Monday, 26 February 2018

तंबाखुच्या वासाची मराठी कथा

भाषावार प्रांतरचना झाली आणि सरळमार्गी असणारं शिक्षण थांबत थांबत कधी थांबलं ते कळलं नाही. शिक्षण थांबलं मग जगण्याचा संघर्ष चालू झाला. कधी गॅरेज, कधी पडेल ते काम करीत राहिलो तरी वाचनाची आवड स्‍वस्‍त बसू देत नव्‍हती. मग लिहावसं वाटू लागलं म्‍हणून मग तंबाखू कामगार, महिला, ट्रक ड्रायव्‍हर, क्‍लिनर, गॅरेजवाले, जोगते-जोगतीण या कष्टकरी माणसांच्या जीवनाचं चित्र रेखाटावं वाटू लागलं म्‍हणून मग माझ्या साहित्‍याच्या कथेत हिच माणसं नायक म्‍हणून येऊ लागली असं पीठाक्षरं माहितीपटात सांगताना महादेव मोरे यांच्या चेहर्‍यावर आनंद विलक्षण असतो. माझ्या कॉलेजच्या काळात सत्‍यकथेत लिहिणारी माणसं, जीए, अरविंद गोखले ही माणसं वाचनात आली आणि अधिक तीव्रतेने साहित्याकडे वळत गेलो असंही ते प्रांजळपणे सांगतात. वाचनाच्या आवडीतूनच सत्यकथा मासिकेचा वर्गणीदार झालो. आणि माझ्या परिसरातील तंबाखू कामगार, महिला, उपेक्षितांचे, दलितांचं, मजूर महिलांचं जीवन चितरण्याचा प्रयत्‍न करू लागलो. या त्यांच्या प्रयत्‍नाना, लिहिणार्‍या कष्टकरी हाताला प्रा. रमेश साळुंखे यांनी चित्रबद्ध करताना माहितीपटाचे कोणतीही सीमारेषा आखून न घेता त्यांनी सविस्‍तरपणे चित्रमय भाषेत मांडली आहे. यासाठी रमेश सांळुखे यांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा.

महादेव मोरे लिहू लागले, पुस्‍तकं बाजारात आली आणि त्यांच्यावर समीक्षकांची नजर गेली. मग समीक्षकांनी तंबाखूच्या वासाची मराठी कथा म्‍हणून त्यांच्या कथेचा गौरव केला. निपाणीसारख्या गावात राहताना वाचन, खेळ अशा गोष्टी आवडायच्या म्‍हणून बालवीर क्‍लबमध्ये लिहित राहिलो. यानंतर बालवीर क्‍लबतर्फे रोजीनिशी लिहिणे, खेळाच्या स्‍पर्धा, लेझीम अशा अनेक गोष्टी करीत विद्यार्थ्यांना त्या शिकवत राहण्यात आनंद वाटायचा यातूनच माझी कथा राहिली असे ते आपल्या कर्नाटक मराठी बोलीभाषेत ते सांगतात तेव्‍हा वाचक म्‍हणून मला ते आनंददायीच वाटत असतं.

कोल्‍हापूरातील शिक्षणाच्या आठवणी सांगताना मोरे अधिक खुलताना दिसतात. प्राचार्य खर्डेकर, एम. आर. देसाई, सखाराम खराडे सदाशिवराव मंडलिक यांच्या सोबतच्या आठवणी ते हसत हसत त्‍यांच्या जुन्या आठवणीत रमतानाचं चित्र आनंददायी आणि संवेदनशील माणसाचं आठवणीत रमणारं मन दिसतं. सदाशिवराव मंडलिकांविषयी ते आवर्जून सांगतात, सदाशिवराव विद्यार्थी दशेपासूनच हाडाचे कार्यकर्ते होते. संघटना कौशल्याचे त्यांच्यावर कमांड होती. महाविद्यालयात असताना त्यांच्यात असणार्‍या नेतृत्‍वाचं गुण दिसून येत होते. मंडलिकांविषयी ते भरभरून बोलत असताना त्यांच्याविषयी असणारी आत्‍मीयता प्रकर्षानं दिसून येते.

साहित्याकडे कसा वळला या साळुंखे सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्‍हणतात, याला जबाबदार माझे वडील कारणीभूत आहेत. वडीलांना नाटकाची हौस होती, ते नाटकातून काम करायचे म्‍हणून मग माझ्याकडेही आवड आपसूक आली असंही ते सांगतात.

