामुळे सगळं आडू शकतं आपलं. आज शेतकर्‍यांचा लाँग मार्च निघालाय. मनातील आक्रोश घेऊन तो सत्ताधीशांजवळ आलाय. याआधीही शेतकर्‍यांना आक्रोश केलाय, आंदोलन केलंय, रस्‍ते आडवले, रेल्‍वे बंद पाडल्या, दर द्या, मालाला हमीभाव द्या अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. सगळ्यां मागण्यांसाठी रस्‍त्यावर उतरूनच आवाज द्यावा लागला. घसा कोरडे पडेपर्यंत घोषणा द्यायच्या आणि रिकाम्या हाताने, पोटानेच पुन्‍हा घराचा रस्‍ता धरायचा हेच शेतकर्‍याच्या नशिबी. काळ बदलला तसा वेळही बदलला. शेतकर्‍यांसाठी मग नेते रस्‍त्‍यावर उतरले. संघटना आल्या. त्यांनी मूळ धरलं. कार्यकर्ते असणारी माणसं नंतर नेते झाले आणि आता नेत्‍यांचे मंत्रीही झाले. या सगळ्या प्रोसेसमध्ये कार्यकर्ता असणारा मंत्री, खासदार झाला. आगेमागे कार्यकर्त्यांची फौज आली. लाल पिवळ्या दिव्याच्या गाड्या आल्या मात्र शेतात राबणारा शेतकरी तसाच शेतात राहिला, रस्‍त्यावर उतरणारा बळीराजा उपाशी, रिकाम्या हातानेच घरी परतलाय. उद्याच्या आशेवर.

आता उगाच वाटू लागलय. आपण शेतकर्‍याचं पोरगं. शेतकर्‍यांचा आजचा लाँग मार्च निघलाय. शेतकर्‍यांचा, शेतकर्‍यांचा असा आवाज घुमलाय. आणि मी मात्र हां ते शेतकर्‍यांच आहे म्‍हणत ऑफिसाच्या खिडकीतून एकाद्या रस्‍त्‍यावरच्या शेतकर्‍याकडे बघत बसलोय. बारा महिने, चोवीस तास शेतकर्‍यांसमोर अडचणींचा डोंगर. त्या वाढत नसल्या तरी कमी मात्र होत नाहीत. तरीही एकामागून एक वाढतच जातात. आज हे तर उद्या ते. कधी पाण्याचा, कधी पिकाचा, कधी पैशाचा, कधी काळाचा, कधी वेळेचा तर कधीचा जीवाचा सामना ठरलेला.उन्‍हाच्या झळा वाढल्या, चटके बसू लागले, विहिरीच्या पाण्यानं तळ गाठला, घरात असणारी जनावरांची पेंड संपली किंवा घरातील कुत्रं कधी तरी दिसलं नाही म्‍हणून कासावीस होणारा शेतकरीच असतो. स्‍वत: पेक्षा घरातल्या माणसांची आणि गोठ्यातल्या जनावरांची चोवीस तास, बारा महिने काळजी. मुक्‍या जनावरांसाठी रात्रीचा दिवस करणारा शेतकरीच असतो. कधीतरी घरातील जनावर बाजारात विकायला काढलं की त्याची दशा बघायला मिळते. डोळ्यातील पाणी कमी नसतं. दावणीचं ढोर कधी, कुठं जाईल म्‍हणून आतल्या आत तीळ तीळ तुटणारा शेतकरी जेव्‍हा आपल्या मागण्यांसाठी तहान भूक हरपून रस्‍त्‍यावर उतरतो तेव्‍हा आम्‍ही आमच्यात मश्गूल असतो नाही तर ट्रफिक झाम म्‍हणून चुकचूकत कुठून तरी कुठे तरी जात राहतो. शेतकर्‍याला न विचारता, न बोलता.
फोटो twittwer यांच्या सौजन्याने

