Sunday, 24 June 2018

विकिपीडिया जेव्‍हा तुमची दखल घेते...


जगभरातील सर्वच माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहे पण विकिपीडियावर सर्च होण्यासाठी काही तरी खासच करावे लागते. त्यानंतर तुम्‍ही जगासमोर सहज येता किंवा उपलब्ध होता. 

काल ऑफिसमध्ये काम करत होतो. बातम्या करणं ही आमचं काम असलं तरी एखादी बातमी नजर वेधून घेते. त्या बातमी मागची बातमी काय असं उगाच शोधमोहीम सुरू होते. आजही कामावर असताना दुपारी साहित्य अकादमीच्या पुरस्‍काराची बातमी आली. बेक्रिंगच्या जगात जगणार्‍या आमच्यासारख्या माणसांना कुठलं तरी जवळच नाव दिसत आणि पुन्‍हा बातमीभोवती मन फिरत रहातं. कालही अगदी तसच झालं. साहित्य अकादमीनं पुरस्‍कार मिळाल्यांची यादी जाहीर केली आणि त्या यादीत नवनाथ गोरे नाव बघितल्यावर अरे आपल्या माणसाला, गावाकडच्या माणसाचा गौरव झाल्यासारखं वाटलं नाही तो झालाच. मग थेट अगदी बनगरवाडीपासून मनातल्या मनात प्रवास सुरू झाला आणि थेट फेसाटीकार नवनाथ गोरे यांच्यावर थांबला. सर काल बातमी करताना तुमची बातमी फक्‍त आमच्याकडेच आहे याचं आनंद झाला. त्यापेक्षा दुसर्‍या गोष्टीचा आनंद हा आहे की, गुगलवर तुमचं नाव सर्च केलं की आता नवनाथ गोरे नावाच्या लेखकाचं स्‍वतंत्र प्रोफाईल दिसतं. गोरे सर ही किती आनंदाची आणि गावाकडच्या माणसाच्या अभिमानाची गोष्ट आहे. सांगलीतल्या निगडी बुद्रुकसारख्या गावात राहणारा माणूस आता थेट जगाच्या पाठीवरून कुठून बघता येणार असला तरी वैयक्‍तिक माहितीसह गुगलने सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. फेसाटी ते गुगल हे लिहिताना मला सहज सोपं वाटत असलं तरी ते तुमच्यासाठी अवघड आणि मोठं होतं. पण आता तुमचं नाव सर्च केलं की थेट तुमचं प्रोफाईल ओपन होतं. सर आनंदच नाही तर ती आमच्यासारख्या गावाकडच्या पोरांसाठी मोठी गोष्ट आहे.

नवनाथ गोरे सर आपल्या पहिल्या भेटीत आपण फार काही बोललो नाही. मोजक तेच बोलत राहिलो. नंतर तुम्‍हीच सांगितला की सर तुमची बहीण म्‍हणजे सुनीता मॅडम मला एमएला शिकवायला होत्या. नंतर नंतर आपल्या भेटी वाढत गेल्या आणि तुम्‍ही प्रेमानं फेसाटी कादंबरीवर माझं नाव लिहून मला तुम्‍ही भेट दिली. तुम्‍ही कादंबरी दिल्‍यानंतर पहिल्या बैठकीत वाचून हातावेगळी करायची ठरवलं पण ते राहून गेलं. सुरूवातीला वाचताना मला सारखं वाटत होतं की कादंबरीला मोठा कुठला तरी पुरस्‍कार मिळायला हवा (पुरस्‍कार मिळाला म्‍हणजे श्रेष्ठ असं काही मानत नाही मी पण लेखकाची कदर केली पाहिजेच की...असो) आणि आपली दुसर्‍या दिवशी भेट झाल्यावर तुम्‍ही लातुरच्या पुरस्‍काराची बातमी सांगितला. खरं सांगू का आपल्या माणसाचं कौतूक होणं, गौरव होणं हे तुमच्याएवढचं आमच्या अंगावर मुठभर मास वाढवणारं असतं. 