त्‍या काळात गरीबी होती. तीन रुपयांपासू ते तीस रूपयांपर्यंत काम करतानाचे ते कष्टाचे क्षण सांगतात. पैसे तुटपुंजे मिळायचे पण कामाशिवाय पर्याय नव्‍हता असं ते सांगतात. ट्रक्‍सी रिपेयरी, ब्रेक ऑयलिंग, गाड्यांची इंजीन उतरवणे ही कष्टाची कामं करताना अवघे तीन रुपये किंवा आठ दिवस काम केले तर पंधरा वीस रुपयाचे मिळायचे. पण कधी कधी तेपण मिळायचे नाहीत, कधी कोण उधारी ठेवत तसेच निघून जायचे हे ते हसत हसत सांगतात. याविषयी त्यांच्या मनात कुणाविषयी रागलोभ नाही हे सहज दिसून येतं.

गॅरेजच्या दिवसात मन जास्‍त दिवस रमलं नाही. मग पिठाची गिरणी चालू केली. या सगळ्यात शाळा, कॉलेज थांबलं असलं तरी त्यांनी लेखन थांबवलं नाही. कोल्‍हापूरमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर आर्थिक परिस्‍थिती बेताची असल्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. शिक्षणाला भाषावार प्रांतरचनेचा फटका बसला, पण लिहिणं चालूच ठेवल्याचं ते सांगतात. महाविद्यालयाच्या अंकातून, भित्तीपत्रिकेतून कथा छापून येऊ लागल्या. म्‍हाईचा दिवस या त्यांच्या कथेला मिळालेल्या पहिल्या पारितोषिकेचा आठवण सांगतात. तर आनंद यादव यांच्या आईच्या ओव्‍या या कथेलाही पारितोषिक मिळालं होतं असं सांगताना त्यांना त्‍यांचा अभिमान वाटतो.
मराठी साहित्यविश्वाला महादेव मोरे यांनी समृध्द केले असले तरी साहित्‍याक्षेत्राकडून मात्र ते बेदखलच राहिले आहेत. श्री. म. माटे, व्‍यंकटेश माडगूळकर, अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात या साहित्‍यिकांबरोबर या माणसांनं लेखन केलं आहे. ही सगळी मंडळी नावारूपाला आली विविध मंडळावर निवडी झाल्या, लेखकाचे लेखकराव झाले मात्र महादेव मोरे गावाकडे आहेत तसेच आहेत. गावाकडच्या माणसांच्या व्‍यथा, वेदना समजून घेत जनसामान्यात मिसळून राहिलेत.

प्रा. रमेश साळुंखे यांनी तयार केलेला पीठाक्षरं म्‍हणजे महादेव मोरे यांच्या काळातील चालता बोलता इतिहास आहे. माहितीपटाच्या संकल्‍पनेपलिकडे जाऊन त्यांनी केलेलं चित्रण महादेव मोरे यांच्या साहित्याला दिलेली दाद आहे. वस्‍ती, येडचाप, खेकटं, गायगुत्ती, गब्रू, एकोणीसावी जात, आडगार, चेहर्‍यामागचे चेहरे, चित्ताक, ईगीन, माणसं अशीही, मत्तीर, झोंबडं, चकवा आणि चेहरा या त्यांच्या साहित्‍यकृती. प्रत्येक साहित्यकृतीतून सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष , माणसाचं जगणं, प्राप्‍त परिस्‍थिती, माणसा माणसातील राजकारण, अनेक पातळीवर चाललेला महिलांचा संघर्ष या सगळ्याचे चित्रण मांडताना ते वास्‍तवाला भिडत जातात.
पीठाक्षरं या माहितीपटात ते आपल्या आयुष्यातील अनेक घटना सांगतात. त्‍या पाहताना एक अस्‍वस्‍थदायी चित्र मनात उभा रहातं, मात्र महादेव मोरे यांच्या चेहर्‍यावर असणारा आनंद तसूभरही कमी होताना दिसत नाही.

