Saturday, 24 November 2018

घडण्याच्या प्रोसेसमधला मेंदू बिघडत गेला



...आता नेमकं मी शाळेत कोणत्या वर्गात होतो ते माहित नाही, पण त्यावेळची एक गोष्ट आठवते. वाचायला यायला लागलं होतं, मेंदू पूर्ण नाही पण घडण्याच्या प्रोसेसमध्ये होता. अगदी तुपाचा गोळा असावा तसा मेंदू होता. म्‍हणजे कुठल्या तरी धगीजवळ तूप ठेवावं आणि ते वितळून जावं तसं अगदी. वाचायला येऊ लागल्यानंतर मेंदू वितळायला लागला की, घडत होता माहिती नाही. पण आत आत कुठेतरी काही तरी घडत होतं माझ्यात. मेंदू वितळत होता आणि घडण्याच्याआधीच मी बिघडत होतो. आम्‍ही कॉलनीत रहायला होतो आणि वाचायला येत होतं मला.  आज आणतात तसेच त्यावेळीही आमचे आबा रोज पेपर आणायचे. कॉलनीतील काही म्‍हातारी माणसं माझ्याकडून पेपर वाचून घेत होती. आणि मी मोठ मोठ्यानं वाचून दाखवत होतो. एक दिवस सकासकाळी पेपर वाचत होतो. तेव्‍हा पेपरात एक फोटो छापून आला होतो. अगदी मोठा. नजरेत भरेल एवढा. हातात कसल्यातरी रंगाचा झेंडा, चेहर्‍यावर उग्र भाव आणि कुठल्यातरी धर्मस्‍थळच्या वास्‍तुचा वरचा भाग. त्या भागावर उभा राहून तो झेंडा फडकवत होता. झेंडा फडकवणार्‍या माणसा पाठीमागे आणखी काही माणसं होती. त्यांच्याही हातात झेंडे आणि काठीसारख्या वस्‍तू दिसत होत्या. तो फोटो मी बराच काळ पहात बसलो होतो. तपकीर्‍या रंगात छापलेल्या त्या उग्रवादी माणसाचा चेहरा नंतर कित्येक वर्षे माझ्या मनपटालावर कायम कोरला गेला. तो आजही कायम तसाच आहे. 

तो झेंडा फडकवणारा, चेहर्‍यावर विचित्र भाव आणून लोकांना उद्दीपित करणारा माणूस म्‍हणजे काय तरी विचित्र घडतय असच कायम मला वाटत आलय. आजही तेच वाटतं. आज कुठंही दंगल झाली. स्‍फोट झाला, माणसं मेली, आया बहिणींच्यावर अत्याचार झाले की मला तेच चित्र, त्याच माणसाचा उग्र चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. वाटतं हे घडवणारा तोच असणारा. हे कधी काळी माझ्या मनावर बिंबलेलं चित्र. कारण मेंदू तुपाचा गोळा होता. आता या वेळी तो कुठे असेल माहित नाही पण तोच आहे असं वाटत राहिलं कित्‍येक दिवस.

आता काळ खूप पुढं निघून गेलाय. पण हे आहे हे तसच आहे. माझ्या मनात. दंगली झाल्‍या की, हे चित्र आपोआप माझ्या मनात तरळू लागतं. आवाज येऊ लागतात माणसांचे. लाल लाल असणारं रक्‍त किती विभागल जातय असं वाटू लागतं आणि पुन्‍हा पुन्‍हा मला तेच आठवू लागतं. आणि मनात पुन्‍हा पुन्‍हा तेच तरळू लागत.

मी लहान होतो का, मला कळत नव्‍हतं की हे सगळं होतं ते. शाळेत इतिहास शिकताना वाटायचं की, शिवाजी महाराज म्‍हणजे इतिहास, आणि ज्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाबरोबर युद्ध केलं तो अफजल खान मुस्‍लीम होता आणि मुस्‍लीम म्‍हणजे आपल खरे विरोधक. शाळेत असणार्‍या मुस्‍लीम पोरांकडंही मग असच कुठल्यातरी चष्म्यातून बघायला लागू लागलो. कारण तो चष्मा मिळाला होता, त्या उग्रवादी माणसाकडून. झेंडा फडकवणार्‍या, वास्‍तुवर नाचणार्‍या आणि वास्‍तू पाडणार्‍या माणसांकडून.

मग कधी तरी मेंदू पडत धडपडत मेंदू वयात आला. चांगली माणसं भेटली. चांगूलपणाची संकल्पना मला अजूनही कधीच समजली नाही. त्याच्या शोधात आहे. पण वाईटपणाची संकल्‍पना मात्र मनात कधीच रुजली. त्याला कधी धक्‍का लागला नाही. धक्‍का लागू दिला नाही.

