...खूप लहान असल्यापासून अगदी आमच्या आबांच्या मांडीवर बसून मी गावाकडची नाटकं बघितलेत. एखादं नाटक भावलच तर त्यातील अनेक पात्रात माझं मी पण शोधत होतो. नंतर मोठ्या झाल्यावर मोठ्या पडद्यावरचा सिनेमा बघताना तर कोणत्या पात्रात मी फीट बसतो किंवा कोणतं पात्रं माझ्यासारखं आहे हेच मी पाहत राही. यावेळी दोन्ही गोष्टी मिळायच्या, सुखही आणि आनंदही. पण ते फार काळ टिकायचं नाही, तिसरी बेल वाजायची आणि थिएटरात मंद मंद दिवे लागायचे अन् मग ते सुख, दुःख दोन्ही मंद मंद होत जाई.
आणि मग कधीतरी इरफान खान नावाचा माणूस सिनेमागृहाच्या भव्य दिव्य पडद्यावर भेटला, तो फक्त भेटलाच नाही तर अगदी माझ्यातला अगदी आतला आतला वाटला.
इरफान खान. नावातच खान पण तुझं खान पण कधीच माझ्या आड आलं नाही. खूप वर्षं कोल्हापुरात राहिलोय म्हणून असेल कदाचित., आता आता तू गेल्यानंतर तुझ्याविषयी हळहळणारी काही माणसं अल्लाकडे तुझ्यासाठी शांती विश्रांती मागत होती, पण मला फक्त आता तुझ्या अस्तित्वाची रिकामी पोकळीच तेवढी भासत होती, आणि ती आता कायम भासत राहिल, आणि ती भासावीच, असचं वाटतं.
आता इथं लिहिताना मला सारखं वाटतं , तुझ्या सिनेमांची इथे यादी द्यावी मग वाटलं, राहू दे, जे केलं आहेस त्याची छाप निरंतर राहणार आहे.
टीव्हीवर कधी कधी तुझा सिनेमा लागेल तेव्हा तेव्हा तू कुठेतरी तुझ्या कामात व्यस्त असशील नाही तर सिस्का लाईटची आणखी कुठली तरी नवी जाहिरात दाखवत काही सेकंदात तू निघूनही जाशील, असच मला तेव्हाही वाटेल.
Mahadev parvti ramchandra blogger irfankhan म मराठी
अनिरुद्ध संकपाळ आणि मी मुंबईत असताना रोज वर्सोवा, मड, जेट्टी असा प्रवास असे. शिप्टला जाताना त्या बोटीतून अनेक कलाकार भेटायचे तेव्हा मला कधीतरी सारखं वाटायचं तू, नवाजुद्दीन नाहीतर मिलिंद शिंदे भेटावा, पण तसं झालच नाही. त्यावेळी चेहर्यावर रंग चढवलेली अनेक माणसं भेटली पण इरफानभाई तुझ्याही चेहर्यावर रंग होताच की, पण तो कधीच आम्हाला दिसला नाही. तू आमच्यातलाच एक आम्हाला वाटत राहिलास, रंगाशिवायचा खराखुरा माणूस.
आता खरच तू आम्हाला कधीच भेटणार नाहीस, सिनेमाच्या नव्या पोस्टरवर तुझं चित्रं नसेल, डोळ्यांनीच असंख्य आणि प्रत्येकाची भाषा बोलणारे तुझे डोळे नसतील तेव्हा मात्र सिनेमागृहाच्या बाहेर आणि आतल्या काळोखतल्या गर्दीतही
अगदी ढगाएवढी मोठी तुझी पोकळी जाणवेल....
(चित्रःसौरभ गुगलवरुन साभार)