मोरे यांच्या कथाकथानासाठी गेलेल्या दौर्‍याचा प्रसंग पीठाक्षरनं खूप सुंदर आणि संवेदनशीलपणे टिपला आहे. कथाकथनाला प्रमुख पाहुणा म्‍हणून बोलवण्यात आलं तरी ना जेवणाची ना मानधनाची सोय होते. हा प्रसंग सांगण्यापेक्षा पीठाक्षरं माहितीपटात बघताना मन हेलवतं आणि हसूही आवरता येत नाही अशी व्‍दिधा मनस्‍थिती होते.

साथी किशोर पवार, सुभाष देसाई, शंकर सारडा या माणसांच्या आठवणी सांगताना महादेव मोरे यांच्या चेहर्‍यावर कमालीचं समाधान असतं. आयुष्यात अनेक बरेवाईट प्रसंग येतात पण आपण थांबायचं नाही चालत रहायचं हेच सूत्र ते जाता जाता सांगतात.

पीठाक्षराचे दिग्दर्शक, संकल्‍पनाकार माहितीपटाच्या शेवटी विचरतात की नव लेखकाना काय सांगाल तेव्‍हा समकाळाचा विचार करून म्‍हणतात, सध्या हायवेची एक संस्‍कृती आहे, ती मराठी साहित्यात आली नाही. मोबाईलची भाषा त्यांना परिपूर्ण येत नसली तरी मोबाईल संस्‍कृतीमुळे समाजात एक वाईट प्रथा रूढ होते त्याचं चित्रण नव्‍या लेखकांनी करायला हवं अशी अपेक्षा व्‍यक्‍त करीत असताना गीत सुरू होतं...

माझी गिरण गिरण
दळते दळण दळण
माझ्या महादेवाची गिरण
इथं वेगळच नातं
पार्वतीनं दिली साथ
दिला खोपा भरून भरून
या गाण्यावर पीठाक्षरं माहितीपट थांबतो खरा, पण महादेव मोरे यांच्या साहित्याचा, समकाळाचा एक पट डोळ्यासमोर उभा राहतो.

महादेव पार्वती रामचंद्र

Saturday, 24 February 2018

आवडण्याची प्रोसेस तुझ्यापासून सुरू झाली

मि. इंडिया, सदमा हे चित्रपट जेव्‍हा टीव्‍हीवर लागत होते, तेव्‍हा आमच्या घरात टीव्‍ही नव्‍हता. कामगार वसाहतीत तेव्‍हा राहत होतो. त्यावेळी शेजार्‍यापाजर्‍यांच्या टीव्‍हीवर जाऊन पिक्‍चर बघत बसू. खरं सांगायचं तर त्‍यावेळी तुझं नाव ही नीटसं मला माहित नव्‍हतं. पण तुझा मि. इंडिया आणि सदमा हे चित्रपट मी टीव्‍हीवर बघितले होते. तुझे चित्रपट मला थिएटरवर कधीच पाहता आले नाहीत. आणि ते वयही नव्‍हतं थिएटरवर जाऊन बघण्याचं, पण २०१२ सालात तू पुन्‍हा दमदार एन्‍ट्रीने पुनरागमन केलीस.English Vinglish त्यावेळी सदमासारखाच भावला मला. त्यावेळी थिएटवर पाहिलेला  तुझा तो मी पाहिलेला पहिला सिनेमा होता. मोठ्या पडद्यावर पाहताना मला पुन्‍हा त्या कॉलनीतील आणि मि. इंडियाची आठवण झाली. ती अगदी चित्रपटगृहातून निघेपर्यंत निघाली नाही. तिच आठवत राहिलीस कधी तुझ्या खर्‍या रूपात, कधी चार्ली चॅप्‍लिनच्या तर कधी समुद्रावर पायांच्या खूणांनी पुढं पुढं सरकणारी तू मि. इंडियासारखी लाल काचेच्या पडद्याआड असावीस तशी वाटत राहिलीस. 
 मि. इंडिया किंवा सदमा पाहताना तुझ्याविषयी एक जवळीक वाटायची. ती नंतर नंतर वाढत गेली. खुदागवा, जुदाई, नगिना असं आधलेमधले चित्रपट पाहत राहिलो, हवा हवा हवाई म्‍हणत गुणगुणत राहिलो.
तुझ्या एक्‍झिटनंतर माझ्या लॅपटॉपवर असलेला सदमा पुन्‍हा पाहताना एक अस्‍वस्‍थतेची जाणीव होत राहिली. हवा हवाई म्‍हणत, किंवा सदमामध्ये तू आयस्‍क्रीम खात असतानाची तू आठवत राहिलीस. मि. इंडियातील कॅलेंडरला तू हाक मारताना मला तू कमालीची आवडायचीस. लहान होतो म्‍हणून असेल कदाचित पण त्‍यावेळी मलाही वाटायचं की तुझ्यासारखी एकादी सीमा आपल्याही आयुष्यात हवी जी मुलांची काळजी घेते तशी आपल्याही मित्रांच्यात असावी. ते दिवस कैक काही वाटण्याचे होते म्‍हणून बरचं काही वाटत राहिलं होतं.
खरं सांगायचं तर मला तुझ्यापेक्षा तो मि. इंडियाच आवडे. त्याचं गायब होणं, गरजवंतांच्या मदतीला धावून जाणं, कॅलेंडरबरोबर मुलांमध्ये मिसळून रहाणं, मोगाम्बोसारखं एकादं पात्र दृष्ट असलं तरी ते आवडण्याचं वय होतं ते माझं. त्या लाल काचेतून बघताना आणि त्याशिवाय न दिसणारा मि. इंडिया माझ्या वयाच्या पोरांच्या गळ्यातील ताईत होता. तर तू सोबतीण असल्यासारखी वाटायचीस.

