Sunday, 21 February 2021

कारण इथे जन्मच मृत्यूचं कारण आहे...


     स्टीलच्या वाटीवर बोटाचं ठसे असावेत तशी काही माणसं असतात, असतात पण दिसत नाहीत आणि स्पष्ट करून दाखवताही येत नाहीत. अशीच जिया शहा. पाळीव आणि भटक्या कुत्र्यांवर काम करणारी, त्यांच्यावर उपचार करणारी जिया हा तिचा प्रवास खूप भावूकपणे सांगते. कुत्र्यांवर काम ती एकटीच नाही करत. तर तिची आई आणि तिची बहीणही हे काम खूप गंभीरपणे करतात. शहरातील भटक्या कुत्र्यांना कुणीच वाली नसतं, पंढरपूरातील कुत्र्यांसाठी मात्र शहा कुंटुंबातील या तिघी मायलेकी जीव तोडून काम करतात. तोही एक जीव आहे,  हे त्या अगदी पोटतिडकीनं सांगतात.


चंदगड तालुक्यात तिने काम सुरू केल्यावर ती सांगते की, आजोबा, वडील, मुलगा आणि नातू या सगळ्यानाच कुत्र्यांच्या पिल्लांविषयी विचारलं की, या तिन्ही पिढीतील माणसं मला एकच गोष्ट सांगतात की, कुत्री व्याली की, कुत्रीची एक-दोन पिल्लं घरात ठेवणार आणि राहिलेली आम्ही नदीत बुडविणार. हे ऐकताना मन हेलवाणारं होतं. त्या बुडविण्याच्या एका गोष्टीनं मन प्रचंड अस्वस्थ झालं. हे सांगताना तिचा स्वर कातर होता आणि  ही हेलावणारी गोष्ट सांगते, मुळची पंढरपूरची असलेली आणि सध्या रशियात मेडिकलचे शिक्षण घेणारी जिया शहा. अवघ्या तीन दिवसाच्या आणि डोळेही उघडले नसलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव वाचविण्यासाठीच तिने निर्णय घेतला की,कुत्र्यांची नसबंदी करण्याचा. यासाठी तिने कोल्हापूर जिल्ह्याचे पशूसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांची मदत घेऊनच तिने नसबंदीचे शिबिर चंदगड तालुक्यात आयोजन केले. ती म्हणते हे माझं एकटीचं काम नाही, त्यासाठी अनुप्रिया शहा, सूरज मधाळे, गंगाराम कांबळे, मनोहह बुरूड,  किशोर बोकडे यांचीही साथ आहे म्हणून हे करू शकले.



चंदगड फिल्म कंपनीच्या सावित्र्यायण या चित्रपटात मेडिकल कन्सलटन्ट म्हणून काम करणारी, रशियात मेडिकलचे शिक्षण घेणारी जिया शहा. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती चंदगड तालुक्यातील पुंद्रा, काजिर्णे, आणि गवसे गावात येऊन राहिली होती. यावेळी तिला येथील एक रुढ आर्थाने चालत आलेली, वाईट प्रथा समजली, ती म्हणजे, कुत्रीला पिल्ले झाली की, त्यातील एक दोन पिल्ले ठेऊन घ्यायची आणि राहिलेली पिल्ले माणसं नदीत बुडावायची. 


तालूक्यातील अनेक गावातील ही वाईट प्रथा तिच्या लक्षात आल्यावर तिने तालुक्यातील कानूर परिसरातील पुंद्रा, कानूर खुर्द, कानूर बुद्रूक, मासूरे, सडेगुडवळे, पिळणी, भोगोली, बिजूर, कुरणी, गवसे, बुझवडे, इब्राहिमपूर आणि कानडी या गावांतील कुत्र्यांचा सर्व्हे केला. प्रत्येक कुत्र्याच्या मालकाला जाऊन भेटून त्यांच्याशी संवाद साधून तिने आपल्या सर्व्हेत १११ कुत्र्यांची नोंद केली.


सर्व्हे करतानाही तिने तीन चार गट केले, प्रत्येक गटाला काम वाटून दिले, आणि सर्व्हे पूर्ण केला. जियाचा हा पहिलाच प्रोजेक्ट नाही, तिने याआधीही पंढरपूरातील भटक्या कुत्र्यांसाठी काम केले आणि आहे तिचे ते काम सुरूच आहे. शहरातील कुत्र्यांना आजार होतो, वाहनांची धडक बसून जखमी होतात, कुणी दगड मारतं तर कुठलं तरी कुत्रं खड्यात नाहीतर गटारीत पडलेलं असतं. तिला ते समजल्या समजल्या ती मग तिच्या कुत्र्यांचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू होते.



कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने जियाने पशूसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांची भेट घेतली. डॉ. पठाण यांनाही, तिने चंदगडमधील या प्रथेची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांनीही सकारात्मक पाऊल उचलून, त्यांनी व जिया शहाने कानूर, सडेगुडवळे, गवसे येथे दोन दिवसाच्या नसबंदीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. नसबंदीची शस्त्रक्रीया करण्यासाठी डॉ. अनिल परभणे, डॉ. चिकभिरे यांच्यासारख्या डॉक्टरांनी ते काम केले.

कुत्र्यांच्या या नसबंदीसाठी जियाने स्थानिक माणसांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यासाठी गावागावातून फिरू लागली. नुकताच जन्मलेली म्हणजे डोळेही न उघडलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना पाण्यात बुडविणे किती अमानवी आणि क्रूर आहे. हे ती चंदगड तालुक्यातील माणसांना समजावू लागली. तरीही काही पारंपरिक आणि धार्मिकतेचा पगडा असलेले नागरिक तिलाच समजावू लागले. त्यांच्या मते, कुत्र्याची पिल्ले पाण्यात बुडविणे म्हणजे, त्यांना पापातून मुक्त करण्यासारखे आहे. त्यावर तिने याबाबत वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली. त्यामुळे लोकांच्यात मानसिकतेत बदल होत गेला. अकरा गावातील कुत्री पाळणारे नागरिक कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तयार झाल्यावर ती त्यांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या तयारीला लागली. स्वतः आणि काही दानशूर व्यक्तींकडून पैश्याची जूळवाजूळव करून तिने आर्थिक पाठबळ उभा केले. त्यानंतर कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, बेल्ट, साकळ्या त्यांची तजवीज मुंबईतील एका एनजीओमध्ये काम करणा-या अनुप्रिया शहाच्या मदतीने मुंबईतून काही साहित्य मागविले. साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर लगेच डॉ. पठाण यांच्याबरोबर संवाद साधून नसबंदी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 या कामासाठी तिला अनुप्रिया शहा, सूरज मधाळे, एकनाथ बांदिवडेकर, गंगाराम कांबळे, मनोहर बुरूड, किशोर बोकडे, मनस्विनी कांबळे, संतोष कांबळे यांची मदत झाली.

...........................................


कुत्र्यांची नसबंदीचे काम सुरू केल्यावर कामाचा एक दस्ताऐवज रहावा म्हणून एफटीआयचा विद्यार्थी सूरज मधाळे याने कामावर माहितीपट बनवला आहे. कामाच्या सुरूवातीपासून सगळ्या गोष्टींचे चित्रीकरण, शिबिर घेतलेल्या गावातील, कुत्र्यांच्या मालकांच्या मुलाखती, जियाबरोबर काम करणारी अनेक माणसांचे अनुभव त्यांनी कॅमेराबद्ध केले आहेत. सूरज मधाळेंनी तयार केलेला माहितीपट पाळीव प्राण्यांच्या आणि माणसांच्या जगण्याचा एक वेगळा पैलू सांगणारा माहितीपट तयार झाला आहे. या माहितीपटासाठी त्याचा एफटीआयचाच सहकारी मित्र केतन पांडकर याने कॅमे-याची जबाबदीरी तर साऊंडची जबाबदारी सिध्दार्थने सांभाळली आहे.



................................

डॉ. वाय. ए. पठाण कोल्हापूर विभागाचे पशूसंवर्धन खात्याचे उपायुक्त. स्वभावात कमालीचा मृदूपणा, भाषेत आपुलकीचा गोडवा आणि मुक्या प्राण्याची भाषाही सहज समजून घेणारा असा हा अवलिया. मुक्या प्राणी आजारे असले काय किंवा बरे, टणटणीत असले तरी ती त्यांची भाषा समजून घेण्याची कुवत माणसाकडे लागते. ती कुवत सहज सुंदर त्यांनी मिळविली आहे. म्हणून त्यांच्या कार्यालयात गेलं की माणूस आपसूकच डॉ. पठाण सरांसारख सहज निरागसपणे व्यक्त होऊ लागतो.



........................................... 

मुंबईतील एका एनजीओमध्ये काम करणा-या अनुप्रिया शहा सांगतात, शहरी भागातील भटक्या कुत्र्यांसाठी शासकीय पातळीवर अनेक उपाय योजना केल्या जातात. त्या यशस्वापणे राबविल्याही जातात. मात्र ग्रामीण भागात याविषया कुठलीही जागृती झालेली दिसत नाही. म्हणून आम्ही नसबंदीचे शिबिर आयोजनाचा निर्णय घेतला. काही दानशूर व्यक्तींकडून आणि काही खर्चाचा भाग आम्ही करून चंदगड तालुक्यातील काही भागात हे शिबिराचे आयोजन केले आहे.



..................................................

दै. सकाळचे पत्रकार संदीप खांडेकर यांनी घेतलेली दखल



एबीपी माझाने घेतलेली कामाची दखल. कोल्हापूरचे ब्युरो चिफ विजय केसरकर यांचा स्पेशल रिपोर्ट

https://youtu.be/GGT4ipoelnM


बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...