...म्हणजे आम्ही कधी तरी लहान होतो, मग दुपारी केव्हातरी गावात गारेगारवाला येई आणि आम्ही गावातील सगळी पोरं हातात पाच पाच काजू घेऊन त्याच्या भोवती घोळका करी. नंतर तो प्रत्येकाच्या पाच काजू घ्यायचा आणि त्याच्या
बदल्यात आम्हाला तो गारगार गारेगार द्यायचा. कुणाच्या दहा काजू असतील त्याला पांढरा शुभ्र असा दुधाचा गारेगार मिळायचा पण आम्हाला तो पाच काजूंचा लाल भडक थंडगार गारेगारच आवडायचा. ध्याही अगदी शांत शांत व्हायची, आणि भारी वाटायचं. तेव्हा पासून म्हणजे अगदी कळू लागल्यापासून काजू आणि मुरठा कायतरी मिळवून देणारं पीक आहे हे तेव्हापासूनच ध्यानात आलं. म्हणूनच याला चंदगडच्या लाल मातीतील, पांढरं सोनं म्हणतात असेल.दिवस बदलत गेले आणि काजू बहुमोल झाली. चंदगडच्या प्रत्येक शेतकर्याच्या बांधा बांधाला छोट्या पानांची, भरगच्च बुटकी अशी ही काजूची झाडं दिसू लागली. त्यातलं मोल आणखी समजू लागलं म्हणून उसातही काजू बहरु लागली. काजूच्या झाडांवर पानांपेक्षा लाल, पिवळे मुरटे डोलू लागले आणि घरातील सगळी कच्ची बच्ची मंडळी काजूच्या बागेत राबू लागली, आणि रमूही लागली.
काजू म्हणजेच सोनं हे लक्षात यायलं खूप उशीर लागला नाही, म्हणून बांध तिथं काजूच झाड बहरु लागलं. कधी काळी एक दोन किलो काजू घालणारे शेतकरी पोत्यानं काजू घालू लागले. मनासारखा पाऊस पडू लागला म्हणून दरवर्षी काजूची रोपं बांधा बांधावर डोलू लागली.
mahadev parvati ramchandra kaju chandgad marathi maharashrta
काही दिवसातच इथला शेतकरी एका पोत्याचा दहा पोत्यांचा मालक होऊ लागला. चंदगडच्या सगळ्याच शेतकर्यांची मग गोळा बेरीजेची गणित काजूवरच विसंबू लागली कारण काजू म्हणजे पांढरं सोनं होतं.
या लाल मातीत जसा धो पाऊस असतो तसच कडक्याच ऊनही असतं, पण हे ऊन चंदगडच्या माणसाला लागत नाही कारण बहरलेल्या काजू बागेत गर्द सावल्यांचं अधिराज्य असतं. कडक ऊन सुटलच तर काजूच्या बागेत झाडांच्या मुळावर सुखाची वामकुक्षी घेणारा शेतकरी फक्त चंदगडमध्येच भेटणारा असतो, कारण असतं पांढर्या सोन्याच्या खाणीचं.
हे पांढरं सोनं असलं तरी मिळणारा भाव म्हणजे शेतकर्यांची हेळसांडच असायची. बाग बहरली आणि एकाची दहा पोती झाली तरी काजूवाला शेतकरी, शेतकरीच रहायचा. काजू विकत घेणारे मात्र गब्बर होत, आधी काजू विकत घ्यायची नंतर काजू फॅक्टरीचे मालक व्हायचं नंतर उद्योजक म्हणून चेअरमन बिरमन म्हणून मिरवत रहायचं. शेतकरी मात्र सालोंसाल जैसे थे अवस्थेत. कारण मनासारखा दर चंदगडच्या शेतकर्याच्या वाट्याला कधी आलाच नाही. काजू संपत आली की खरिपाची काळजी. बी-बियाणं घ्यायची कधी, महागलेली खतं वापरायची कुठली आणि भाताच्या रोपेत औतं की ट्रॅक्टर परवडणार याच चिंतेत इथला शेतकरी.
कधी तरी मनासारखा दर मिळेल आणि कधी तरी आमच्या लाल मातीतील काजू उत्पादक शेतकरी बागायतदार म्हणून मिरवेल तेव्हाच काजूभावाची ही चर्चा होईल. लाल मातीतील पांढरं सोनं घेणा-यांचं दुःख वेगळच आहे कारण ते दिवसेंदिवस मातीमोल होतय....
kamblemahadev21@gmail.com