निष्पाप नात्यांची कथा सांगणारा सदमा आता पाहताना आणि त्यावेळी पाहताना कितीतरी मोठं अंतर पडलंय पण आजही तो आवडत्‍या सिनेमाच्या यादीत खूप वर आहे. पण त्यावेळी तुझ्याकडं मी असाच ओढला गेलो. तुझ्या निरागस आणि निरपेक्ष सवालांनी त्यावेळचा माझा काळ असा भारवलेला आणि अस्‍वस्‍थदायीच होता. सदमा पाहताना नेहमी एक अस्‍वस्‍थतेची झालर माझ्याबरोबर जोडली जायची. म्‍हणूनच त्यावेळी कधीतरी बघितलेली रेश्मी, सोमू मला आजही तेवढ्याच तीव्रतेने आठवतात.

कळत नव्‍हतं तेव्‍हा पण आयुष्यात आवड नावडण्याची प्रोसेस सुरू झाली होती त्याकाळातच रेश्मी, मि. इंडिया, कॅलेंडर म्‍हणून ओरडणार्‍या अभिनेत्रीचं नाव श्रीदेवी आहे हे खूप काळानंतर समजलं पण त्याआधीच श्रीदेवी नावाच्या अभिनेत्रीनं माझ्या मनावर गारूड घातलं होतं. ते कायम राहिल. कधीतरी कुठेतरी हरल्याची, दु:खाची, एकाकीपणाची, अस्‍वस्‍थदायी अशी सायंकाळ जेव्‍हा जाणवेल तेव्‍हा,
ऐ ज़िन्दगी गले लगा ले
हमने भी तेरे हर इक ग़म को
गले से लगाया है, है न
हे गाणं असच मनात रेंगाळत राहिल आणि तू आहेस असंच वाटत राहिल.

Friday, 16 February 2018

मऊशार हातांच्या मायेची शांत लयीची सायंकाळ

सायंकाळ झाली की, म्‍हातारीच्या डोंगरावरच्या गवतात लोळत पडणं नेहमी अचंबित करणारं होतं. का माहित नाही पण हिवाळाचे दिवस सुरू झाले की, ढगाकडं बघताना अशी काय अनामिक हुरहूर लागल्यासारख्या वाटायची की ती अनामिकच रहायाची. निरभ्र ढग कुठूनपासून कुठेपर्यतं पसरलेले दिसायचे. ढगांचा कुठूनतरी एक धागा पकडावा आणि दूर दिसणार्‍या कुठल्यातरी डोंगरावर नेऊन ठेवावा असं वाटायचं. पण ढगांची सुरूवात आणि शेवट कळतच नव्‍हती. ढगच ढग पसरलेले असायचे. आनंदी, मलूल, अस्‍वस्‍थदायी, पळणारे, थांबणारे, चकाकणारे, काळेकुट्टू, पांढरेशुभ्र असे बरेच ढग असत. डोळ्यांच्या अवकाशात. डोळे फिरतील तसे ढगांचे विविध चेहरे दिसत. सोनेरी कडा असलेले ढग कुणीतरी रंगवावेत तसे वाटायचे. आतून कुठून तरी सूर्याची तिरपी किरणे तीव्रतेने बाहेर पडत आणि त्या तीव्र कोमल प्रकाशात वेगाने झेपावणारे कावळे मला सुंदर भासत. ढगातून जाणारे कावळे माझ्या समान  आले की, काव..!असा आवाज करून म्‍हातारीच्या डोंगरावरची शांतता ते एकदम भंग करीत. पण त्‍यावेळी कावळे सुंदर वाटत, आणि मान तिरकी करुन पुढच्या प्रवासाला मग पुन्‍हा ते मार्गस्‍थ होत.