तो धक्‍का लागू दिला असता तर मीही तसाच हातात झेंडा हातात घेऊन त्या वास्‍तुवर मिरवला, नाचलो असतो. आणखी कितीतरी जणांना चेतवत राहिलो असतो. भूक, अन्‍न, पाणी यापेक्षा चेतवणं मला महत्‍वाचं वाटलं असतं.
बाबरी पाडल्यानंतर मनात असं असुरक्षितते एवेजी सुरक्षितच वाटू लागलं होतं. यांच्यापेक्षा आपली खूप मोठी झुंड आहे असंही वाटत होतं. आपलं कुणीच वाकडं करू शकत नाही, कुणी आलंच वाटेत तर त्यांना कापायला किती वेळ लागले असा केवढा मोठा विश्वास वाटत होता. कापाकापाची भाषा त्यावेळी आपोआप मला जमू लागली. कुठला तरी रंग मनात गडद होत होता आणि मी अधिकचअधिकच तीव्र, गडद आणि हिंसक असं काय तरी होत होतो. त्यावेळी असणार्‍या माझ्या सायकलवरही एक झेंडा काढून घेतला होता. त्यावेळी आबा म्‍हणत होते हे असलं कायतरी करण्यापेक्षा शाळा शिक नीट, अभ्यास कर, बरोबरची पोरं बघ आणि तुझं काय चाललय बघ. कुठला तरी फालतू अति उग्रवादी विश्वास घेऊन मी जेव्‍हा वाढत होतो, प्रोसेसमध्ये घडत होतो त्यावेळी कॉलनी नावाच्या गोष्टीनं मला एक अद्दल घडवली होती. आम्‍ही त्यावेळी कॉलनीत काय काय करत होतो. सगळं अगदी एकत्र. कधी तरी बाबरी पाडली आणि मनात उगाच पाल चुकचुकत राहिली. ती जास्‍त काळ राहिली नसली तरी मनात राहू बघत होती. शाळेत मग कधी सर, बाई काय काय चांगलं चांगलं शिकवत राहिल्या अन्‌बाबरी पडावी तशी मनातली कवाडं पडत राहिली. माणसं सुंदर भासू लागली, नाही ती सुंदर आहेतच, आणि सुंदरच दिसू लागली. Babri_Masjid

Thursday, 15 November 2018

हे सगळं नकोसं झालंय!


गावाकडून कधी तरी शहरात आलो तेव्‍हा त्या गर्दीची भिती वाटली नाही. ती वाहनं, ते हॉर्न, पळणारी ती माणसांची गर्दी, छान सुटाबुटात शाळेला जाणारी पोरं, उंचच उंच इमारती आणि त्या इमारतींच्या खिडक्यांना असणार्‍या लोखंडी जाळ्या आणि गर्दीतून जाताना एक सुवासिक दरवळणारा गंध. कधी तरी शहरात आल्यावर मला जाणवलेलं हे असं शहर.

आता कितीतरी वर्षं सरली असतील असं जेव्‍हा मी गणित करतो तेव्‍हा खूप नसली तरी माझ्यासाठी ती चिक्‍कार असतात. मग उसास सोडत माझं मलाच म्‍हणतो मला, इतकी वर्षं झाली! गाव, घर सोडून. तो माझा मलाच प्रश्न असतो की माझं मीच मला दिलेलं उत्तर असतं ते त्याक्षणी समजत नाही आणि उमगतही नाही. माझ्या आत आता शहर भिनलंय असं मी इतरांसारखं कधीच म्‍हणू शकणार नाही. एवढं शहर माझ्या बाहेर राहिलंय. मग आत आता काय राहिलय हे जेव्‍हा मी विचारतो तेव्‍हा मात्र वाटतं राहिलेलं, उरलं-सुरलेलं आता नकोसं झालंय. का नकोसं झालयं तेच नेमकं कधी कळालं नाही. पण नेहमी वाटत राहंत आता हे सगळं नकोसं झालय.
तसं म्‍हटलं तरी शहर आता अंगवळणी पडायला पाहिजे होतं, ते तसं का झालं हे कधी ध्यानात येत नाही आणि आलं नाही. या शहरात आलो तेव्‍हा बसमधून उतरल्यानंतर सगळी गर्दीच गर्दी दिसली. वाहनांची आणि माणसांची. बस स्‍टँडवर उतरल्यावर सगळ्या बसच रांगा. लांबपर्यंत दिसत होत्या. हलणार्‍या त्या रांगा बघून, हलणारी ती वाहनं बघून माझ्या मनातही काही तरी हलतं आहे असं जाणवू लागलं होतं. पण ते नेमकं सांगता आणि पकडता येत नव्‍हतं. आबा सोडायला आलेले, स्‍टँडवर उतरल्यावर वाटलं की आता सायंकाळी आबा पुन्‍हा गावी जाताना मला काय काय वाटेल, गळा दाटून येईल, डोळे भरून येतील, गाव आठवले, आई, म्‍हातारी आई, गाव, घर, ढोरं, पोरं आणि तो म्‍हातारीचा टेक. हे सगळं डोळ्यासमोर येईल तेव्‍हा मला भरून येईल आणि रडूच कोसळेल असं मनोमन वाटलं. आबा तर मी गाव सोडून शहरात जाणार म्‍हणून आधीच भावूक झाले होते. त्यांना सारखं वाटायच, आणि आताही तसचं वाटतं आपल्या पोरानं आपल्या डोळ्यासमोर रहावं. हा त्यांचा हट्‌टाहास कायम राहिला आहे.