शहरं खेडी होताहेत असं म्‍हणण्याची आता पध्दत आले पण आपण सगळीच गावाकडची, खेड्यातली माणसं. आपल्या गावाकडच्या माणसांच्या जगण्याची एक ठेवण आहे. तिच खरं तर जगण्याला उभारी देणारी असते. फेसाटी वाचताना गावाकडच्या माणसांची तीव्रपणे आठवण यायची. माझ्या गावाकडं फेसाटी ओढत नाहीत पण कोल्‍हापुरातून जाताना गडहिंग्लजच्या आधीपासूनच काळ्यामातीत फिकट हिरव्या पिकात फिरणार्‍या फेसाटीवाल्या माणसांचं चित्र दिसू लागतं. फेसाटीची डोक्यावर असणारी आणि डोक्‍यात आत आत रुतणारी दोरी रस्‍त्यावरूनही तीव्रपणे दिसू लागते. त्या आठवणी तुमच्या फेसाटीनं आणखी आणखी तीव्र केल्या. 
फेसाटीचा तीव्र असणारा स्‍वर साहित्यातही ठळकपण नोंदवला गेलाय याचं आनंद तर आहेच. आता आणखी आणखी नवी पुस्‍तकं, नवे अनुभव तुमच्याकडून आम्‍हाला वाचायला मिळू देत याच शुभेच्छा आणि सदिच्छा...

Monday, 18 June 2018

पुष्पा भावे नावाचं गारूड माझ्यावर कायम अधिराज्य गाजवत राहिल....

प्रा. पुष्पा भावे यांना या वर्षीचा शाहू पुरस्‍कार जाहीर झाला आहे. कधी तरी त्‍या भेटल्या होत्या, माझ्याशी बोलल्या होत्या, विचारवंत म्‍हणून कसलाच अभिनिवेश न ठेवता त्यांनी त्यावेळी एक आपुलकीचा संवाद साधला होता. म्‍हणून ती आठवण पुन्‍हा एकदा या पुरस्‍काराच्या निमित्तानं जागी झाली. त्यानंतर प्रा. पुष्पा भावे या नावाचं  गारूड माझ्या मनावर कायम अधिराज्य करीत राहिलं. मराठी साहित्य संमेलनाच्या व्‍यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला त्यांनी विरोध केला होता, त्यानंतर तर ते गारूड आणखी मोठ्या दिमाखत माझ्यावर अधिराज्य गाजवत आहे...

शिवाजी विद्यापीठात असताना मागेल त्याला काम योजनेत काम करत होतो. आम्‍ही एमएची पोरं बागकाम विभागात कामाला होतो. विद्यापीठाच्या गेस्‍ट हाऊसच्या बागेत काम चालले. जुलै-ऑगस्‍ट महिना होता असेल. डॉ. कृष्णा किरवले सर त्यावेळी विभागप्रमुख होते. त्यांनी एक राष्ट्रीय चर्चासत्र ठेवलं होतं तेव्‍हा त्या प्रमुख पाहुण्या म्‍हणून आल्या होत्या, आणि विद्यापीठाच्या गेस्‍ट हाऊसला उतरल्या होत्या. आम्‍ही पोरं सगळी सकाळी सहा वाजता बागेत काम करत होता. काम करत असताना त्या गॅलरीत उभा राहून आमचं काम बघत होत्या. गॅलरीत कुणीतरी बाई थांबले असच त्यावेळी वाटलं होतं. काही वेळानंतर त्या बागेत फिरायला आल्या आणि आमच्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडं गेलं. मग कुणीतरी म्‍हणालं की अरे पुष्पा भावे बघ. त्यावेळी त्यांचं कुठलच पुस्‍तक वाचलं नव्‍हतं. त्या समीक्षक, विचारवंत आहेत एवढंच काय ते माहित होतं.