रंगबेरंगी ढगांच्या खाली आमच्या गावच्या बारीचं चित्रंही त्यावेळी मला प्रचंड सुंदर दिसे. गडद हिरव्‍या रंगात पसरलेली ती दाट झाडी, बांबुच्या बेटी, पिवळ्या रंगानी लगडलेल्या फुलांची बाहव्‍याची झाडं, रिकामी आणि रिती रिती वाटणारी शेतवड हे चित्र बघताना नेमकं काय वाटायचं सांगता येणार नाही, पण खूप काय तरी माझ्या मनात आहे असं वाटायचं. सगळा दिवस तिथं शांत, मलूल होऊन थांबलाय असंही वाटे. त्‍या गर्द झाडीच्या एका कोपर्‍यातून काळाकुट्ट लांबवर जाणारा डांबरी रस्‍ता दिसायचा. अनेक वाहने असायची. त्या रस्‍त्यावरून एखादा ट्रक खूप वेगानं येताना दिसे, राँय, राँय असा आवाज यायचा आणि हळू हळू आवाज कुठच्या कुठे तर निघून जाई.

मग कधी तरी सायंकाळ मध्येच गडद झाली, काळीकुट्ट रात्र येण्याआधी म्‍हातारीच्या डोंगरावरून पुन्‍हा घरी परतताना अस्‍वस्‍थतेचं मलूल आकाश मनात दाटून राही. तेव्‍हा शेतवडीतल्या बाहव्‍याच्या झाडावरून एक पांढरा शुभ्र बगळा मोकळ्या आकाशात झेपावताना दिसायचा. त्या अंधूक अंधूक रात्रीत तो पांढरा शुभ्र बगळा, त्या रित्या रित्‍या शेतवडीत खूप अस्‍वस्‍थपणे घिरट्या घालतोय असं वाटत राही. तरीही तो गडद बगळा त्या शेतात उठून दिसे. एका लयीत तरंगत राही आणि संथ गतीनं वर वर जाई, आणि मग त्‍या लयीत तो डोंगराच्या दाट झाडीत तो कुठेतरी लुप्‍त झाल्यासारखा दिसेनासा होई.

मग बगळ्याचा विचार मनात कितीतर वेळ घिरट्या घालत राही. कुठे गेला असेल? त्‍याच्या घरी कुणी कुणी असतील?, तो अस्‍वस्‍थ आहे की त्याची अस्‍वस्‍थपणाची जातकुळीच आहे, बगळ्यासारखं शांत आणि संथ इतर पक्षी का तरंगत नसावेत, त्याच्या अस्‍वस्‍थ डोळ्यात कशाची करूणा असेल किंवा कुणासाठी तो करूणा भाकत असेल किंवा असंही वाटे मोरासारखं, कबुतरासारखं, भारद्वाजासारखं, घुबडासारखं याचा कशातच का उल्‍लेख आढळत नाही? असे अनेक प्रश्न डोक्‍यात येत असत. मग बगळ्याच्या विचारात माझे घराकडे वळणारे पायही म्‍हातारीच्या डोंगरावरच घुटमळत राहत. रात्र गडद नसे, त्‍या सायंकाळच्या रात्रीत म्‍हातारीचं थडगं किती उदास दिसे. त्या काळोखातही. जातान मी हळूच त्या थडग्यावर दगड मारी. मग म्‍हातारी माझ्याकडं चमकून बघते आणि मऊशार हाताने माझ्या गालावरून हात फिरवते असा भास त्‍या शांत लयीच्या काळोखात होई...

-महादेव पार्वती रामचंद्र

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...