Wednesday, 7 March 2018

बाई असले तरी हमालीतच जीव रमायचा


सायंकाळ झाली की, कोल्हापूर-गारगोटी मार्गावर आयटीआय काॅलेजजवळ घ्या मेथी, घ्या दोडका, घ्या मुळा असा बाईचा टीपेला जाणारा आवाज ऐकू येतो. सायंकाळी त्या आवाजाच्या दिशेनं माणसांची मोठी गर्दी दिसते, त्या गर्दीत भाजी देत, हिशोब लावत, चेहर्‍यावर निरागस हसू देत गोकुळा सगळ्यांबरोबर बोलत असते आणि हिशोब लावत असते.
एखाद्या बाईला भाजी विकणं ही सोपी गोष्ट नसली तरी गोकुळानं अवघड गोष्ट सोडून सोपी गोष्ट पत्करली आहे. माहितीतील एकादा माणूस जेव्हा तिला विचारतो मावशी हमाली सोडून इथं जीव रमतो का? तेव्हा या प्रश्नावर ती मनमुरादपणे हसत म्हणते हमालीसारखा इथं जीव रमत नाही. लाडक्या जाऊन चुकला, नाहीतर इथं, कोण कशाला येतं? लाडक्या म्हणजे त्यांचा एकुलता एक बैल. बैल असला तरी घरातील एक अपरिहार्य पात्रं. म्हणून गोकुळा विचारते हमाली सोडून इथं कोण? कशाला येतं? हा ती लगेच प्रतिप्रश्न करते. आणि पुन्हा एकदा हसत हसत गोकुळा मावशी आपल्या जुन्या आठवणी सांगते.
गोकुळा नामदेव कोंडारे मुळगाव बार्शी, सध्या कळंब्याजवळील झोपडपट्टी.
सोलापूर जिल्ह्यातून कामासाठी म्हणून  पंधरा वीस वर्षापूर्वी कोल्हापुरात सारं कुटुंब अालं. काम शोधण्यापेक्षा नामदेव कोंडारेंनी हमाली सुरू केली. कधी धान्याच्या दुकानात, कधी सिमेंटच्या दुकानात, तर कधी पडेल तिथे हमाली करीत राहिले. सोबतीला एक बैल आणि एक बैलगाडी. चौघांचं जगणं एकट्या नामदेव कोंडारे यांच्यावर. परिस्थितीमुळं लहान मुलं नकळत्या वयातच मोठी झाली, म्हणून मग नामदेव आणि पत्नी गोकुळा दोघंही कामावर जाऊ लागली. नामदेव कोंडारे घर चालवण्यासाठी दिवसरात्र राबू लागले. नेहमीप्रमाणे एक दिवस हमाली करताना, अपघात झाला. पाठीच्या मणक्याला मार लागला आणि घर चालवणार्‍या नामदेवरावांची हमाली कायमची थांबली.
नामदेव यांची हमाली थांबली. खाणार्‍या पोरांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. नामदेव यांच्या औषधांचा खर्च वाढला. डाॅक्टरांना भेटल्याशिवायपर्याय राहिला नाही. असे एक ना अनेक प्रश्न गोकुळासमोर उभा राहिले. मदतीचे, सहकार्याचे सगळे पर्याय नाहीसे झाल्यावर मात्र गोकुळानं बैलाचा कासरा हातात धरला, आणि हमालीसाठी सिमेंटच्या दुकानासमोर बैलगाडी लावली. दुकानाचे मालक, ग्राहक गोकुळाकडे बघत राहिले, त्यांनी प्रश्न विचारण्याआधीच गोकुळानं ५० किलोची सिमेंटची पिशवी पाठीवर मारून हमाली करायला सुरूवातही केली होती.
नवर्‍याच्या अपघातानं ओझ्याचं पोतं पाठीवर आलं, असं गोकुळा सांगत असताना तिच्या चेहर्‍यावरचा अानंद मात्र तसूभरही कमी झालेला नसतो. जीव असेपर्यंत राबायलाच पाहिजे की? नाही तर खाणार काय कुणाच्या जीवावर आणि कशाला एैश करा? जीवात जीव असेपर्यंत काम करणं आणि पोरांना आनंदी बघणं हेच खरं आनंद देणारं काम आहे असंही ती सांगते. तेव्हा ती आणखी खुलते आपल्या कामाचं सगळं शेड्यूल्ड सांगत राहते.
गोकुळा आता भाजीपाला विकते. महागाईनं सगळ्यांचच कंबरडं मोडलय हेही ती सांगायला विसरत नाही. ओझं उचलण्यापेक्षा हे काम सोपय, बसून काम करता येतं म्हटल्यावर गोकुळा मावशी गुडघ्यावर हात ठेऊन म्हणते, नकारार्थी हात हलवत नाही नाही म्हणत या कामात दम नाही असं ती दिलखुलासपणे सांगते. काम ओझ्याचं नाही खरं गुडघे राहत नाहीत, हमालीसारखं सुख ह्यात कुठंय? हमालीमध्ये रमतो तसा जीव ह्यात रमत नाही रे म्हणत किटलीमधून आणलेल्या चहाची आॅफर देत चला, चला गिर्‍हाईक अालं म्हणते आणि हात जोडून निरोप घेते.