पांढरी साडी, फिकट चॉकलेटी अर्धगोल आकाराचा त्यांचा चष्मा. सतत चष्मा लावल्यामुळे त्‍यांच्या चेहर्‍यावर चष्माच्या खुणा प्रकर्षानं जाणवत होत्या. त्या त्यांना भारीय वाटत होत्या. जुलै ऑगस्‍टचा महिना असला तरी पाऊस कमी होता, म्‍हणून त्‍या बागेतून फेरफटका मारत होत्या. पुस्‍तकातून वाचलेल्या आणि अनेक सरांकडून लेक्‍चरमध्ये त्‍यांच्या नावाचा उल्‍लेख व्‍हायचा तेवढाच काय तो त्यांचा माझ्यापुरता परिचय. पुस्‍तकातून वाचलेल्या माणसांना असं प्रत्‍यक्षात बघताना मला आतून खूप काही तरी असं भारावल्यासारखं वाटत होतं. पुष्पा भावे यांचा आणि माझा किंवा माझ्याबरोबरच्या पोरांचा तसा कोणत्याच अर्थी तसा दुरान्‍वयेही संबंध नव्‍हता. त्या मोठ्या विचारवंत आहेत एवढंच काय ती आमच्यापुरती ओळख. आम्‍ही करीत असलेल्या बागेत त्या चालत चालत आम्‍ही ज्या बागेत काम करीत होतो तिथं आल्या. तुम्‍ही काय करताय या त्‍यांच्या प्रश्नांनी काम करणारी आम्‍ही सगळीच मुलं मग आदबीनं त्यांच्यासमोर थांबलो. त्यांच्यासमोर सगळेच आदबीनं थांबल्यावर त्यांनी ओळख असल्यासारखं आमच्याशी बोलणं चालू केलं. आम्‍हाला कांही बोलताच येईना, मग त्यांनी ओळखलं आणि म्‍हणाल्या इथे मोर खूप आहेत. मी सकाळपासून सात ते आठ मोर पाहिलं. आम्‍ही अवघडल्याचं त्‍यांच्या लक्षात येताच मग त्यांनी ओळखीसाठी प्रत्येकाल नाव विचारलं. काम करणारी आम्‍ही सगळी मुलं वेगवेगळ्या विभागातील होता. हिंदी मराठी आम्‍ही दोघचं. आम्‍ही मराठीचे विद्यार्थी म्‍हटल्यावर त्यांनी आमची आणखी चौकशी केली. किरवलेंचे विद्यार्थी का म्‍हणत त्यांनी मग आमच्याशी बोलणं चालू केलं. विषय कुठले ? गाव कोणतं ?  असे प्रश्न विचारत त्यांनी इतर मुलांबरोबरही संवाद चालूच ठेवला मग.

आमच्यातील एक कर्नाटकातील होता. मग त्या सीमावादावर एक दोन वाक्य बोलल्या. त्याला हे पण विचारलं की तुम्‍हाला काही त्रास जाणवतो का ? एवढ्या मोठ्या विचारवंत पण त्यांच्या बोलण्यात कसलाच अभिनिवेश नव्‍हता. प्रत्‍येकाशी खूप आपुलकीनं सूर जुळवत त्या प्रत्येकाशी संवाद साधत होत्या. दहा बारा मिनिटं बोलत असताना म्‍हणाल्या तुमच्यावर नजर ठेवणारं कोण ? असं जेव्‍हा त्यांनी विचारलं तेव्‍हा आमच्यातील एकानं उत्तर दिलं येथील माळी आहेत ते नजर ठेवतात. या उत्तरावर त्या खूप निरागसपणे हसल्या आणि  म्‍हणाल्या आता तुमचं काम चालू द्या. काम संपल्यावर आपण भेटू. मी आहे इथेच म्‍हणत बागेतून त्या फेरफटका मारू लागल्या, नऊ सव्‍वा नऊ वाजले होते. पुष्पा भावे पुन्‍हा आमच्याकडे आल्या आणि म्‍हणाल्या इथे चहा कुठे मिळतो, मग आमच्या पोरांनी सगळ्यांनी एका दिशेला हात करीत म्‍हटले मॅडम तिथे कँटीण आहे... हो का म्‍हणत ते लांब होतं तुम्‍हाला नाही का ?  आपण सगळ्यांनी मिळून चहा एकत्र घेतला असता म्‍हणाल्या तेव्‍हा आम्‍हाला प्रत्‍येकालाच भारी भारी वाटलं. त्यांच्याविषयी अशी एकवेगळीच आपुलकी जाणवू लागली. ती भेट आजही तशीच आठवते...आज मॅडमना शाहू पुरस्‍कार जाहीर झालाय, आज त्यांना ती विद्यापीठातील आठवण आठवेल की नाही माहित नाही पण मला मात्र ती आठवण आज तीव्रपणे आली...प्रा. पुष्पा भावे नावाचं गारूड तेव्‍हापासून माझ्या मनावर कायम आहे आणि ते तसचं राहिलही....

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...