शहरात येऊन आता कितीतरी दिवस झाले तरी आजही घरी गेलो तरी आई आबांसारखांच गावाकडच्या अनेक माणसांचा एकच सवाल असतो, आता मग परत कधी येणार. मग मी म्‍हणतो आधी जाऊ तर द्या. हे नेहमीच असतं. त्यावेळी घरातले आई, आबा, म्‍हातारी आई, बाळी, विचारायची तर आता बायको विचारते मग कधी येणार. मग पुन्‍हा मी भूतकाळात जातो. तर आक्‍का शहरातून फोन करायची ये की, रे लवकर. अभ्यास नाही का. वगैरे वगैरे म्‍हणायची. दोन्‍ही बाजूनं मन जड व्‍हायचं.

गावातून बाहेर पडलं की मग पुन्‍हा गावाकडून वळून बघताना वाटायचं काय म्‍हणून हे गर्द झाडीतील दुनिया सोडून मी दुनियादारी करायला निघालोय. ती लाल कौलं, चिर्‍या-मातीच्या भिंती, शेणामातीचा गंध, गुरं ढोरं, ती मायाळू माणसं, चिडणारी म्‍हातारी जुनी खोडं, आमचं टिप्‍पो, शेतातलं घर, शेतातील जांभूळ, आंबा हे असं काय होतं. वाटेल तेव्‍हा वाटेल ते करता यायचं गावाकडं.

भाकरी नावाच्या वस्‍तुनं गाव सोडायला लावलं खरं पण भाकरी मिळाली कुठे. मिळाली तीही आर्धी आणि करपलेलीच की. तरीही गावाला सांगत राहिलो भाकरी नाही तुपातील रोटी मिळाली. उगाच खोटं खोटं जगत राहिलोय आणि तेच  माझ्या आत भिनत भिनत चाललय असंही जाणवू लागलं आता. गावासारखं खरं खरं जगणं आता कुठं राहिलंय असं वाटू लागतं तेव्‍हा मी शहरातच माझं गाव शोधत राहतो. माणसं बघतो. झाडं, गुरंढोरं, दुकानं असं काय काय आहे शहरात. बघतोय तिकडी गर्दी. माणसांची तशी दुकानांची. इथं सगळचं विक्रीला काढलय यांनी. काय मिळत नाही असं नाही. माझं गाव तेवढच यात नाही. ढळढळीत दुपार झाली की वणवा पेटवा तसं हे शहर जाणवू लागतं. माहित नाही हे फक्‍त मलाच दिसतं की आणखी कुणाला असं वाटतं. इथं खूप गर्दी आहे याचा अर्थ काय घ्यायचा. हवहवसं वाटणार्‍यांचं हे शहर आहे की थांबून आहेत ही माणसं गावाकडं जाण्यासाठी की तिकडेच चाललेत यांची पावलं.

आता या क्षणी इथं या शहरात सगळं असलं तरी हे सगळं नकोसं झालय. गर्दी नसली तरी उगाच डोळ्यात गर्दीचे भास होऊ लागलेत. वाहनांची गर्दी नाही, हॉर्न कुणी वाजवत नाही तरीही कानात घुमत राहतात हे कर्नकर्कश हॉर्न. सगळ्यांची गर्दी असली तरी माणूस कुठंय या गर्दीत. गावाकडं असणारी माणसंही इथे कुठेही सापडत नाहीत. शोधत राहिलं तरी ती चुकत राहतात. कुठे कुठे विसकटून जातात. शहरातल्या नदीवर जाऊन बसावं तर नदीच नाही तिथं. काळं, निळं शार असणारं पाणीही नाही इथं. सगळं हरवून गेलं म्‍हणूनच असेल हे सगळं नकोसं झालंय मला !
गाव, घर, महादेव पार्वती रामचंद्र
चित्र: चित्रा वैद्य (गुगलवरून साभार)sahodara

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...