लाडक्या घराचा आधा


कोंडारे घरात राबणारे जसे माणसांचे चार हात होते, तसेच कायम कामात असणारे चार पायही होते. ते चार पाय म्हणजेच लाडक्या. सगळ्या घराचा डोलारा लाडक्या नावाच्या बैलावर. एक दिवस अचानक लाडक्या अजारी पडला आणि त्यातच तो गेला. लाडक्या गेल्याचं दुःख सगळ्या घराला झालं. घराचं उत्पन्न थांबलं आणि त्याच्या जाण्यानं घरही थांबलं. गोकुळा म्हणते तो गेल्यावर राबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यातच मालक आजारी म्हणून भाजीपाला विकायला सुरूवात केली, नाहीतर मी हमाली सोडली नसती असंही ती सांगते.

Tuesday, 6 March 2018

नाटक अजून बाकी आहे....

तसं मला नाटक आवडतं. लहान असताना गावात नाटक व्‍हायचं. नंतर दादा आमचा एकांकिका, नाटक करू लागला. तेव्‍हापासून ते आणखी आवडू लागलं. काल गावात दशावतारी नाटक झालं. माझ्या मित्राच्या गावातील नाट्य मंडळी होती म्‍हणून मी ते नाटक आवडीनं रात्रभर पहात बसलो. अगदी त्यांच्या मेकअपपासून ते कथानकाच्या शेवटापर्यंत पहात बसलो. या नाटकात माझा मित्र नारायण काम करतो असं उगाच वाटे. नारायण, विठ्ठल, एकनाथ ही माझी दोस्‍त मंडळी अजून नाटकात काम करतात. कालचे नाटक करणारेही त्यांच्याच वर्गातले. आगेमागे असणारे. . म्‍हणून मग पाहत बसलो. आवडू लागलं तसं त्यांच्याच मेकअप रूममध्ये जाऊन बसलो. नारायणची ओळख सांगितल्यावर ते आणखी खुलले. मला बारकावे सांगत, संदर्भ देऊ लागले. मग भारी वाटू लागलं.


म्‍हणजे दशावतार सादर करणारी सगळी मंडळी म्‍हणजे माझी पिढी. प्रथम सादर होणार्‍या गणपतीस्तवनापासून मग सुमधुर, ऋद्धी, सिद्धी, सरस्वती, ब्रह्मदेव आणि संकासुर यांच्या प्रवेशापर्यंत दशावतार मला बेहद्द आवडतं. संकासूराच्या प्रवेशानंतर मुख्यकथानकाला सुरूवात होते तेव्‍हा गावाकडची नाटक करणारी ही पोरं रंगमंच नसताना, हायफाय कोणत्याही नाटकाच्या सोयीसुविधा नसताना जमिनीवरच आणि एका दुसर्‍या लाईटच्या प्रकाशात नाटकाचा सुंदर माहोल बनवतात. समोर बसणार्‍या प्रत्येकाला खेळवून ठेवण्याचं सामर्थ्य ते त्यांचं त्‍यांनी निर्माण करतात.
काल नाटक सादर होत असताना मला माझ्या मित्रांची आठवण येत राहिली. माझे मित्रही दशावतार करतात याचं नेहमी मला अप्रूप वाटत आलंय. नाट्यगीतं, पौराणिक भाषेतील तो लहेजा तो ते खूप आनंदानं सांभळतात. विनोदी पात्रं, पौराणिक काळातील असली तरी त्याला समकाळातील संदर्भ देत विनोदाची वातावरणनिर्मिती ते करतात. गावाकडची माणसंही त्यांना तेवढ्याच मनमुरादपणे दाद देतात.

नाटक सुरू होण्याआधीपासून त्यांची होणारी तयारी बघण्यातील मजा वेगळी असते. मेकअप करताना तिथे एक गंध पसलेला असतो. तो मोहविणारा असतो. त्यांच्या चेहर्‍यावर चढणारा रंग बघून आणि पूर्णत्‍वाकडं जात असलेलं त्यांचं पात्र ते मध्यरात्रीपासून अधिकाधिक खूलत जातं.
नाटक अजून बाकी आहे....(अपूर्ण)

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...